• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (58)

हजारो निरपराध जीवांची हत्या व मालमत्तेची नासधूस करणारे जातीय दंगे या समस्येची दु:खद आठवण आपल्याला नेहमी करून देतात. धर्मातीत तत्त्वावर आपण या राष्ट्राची पुनर्रचना आद्यापि करू शकलो नाही, याचे स्मरण त्यामुळे सतत होते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की भारतीय राष्ट्रवादाचा आधार कोणताही विशिष्ट धर्म हा नसून समान नागरिकत्व, समान अधिकार व समान कर्तव्ये हा आहे. या देशात विशेष अधिकार असलेले कोणतेही नागरिक नाहीत. भारतीय प्रजासत्ताकाचे समान नागरिकत्व हेच राष्ट्राच्या विविधतेचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात व त्यानंतर आपण राष्ट्रवादाच्या आधुनिक काळात हेच निधर्मी तत्त्व अंगीकारले. हे एका विशिष्ट धर्माचे वा संस्कृतीचे प्रभुत्व मानणा-या राष्ट्रवादाशी पूर्णपणे विसंगत आहे. परंतु दुर्दैवाने आपल्यांतील काही लोकांना हे पटत नाही. धर्म व राष्ट्र हे एकच आहे, असे ते मानतात. धर्मनिष्ठ राष्ट्रवाद व धर्मातीत राष्ट्रवाद यांच्या संघर्षातून काय घडेल, ते आपल्याला माहिती आहेच. पण फाळणीनंतरही भारत हे बहुधर्मी, परंतु धर्मातीत राष्ट्र म्हणून आपण मानले आहे. ती आमची अढळ निष्ठा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये धर्मातीत राष्ट्रवादावरील आपल्या श्रद्धेची परीक्षा अनेकदा घेतली गेली आहे. ती श्रद्धा डिवचण्याचा पाकिस्तानने सतत प्रयत्न चालविला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी, की अन्य धर्मीयांशी संघर्ष निर्माण करून, धर्मातीत राष्ट्रवादावरील आपली अश्रद्धा काही लोकांनी वारंवार सिद्ध केली आहे.

धर्मातीत राष्ट्रवादाची निष्ठा वाढीला लावल्याखेरीज आणि जातीयवादाचे विष नाहीसे केल्याखेरीज भारत हा राष्ट्र म्हणून तगू शकणार नाही, याबद्दल माझी खात्री आहे. स्वातंत्र्य-लढ्यात या धर्मातीत राज्यकल्पनेसाठी त्या काळच्या नेत्यांनी आपले पुरेसे बौद्धिक परिवर्तन जरी घडवून आणले होते, तरीही काही जुन्या प्रवृत्ती व मूल्ये अद्यापि समाजाच्या काही घटकांमध्ये मूळ धरून आहेत, असे दिसते. त्यामुळे समाज व सरकार यांच्या प्रश्नाकडे धर्मातीत दृष्टीतून पाहण्याची प्रवृत्ती आपण समाजात सर्वथैव निर्माण करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मला वाटते, की येणा-या दशकात या दृष्टीने दोन दिशांनी दृढतापूर्वक प्रयत्न करावे लागतील. पहिली गोष्ट अशी, की सर्व राजकीय पक्षांना जातीय दंगे टाळण्यासाठी शासनाशी सहकार्य करावे लागेल. त्यासाठी जातीय भावना व द्वेष वाढवीत राहून लोकांना हिंसाचारास प्रवृत्त करणा-या शक्तींशी सामना देण्यासाठी सरकारशी सहकार्य करावे लागेल. पण याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपल्याला ध्येयवादाच्या संघर्षात समान आघाडी उभारावी लागेल. धर्मातीत राष्ट्रवादाचे तत्त्व समाजामध्ये प्रसृत करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावे लागतील. साहित्य, चित्रपट, नाट्य, शाळा व विद्यापीठे या माध्यमांतून हा प्रसार आपल्याला करता येईल. लोकांना पटवावे लागेल, की मिथ्या राष्ट्रवादाचे दिवस आता संपले आहेत. हिंदुराष्ट्र किंवा हुकमत-ए-इलाही या दोन्ही कल्पनांशी बौद्धिक पातळीवर आपल्याला लढावे लागेल व लोकांना धर्मातीत राज्यसंस्थेच्या कल्पनेकडे वळवावे लागेल. मला वाटते, की या गोष्टीकडे जितके लक्ष द्यावे, तितके देण्यात आलेले नाही. भूतकाळातच ज्यांचे विचार सर्वथा रमलेले आहेत, त्यांच्याशी बौद्धिक सामना दिल्याखेरीज धर्माच्या नावावर केला जाणारा विफल संघर्ष भविष्यकाळात आपण टाळू शकणार नाही. येत्या दशकात या आव्हानाला आपल्याला उत्तर द्यावयाचे आहे.