येथे कोणावर टीका करावयाची नाही. पण इतिहास जसा झाला तसा लिहावा लागतो. उदा. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर्कतीर्थ यशवंतरावांच्या बाजूचे राहिले व दोघेही ‘अत्रे’ यांच्या तीव्र टीकेचे विषय झाले. हा विषय येथे मी व्यक्त करीत आहे, म्हणजे तर्कतीर्थांना विरोध करीत आहे असे नव्हे. वाचकांनी क्षमा करावी. मी स्वत: (रा. ना. चव्हाण, वाई) तर्कतीर्थांना गुरूस्थानी – मानणारा आहे. महर्षी शिंदे यांच्याप्रमाणे त्यांच्या (तर्कतीर्थांच्या) दृढ सहवासाचा माझ्यावर फार परिणाम झाला व मी जो लेखनमार्ग विद्यार्थीदशेपासून स्वीकारला, तो त्यांच्याशी आलेल्या वडिलार्जित संबंधामुळे उत्तरोत्तर उन्नत होत गेला. यशवंतराव असामान्य होते. तर्कतीर्थ देखील असामान्य आहेत.
यशवंतरावांना मी (प्रस्तुत लेखक) समाज प्रबोधनार्थ लिहीत असतो हे माहित होते व त्यांनी माझ्या लेखांचा संग्रह निघावा असाही विचार दिल्लीच्या भेटीत प्रदर्शित केला. सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्यांचे हे प्रोत्साहन महत्त्वाचे वाटले.
अधूनमधून आठवणींचा व त्यांच्या समक्ष दर्शनाचा आधार येथे घेतला आहे. याचे कारण त्यांचा स्वभाव कसा मोकळा होता, हे समजावे हा हेतू होता.
यशवंतराव, किसन वीर व तर्कतीर्थ हे काँग्रसचे दत्तात्रेय (त्रिमूर्ती) ठरतात. एकाच वेळी, तिघे व्यासपीठावर आलेले व बसलेले अनेक वेळा पाहिले आहेत. ऐकिले आहेत. ही सर्व महत्त्वाची राजकीय माणसे.
यशवंतरावांच्या भाषणामुळे समाजशिक्षण झाले. बहुजन समाजाला राष्ट्रीय दृष्टी मिळाली. त्यांनी म. फुले, शाहू महाराज, कर्मवीर शिंदे यांचा विचारप्रवाह पुढे व्यापक केला. उन्नत केला. भर घातली. आभरण घातले. यशवंतरावांचा विचार अखिल भारतीय पातळीवरून होणे जरूर आहे. तरी त्यांचे नवमहाराष्ट्राच्या विकासाच्या कार्यात संस्थापनीय स्थान आहे. यशवंतराव विवेकवंतात सामावले होते.
केवल ब्रह्मद्वेष बाजूला पडला; व मूळ म. फुले यांचा मानवतावादी आशय पुढे येण्यास वातावरण खुले झाले आहे. यशवंतरावांमुळे मद्रास-तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढला नाही. उलट, मागे पडला. यशवंतरावांवर लिहिता येथे श्रीमंत सयाजीवर गायकवाड यांची आठवण होते. सयाजीराव नेमस्तकाळात राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सयाजीवर गायकवाड हे गरिबीतून पुढे आले. त्याप्रमाणे यशवंतरावही पुढे आले. सत्तेचा दोघांनीही चांगला वापर केला. साहित्यादी गुण दोघांतही होते. विदवान-पंडितांचा परामर्ष दोघांनीही घेतला. उमदेपण, उदारपण, जातीभेदापलीकडची मानवतावादी दृष्टी दोघांतही होती. उत्तम राज्यकर्ते व प्रशासक अशी दोघांची ख्याती झाली. ‘दलितोद्धार’ हा दोघांचाही विषय होता.