• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (72)

लोकशाही-रक्षणाच्या आव्हानाबाबतही आपल्याला विचार करावयास हवा. लोकशाही मार्गावर विश्वासच नसलेला एक गट, तर दुसरा एक गट असा आहे, की गाऱ्हाणी पुढे करायची आणि ती नाहीशी करण्याच्या मागणीसाठी हिंसेचे मार्ग धरायचे. लोकांना आपली गाऱ्हाणी मांडण्याबद्दल किंवा त्यांचा आग्रह धरण्याबद्दल कुणाचाही विरोध असायचे कारण नाही. पण हिंसेचा मार्ग पत्करून लोकशाहीला धोका उत्पन्न होऊ द्यावयाचा, याचा विचार आपणच करावयास हवा आहे.  लोकशाही समाजात प्रतिकार हा आवश्यक आहे. किंबहुना लोकशाहीचे ते एक पवित्र अंग मानले गेले आहे; पण प्रतिकार, असंतोष हे व्यक्त करण्याचे काही लोकशाही संकेत असावेत, की नाही? ते असले पाहिजेत, असे मला वाटते. हिंसात्मक मार्गानेच समाजाचे स्थित्यंतर होईल वा परिवर्तन होईल, अशी श्रद्धा बाळगून राजकीय गट वावरू लागले, तर देशाला तो एक मोठा धोका आहे. कदाचित हा धोका आज लहान प्रमाणात असेल. पण तो उपेक्षिण्यासारखा मात्र नाही. या बाबतीत खरे म्हणजे लोकशाही समाजवादाला बांधून घेतलेल्या राजकीय पक्षांनीच आपली जबाबदारी ओळखायला हवी. देशातील वातावरणात लोकशाही मार्गानेच बदल घडू शकतो किंवा समाज गतिमान होऊ शकतो.  म्हणून लोकशाही मार्ग हा हिंसात्मक मार्गापेक्षा श्रेष्ठ आणि हिताचा मार्ग आहे, हे नव्या काँग्रेसला दाखवून द्यावे लागेल. त्याचसाठी निश्चित विचार आणि निश्चित कार्यक्रम यांवर ही काँग्रेस स्थिर होत आहे, ही समाधानाची बाब आहे.

या काँग्रेसला राजकीय कारणासाठीही देशातील लोकमत जागृत करावे लागणार आहे. पुढील दशक हे देशाच्या जीवनातील निर्णायक दशक ठरणार आहे. शांतता टिकून विकासाचा वेग वाढेल आणि लोकांच्या विकासाबद्दलच्या आशाआकांक्षा लक्षात घेऊन कारभारयंत्रणा लोकाभिमुख बनेल, हे पाहिले पाहिजे. देशाची आजची स्थिती ही गेल्या वीस वर्षांतील धोरणातून निर्माण झालेली आहे, हे नाकारून चालणार नाही. यामध्ये बदल करणे आवश्यक ठरले आहे. कारण सामाजिक आणि आर्थिक विकासात नित्य नवे तणाव तयार होत आहेत. राष्ट्रउभारणीच्या कार्यात जातीयवादाचा अडसर उभा आहे. हे जातीयवादी अडसर मधून मधून हिंसात्मक संघर्ष उभे करीत आहेत. राष्ट्राचा पाया, नागरिकत्व, समान हक्क आणि समान कर्तव्य ही देशातील जनतेला पटवून द्यावी लागणार आहेत. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातच वस्तुत: ही भूमिका आपण मान्य केलेली आहे. परंतु पुन्हा एकदा लोकांना सांगावे लागणार आहे. लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी नवी काँग्रेस लोकांना बरोबर घेऊन, लोकांच्या बरोबर राहून जास्तींत जास्त प्रयत्न करील, अशी माझी श्रद्धा आहे.