यशवंतरावांना ‘प्रतिशिवाजी’ म्हणून संबोधिले गेले. यावर पुष्कळांनी टीका केली. पण एवढे म्हणता येते की, त्यांनी शिवाजीला आदर्श म्हणून मानले होते. शिवाजी राजकारणी पुरूष होते, तरी शिवाजीचे समाजकारण दूरदर्शीपणाचे होते. ब्रह्मक्षत्र, फार काय हरिजन व स्वराज्याच्या बाजूला राहणारे देशी मुस्लिम बंधु यांना सर्वांना घेऊन शिवाजीने राजकारण यशस्वी केले. याच प्रकारची सर्वसंग्राहकता यशवंतरावांत होती. संरक्षणमंत्री या नात्याने चव्हाण यांनी बजावलेली कामगिरी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची कीर्ती वाढविणारी ठरली. त्यांचे आर्थिक धोरण पुरोगामी असे. सहकारी चळवळ त्यांनी वाढविली. फक्त इंग्रज गेले म्हणजे देश सुखी होईल, अशा समजुतीने वरिष्ठ उच्चभ्रू काँग्रेसवाले पूर्वी शहरात विरोधाचे कार्य करीत होते; पण चव्हाणांना आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यही अभिप्रेत होते. समाजवादाकडे चव्हाणांचा कल असे.
यशवंतरावांच्या निवडणुकीच्या राजकारणावर व त्यांच्या सत्ताकारणावर मतभेद अवश्य झाले व होतील. त्यांची खाजगी धार्मिक मते त्यांनी समाजकारणात व सार्वजनिक राजकारणातही आणली नाहीत. ते निधर्मीवादाचे व लोकशाहीचे प्रवक्ते होते. कोणत्याही संप्रदायाचे चव्हाण नव्हते. संप्रदाय म्हणजे गुरू आलाच. असा सांप्रदायिक गुरू अथवा पंथ चव्हाणांना नव्हता.
शेवटपर्यंत ते काँग्रेस पक्षाचे होते. तरी विरोधी पक्षातही त्यांचे मित्र असत. त्यांची पक्षीयता ‘आकुंचित’ नव्हती. त्यांच्या भाषणात व लेखनात स्वत:ची स्तुती अथवा आत्मगौरव नसे. पुष्कळांची मने त्यांनी जिंकली व पुष्कळांकडून झालेली टीका पचवली. सामान्य शेतक-याचा मुलगा भारताचा उपपंतप्रधान होतो, ही मोठी घटना वाटते. कार्याधिक्य, गुणाधिक्य, परिणामाधिक्य यादृष्टीने चव्हाणांचे चरित्र व कार्य सर्वांनाच मार्गदर्शन करणारे आहे.
(यशवंतरावांच्या समाजकारणाचा शोध व बोध घेण्यासाठी “कृष्णाकाठ” हे त्यांचे आत्मचरित्र उपयोगात आणले आहे व विवेचनासाठी जे आधार घेतले आहेत. त्यापुढे कंसात पृष्ठे नमूद केली आहेत.)