यशवंतरावांच्या प्रवासवर्णनात्मक लेखनाची भूमिका केवळ वाचकांना आपण पाहिलेला प्रदेश समजावून सांगावा, त्याला ठाऊक नसलेल्या प्रदेशाची व ठिकाणाची माहिती द्यावी अशीच आढळते. पण हे लेखन प्रवासचित्रणात्मक 'फॉर्म' पेक्षा वेगळे आहे. प्रवासवर्णन लिहिण्याच्या अनेक पद्धती आहेत. ''प्रवासवर्णन जसे दैनंदिनी लिहिण्याच्या पद्धतीने लिहिले जाते तसे संभाषणातूनही फुलत जाऊ शकते. कधी ते व्याख्यानातून साकार होते तर कधी अभंगासारख्या काव्यरचनेतूनही प्रकट होते. कुणी पत्ररूपाने, तर कुणी बातमीपत्राच्या रूपाने ते लिहितो.'' यशवंतरावांचे लेखन हे लेखन व पत्ररूपाच्या चौकटीमध्ये अधिक बसणारे आहे. या दृष्टीने त्यांचे ॠणानुबंधातील 'शांतीचितेचे भस्म', 'केल्याने देशाटन' हे लेख व 'विदेश-दर्शन' हे पत्रात्मक संग्रह असलेले प्रवासवर्णन उल्लेखनीय आहे. यशवंतरावांच्या प्रवासवर्णनावर नजर टाकल्यास त्यांचे निसर्गप्रेम लक्षात येते. त्यांच्या रसिकमनाला निसर्गाचे खूप अप्रुप होते. निसर्गाच्या ओढीचे रसाळ वर्णन त्यांच्या काही प्रवासलेखांत पाहावयास मिळते. अशा प्रकारच्या लेखनात वैभवशाली निसर्गाचा, त्यातील सूक्ष्म तपशीलाचा, तेथील माणसे, पशुपक्षी यांच्याशी असलेला सूक्ष्म व तरल अशा भावसंबंधाचा वेध यशवंतरावांनी इतक्या चपखलपणे व तपशीलानिशी टिपला आहे की सारे निसर्गजीवन डोळ्यांसमोर उभे राहते. ज्या देशाला, स्थळाला, वास्तूला भेट दिली तिचे तपशीलवाद चित्र त्यांनी रेखाटले. ही चित्रे रेखाटत असताना स्थळाऐवजी, वास्तूऐवजी ती बघणार्या 'मी'ला ते अधिक महत्त्व देतात. त्यांच्या लेखनातून त्यांच्या निसर्ग जाणिवा स्पष्ट होतात. माणूस व निसर्ग यांच्यातील नाते, निसर्गाचे, पर्यायाने पर्यावरणाचे मानवी जीवनातील स्थान तसेच मानवतेर घटकांचे निसर्गातील स्वतंत्र स्थान या नव्या जाणिवा यशवंतरावांच्या प्रवासलेखनात ठळकपणे दिसतात. या नव्या जाणिवांमुळे लेखनाच्या केंद्रस्थानी निसर्ग व माणूस हाच दिसतो.
यशवंतराव सत्तास्थानी असताना अनेक ठिकाणी प्रवास करण्याचा योग त्यांना आला. त्या प्रवासात त्यांनी निसर्गाचा आस्वाद घेतला आणि आपले अनुभव शब्दबद्ध केले. ते लिहितात, ''माझ्या स्वभावात निसर्गाची ओढ, एकटे हिंडावे, डोंगरकडे चढावेत-उतरावेत, नदीच्या संगमावर बसावे आणि एकमेकात मिसळून जाणारे आणि पुढे एकोप्याने, संथ गतीने चाललेले जीवन पाहावे असा एक छंद.'' यशवंतराव देशांतर्गत हिंडले, तिथल्या माणसांमध्ये मिसळले, त्यांनी विविध स्थळे पाहिली. त्यांच्या संवेदनशील मनाने या प्रवासात त्यांना आलेले अनुभव नुसतेच टिपून घेतले असे नव्हे तर ते कोरून घेतले. ते लिहितात, ''दुनियेच्या सफरीत मी अनेक लहानमोठे देश पाहिले, परंतु त्यातील काही देशांची स्मृती, विशिष्ट कारणामुळे, तेथे जे पाहिले, अनुभवले, ऐकले, त्यामुळे कायमची टिकून राहिली आहे. सामान्यतः मी जेथे जातो, तेथील इतिहासप्रसिद्ध स्थळे पाहतो आणि सांस्कृतिक जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतो.'' त्यांच्या या सूक्ष्मनिरीक्षणामुळेच अशा स्वरूपाच्या ललित गद्याला गुणात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. तसे यशवंतराव सर्जनशील प्रतिभा लाभलेले लेखक आहेत. त्यामुळेच त्यांच्या प्रवासलेखांना, स्थलवर्णनांना लालित्यपूर्ण आविष्काराचे परिमाण मिळालेले आहे. यशवंतरावांनी 'टॉलस्टॉय' समाधी पाहिली. त्या समाधीचे भावपूर्ण वर्णन ते असे करतात, ''जीवनमुक्ताची समाधी असावी तर अशी ! दवबिंदूंनी निथळावी, सुगंधी वायूने रुंजी घालावी, आणि वृक्षांनी चामरें ढाळावी !! सर्वांपासून दूर.... अगदी मुक्त !! ...... 'टॉलस्टॉय' हे 'वांझोटे' शब्द लिहिणारे लेखक नव्हते, तर मानवता प्रेमाने ओल्याचिंब झालेल्या लेखणीतून अंतःकरणातील शब्दांना सहानुभूतीचे रूप देऊन त्यांच्या द्वारे मानवतेचा अमर संदेश देणारे ते दैवी प्रतिभेचे साहित्यिक होते. त्या प्रतिभेचा साक्षात्कार मला तेथे घडला. टॉलस्टॉयची ही समाधी वरकरणी नामहीन आहे, मौनरूप आहे; पण अंतर्यामी बोलकी आहे. साक्षात्कारी आहे.'' अशा प्रकारे टॉलस्टॉयच्या समाधीचे, त्यांच्या समाधी स्थानाचे वर्णन करून टॉलस्टॉयच्या व्यक्तिमत्त्वावर हा प्रकाश टाकला आहे. या रशियाच्या दौर्यात मॉस्को, लेनिनग्राड, यस्ना-पलाना, वोल्गागार्ड, अस्माखान, सिफलपोल, प्रुन्झेन्सको, सॅनिटोरियम, याल्टा इ. ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्या भेटीत त्यांना जे दिसले त्याचे भावस्पर्शी चित्र उभे केले आहे.
प्रवासवर्णनात्मक लेखांतून मानवी जीवन आणि निसर्ग यांचे अंतर्बाह्य चित्रण यशवंतरावांनी केले आहे. हे चित्रण बहुधा त्रयस्थाची जाणीव ठेवूनच केलेले आहे. चित्रणाचा विषय झालेल्या प्रसंग, भावविचार किंवा वातावरण, तसेच यशवंतरावांच्या निरीक्षणाचा दृष्टिकोन, अमूर्त कल्पनांचा उपयोग करून त्यांनी निसर्गवर्णने केली आहेत. 'केल्याने देशाटन' या लेखातील डोंगरावरून दिसणार्या शेतांचे, सृष्टीचे असे वर्णन करतात. ''कृष्णाकाठ धुंडाळावा, डोंगरदर्यात हिंडावे, निसर्गशोभा लुटावी, हा माझा छंद जुना आहे. या छंदापायी तरुणपणी कराडच्या जवळचे आणि लांबचे अनेक गड, किल्ले चढलो. वसंत गड, सातारचा अजिंक्यतारा, परळीचा सज्जनगड, कोल्हापूरचा पन्हाळा या किल्ल्यांवरून सफरी केल्या. प्रतापगड, रायगडाची मजल केली. गड आणि किल्ले चढण्याचा एक वेगळाच अनुभव असावयाचा. किल्ला चढताना आणि चढून गेल्यावर त्या किल्ल्याचा निसर्ग आणि इतिहास यांचे तर दर्शन घडतेच. परंतु एखाद्या किल्ल्यावर चढून उभे राहिले आणि अवतीभोवती सभोवार नजर टाकली म्हणजे खालून वाहणार्या नद्या, पाण्याने भरलेली त्यांची पात्रे, नागमोडी वळणांचा त्यांचा तो मार्ग आणि तीरावरील वृक्षांच्या रांगा पाहून मन हरखून जात असे..... शेतांची शोभा वेगळीच.