काही शेतातली पिके निघालेली, काहीतली उभी. मध्येच एखादे गवताचे, सरमडाचे, कडब्याचे बुचाड शिखरासारखे दिसायचे. एकाच गालिच्यावर निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे पट्टे काढून गालिचा आकर्षक बनवितात, तसा हा शेतीचा अंथरलेला गालिचा उंचावरून मोठा सुंदर दिसतो. सृष्टीच्या रूपाने अशा वेळी मला वारकर्यांचेच दर्शन घडायचे. कराडहून पंढरपूरला जाणारे वारकरी मी पाहात असे. वारकर्यांची पताका, गळ्यातली वीणा, खांद्यावरची फडशी, हातातले टाळ, गळ्यातील माळ, डोक्यावरचे मुंडासे, प्रत्येकाचा रंग वेगळा. चेहर्यांचेही तसेच. कपाळावर बुक्क्याचा टिळा आणि इतरत्र गोपीचंदन. निरनिराळ्या रंगांच्या मुद्रा उठविलेल्या, पाहताक्षणीच निरागसता लक्षात यावी, पवित्र वाटावे अशी एकूण ठेवण. डोंगरावरून शेतांचे, सृष्टीचे दर्शन असेच व्हावयाचे. जीवनातले ते दिवस सुगीचे वाटत असत.'' लेखकाने या ललित गद्य लेखनाने सांगली, सातारा, कोल्हापूरमधील परिसर, तेथील ग्रामीन जीवन, तिथला निसर्ग, तिथले गड, किल्ले तिथला साधा भोळा माणूस, ग्रामीण संस्कृती यांचे दर्शन आपल्या लेखनातून अतिशय उत्कटतेने घडविले आहे. हे ललित गद्य लेखन येथील मातीतून निर्माण झालेले असल्याने, काळ्या मातीसारखेच कसदार आहे. ग्रामीण परिसराचा पुनःप्रत्यय घडविणारे आहे. यशवंतरावांचे हे लेखन कधी आनंदाने देहभार विसरायला लावते, कधी सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात हरवून अंतर्मुख बनवून विचार करायला लावते, तर कधी व्यथित मनाचे हुंकार चित्रित करते. केव्हा चिंतनशील गूढ, गंभीर मुद्रेने पाहते, तर कधी आकाशाला मुक्तपणे गवसणी घालू पाहणार्या पाखराप्रमाणे येते. जे पाहिले, अनुभवले, जे ऐकले त्याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी केले आहे.
'विदेश दर्शन' हा रामभाऊ जोशी यांनी संपादित केलेला यशवंतरावांच्या पत्रात्मक प्रवासवर्णनाचा संग्रह आहे. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पत्नीला श्रीमती वेणूताईंना परदेशातून लिहिलेली ही पत्रे आहेत. १३ नोव्हेंबर १९६४ ते १९ जानेवारी १९७७ या कालखंडात संरक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून भारताचे राजकारण आणि अर्थकारण अथवा विविध कामांसाठी त्यांचा प्रवास घडला. पण वेणूताईंची प्रकृती नेहमीच अस्वस्थ होती. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या परदेश प्रवासास जाऊ शकल्या नाहीत. शिवाय यशवंतरावांच्या कार्यक्षमतेला ताण पडू नये म्हणून त्यांनी तो प्रवास इच्छा असूनही नाकारला. ''ही स्थिती यशवंतरावांना अस्वस्थ करणारी होती. परंतु नाइलाज होता. वेणूताई आपल्या प्रवासात सहभागी नसल्या, तरी त्यांना पत्राद्वारे विदेश-दर्शन व्हावे अशी त्यांची उत्कट इच्छा या पत्रलेखनाच्या रूपाने साकार झाली. रसिक वाचकही वेणूताईंप्रमाणेच हा पत्रसंग्रह वाचत असताना विदेश दर्शनात रमतो,'' अशा स्वरूपाचा अभिप्राय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दिला आहे. या संपूर्ण पत्रात्मक प्रवासवर्णनात - साहित्यिक, रसिक, कलाप्रेमी असे यशवंतरावांचे दर्शन सर्वांनाच घडते. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व किती विविधांगी होते याची जाण त्यांना असेल त्यांना या विदेश दर्शनचे विशालत्व समजून येईल. राजकारण, साहित्यकारण, व्यक्तिकारण व रसिककारण अशा अनेक 'कारणांचे' हे हृदय संमेलन या पत्रसंभारातून प्रकट होते. त्यात यशवंतरावांच्या कौटुंबिक वातावरणापासून ते देशातील सामाजिक, राजकीय व साहित्यिक वातावरणापर्यंत सर्वांचेच प्रतिबिंब या संग्रहात पाहावयास मिळते. जवळ जवळ सत्त्याण्णव पत्रांच्या संग्रहावरून यशवंतरावांच्या विविध भावना व विचार व्यक्त झालेले तर आढळतातच, शिवाय त्यांनी आपले अंतःकरण निर्हेतुकपणे उघड करणारी पत्रेही लिहिली आहेत. या पत्रातून लेखकाचे व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रवासी लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते.
ही सर्व पत्रे कोणत्याही टपालाने परदेशातून पोहोचविली नाहीत. यशवंतरावांचा ज्या हॉटेलात मुक्काम असेल तेथील सुंदर लेटरहेडवर ते पत्रे लिहित असत. हॉटेलच्याच लिफाफ्यात ठेवत असत आणि परत मायदेशी येताना स्वतःबरोबर बॅगेतून आणत असत. घरी येताच ती वेणूताईंना देत असत. वेणूताई ती पत्रे वाचत बसत. 'साहेब' कुठे जाऊन आले, कुणाला भेटले हे त्यावरून समजत असे. यशवंतरावांच्या या प्रवासवर्णनात्मक लेखनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आगळेपणाही सूचित होतो. लेखकाच्या खाजगी गोष्टी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी, त्यांचे दोष, त्यांचा भलेबुरेपणा यांसारख्या काही गोष्टीचं आकलन होते आणि समाजामधला इतर माणसांसारखा एक माणूस म्हणून त्यांचे अपूर्व दर्शन घडते. या माणसाबद्दलची जिज्ञासा तृप्त व्हायला या यशवंतरावांच्या प्रवासवर्णनात्मक वाचनापासून एक प्रकारची मदत होते. त्यामुळे यशवंतरावांची 'प्रवासवर्णने' या वाङ्मयप्रकाराचे 'एक वेगळा वाङ्मयप्रकार' म्हणून मूल्य वाढते. आशय आणि अभिव्यक्ती या दृष्टीने यशवंतरावांचे हे लेखन निश्चितपणे वेगळेपणा दाखवते.