• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (84)

१६. आजवरच्या वाटचालीमागील माझी भूमिका

'केसरी' १० मार्च १९७४
अंकातील मुलाखतीच्या आधारे

देश, देशातील लोक, त्यांचे जीवन आणि त्यांच्या समोरची संकटे यांचा विचार सर्वांनाच विधायक दृष्टिकोण ठेवून करावा लागेल. संकटे व्यक्तिगत असोत वा राष्ट्राच्या जीवनातील असोत, ती कसोटी घेण्यासाठीच येत राहतात. अशा वेळी विचाराने दृढ आणि कृतीने स्थिर राहूनच त्यांतून निभावून जायचे असते. इतरांना न्यायचे असते. काँग्रेसपक्षावर याची जबाबदारी काहीशी अधिक. सुखावर लक्ष ठेवून किंवा सुखाच्या वेळीच फक्त एकत्र यायचे, एकत्र बसायचे आणि संकटाचे वेळी दोषदिग्दर्शनासाठी कुठे तरी बोट दाखवीत स्वत:ची जबाबदारी झटकायची, किंवा दिसेल तो रस्ता धरायचा, हे काही प्रशस्त नाही. या कातडीबचावू मार्गाचे समर्थन करावयाचे आणि इतरांनाही त्याची महती सांगायची, या क्रियेला, विचाराला किंवा प्रवृत्तीला विधायक कोण म्हणेल? देशात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा खोलवर विचार करून उत्तरे शोधावी लागणार आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांचा आपल्या कृतीशीही मेळ घालावा लागणार आहे.

गरिबी हा सामाजिक व आर्थिक रोग आहे आणि गरिबांच्या प्रयत्नांनीच तो निपटून काढला जाऊ शकतो, असा विश्वास 'गरिबी हटाव' घोषणेच्या मुळाशी आहे. गरिबी हटविण्याचा विश्वास आणि निर्धार गरिबांमध्ये निर्माण करणे, हेच या कार्यक्रमाचे मूळ सूत्र आहे. गरिबी हटविण्यासाठी राजकीय दृष्ट्या काही मांडणी करून कार्यक्रम तयार केला आणि तो समोर ठेवला, तर जनतेत चैतन्यशक्ती निर्माण करता येते हा यातील प्रमुख विचार आहे. या विचाराचे बीजारोपण त्या घोषणेने केले आहे, हे निश्चित. ही घोषणा आणि हा विचार, म्हणजे नव्या क्रांतीचे बीज आहे. हितसंबंधी मंडळी हे ओळखून आहेत. ही घोषणा ऐकायला ठीक आहे, पण त्यामुळे गरिबी हटली का? असा सवाल हा हितसंबंधी वर्ग कुत्सितपणाने करीत असतो. 'गरिबी हटाव' घोषणा करून सारी फसवणूक चालली आहे, असेही हा वर्ग सांगत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे, की गरिबी जाऊच शकत नाही, असेच या हितसंबंधी वर्गाला सुचवावयाचे आहे. पूर्वापार चालत आलेला विचार नव्या परिस्थितीत त्यांना आजही त्याज्य वाटत नाही. 'गरिबी हटाव' घोषणेची हेटाळणी करण्यामागे, पूर्वापार चालत आलेली गरिबी कायम ठेवणे, किंबहुना ती वाढविणे हेच त्यांच्या विचारांचे सूत्र आहे. हितसंबंधीयांच्या मतलबी टीकेने भाळणाऱ्यांना हे समजून घ्यावे लागेल.

काँग्रेस पक्ष हा पुढील काळात ख-या अर्थाने गरिबांचा पक्ष झाला पाहिजे. या पक्षाचा नेता कोण आणि समाजाच्या कोणत्या स्तरावरचे तो प्रतिनिधित्व करीत आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ते सामर्थ्य काँग्रेस पक्षाच्या अंगी आहे का, हेही तपासून पाहावे लागेल. याचा स्पष्ट अर्थ असा, की ज्यांची गरिबी हटवायची, त्यांचे प्रतिनिधित्व करणारे नवे नेतृत्व त्याच वर्गातील नव्या पिढीमधून तयार केले पाहिजे. छोटा शेतकरी, शेतमजूर, दलित, हरिजन व कामगार यांचे नेतृत्व करणारे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षात जास्तींत जास्त वाढले पाहिजे. नव्हे, तसे ते वाढवावेच लागेल. कारण हे नवे नेतृत्वच देशात समाजवाद प्रस्थापित करील. छोटे शेतकरी, शेतमजूर, दलित वर्ग यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्षाच्या रचनेत बदल करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.