देशात किंवा देशाच्या संदर्भात घडणा-या घटनांचे अर्थ आपण नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आजकाल ताश्कंद कराराविषयी किंवा शास्त्रीजींच्या निधनाविषयी बोलताना काही राजकीय पक्ष 'ध' चा 'मा' करून बोलताना आढळतात. ताश्कंदचा करार झाला, त्यामध्ये रशियाच्या सामर्थ्याची प्रचीती आली. कम्युनिस्ट राष्ट्राने दोन बिगरकम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये समझोता घडवून आणला. त्यांच्या डोक्यात वाईट गोष्टी येण्याचे कारण काय? पण या करारासंबंधी बोलताना मनात शंका बाळगून काहीजण बोलतात. ताश्कंद करार काही कोणी कोणाच्या दडपणाने स्वीकारलेला नाही. त्यात उलट-सुलट प्रदीर्घ चर्चा झाल्या. डावपेचाच्या गोष्टी झाल्या. ताश्कंदचा करार स्वीकारला, याचा अर्थ पाकिस्तानचा हृदयपालट झाला, असे आम्ही कधीच मानले नाही. काश्मीर प्रश्नाबद्दल या दोन्ही राष्ट्रांत पूर्व पश्चिमेइतकी विरोधी मते आहेत, असे ध्यानात घेऊनच करारावर सह्या झाल्या. करार न स्वीकारणे हे हिंदुस्थानला शोभले नसते. ते हिताचेही नव्हते. आजही ताश्कंद करार मोडण्यात आमचा फायदा नाही. पाकलाही हा करार मोडावयाचा झाला, तर पुन्हा आक्रमणच करावे लागेल. भाषणबाजी फार तर करीत असतील; पण त्यामुळे करार मोडला गेला, असे नव्हे. याबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. पाकशी मैत्री ठेवण्याची आमची इच्छा आहे; पण त्यासाठी काश्मीरचा सौदा झाला पाहिजे, असे कोणी म्हणेल, तर त्याला आमचा साफ नकार आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी नुकत्याच अमेरिकेत जाऊन आल्या. त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. आता पुन्हा फाळणी नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. धर्मातीत लोकशाहीच्या कल्पनेचा भारतासारख्या मोठ्या देशात पराभव झाला, तर जगातील लोकशाहीच नष्ट होईल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
पाकिस्तानने पुन्हा भारताच्या भूमीत घूसखोर पाठविले आणि कटकटी निर्माण केल्या, तर काय करणार, असा प्रश्न विचारला जातो. पण ताश्कंद करार या संकटाला तोंड देण्याच्या आड येण्याचे कारण नाही. असे घूसखोर पुन्हा आले, तर भारत समर्थपणाने हत्यार चालवील. राष्ट्र म्हणून जगताना सामर्थ्य हे टिकविले गेलेच पाहिजे अशी, आमची भूमिका आहे. आम्ही युद्धखोर नाही. पण आमची त्याचबरोबर संरक्षण-भूमिकाही स्पष्ट असली पाहिजे.
अंतर्गत शक्तिसामर्थ्य हा आज देशापुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नागा, मिझो यांसारख्यांचे बंड झाले, तर बाहेरची मदत मागता येणार नाही. यासंबंधी बाहेर बोलताना मान खाली घालावी लागते. देशातील मधुचंद्राचा काळ संपला आहे. विवाहानंतर मधुचंद्राचे काही दिवस गेल्यावर मीठ-मिरचीचा विचार जसा करावा लागतो आणि दैनंदिन कौटुंबिक जीवन सुरू करावे लागते, त्याचप्रमाणे आता देश आणि देशासमोरचे प्रश्न आम्ही वास्तवतेने समजावून घेऊ लागलो आहोत. त्या दृष्टीने हा एक कठीण काळ आहे. राजकीय नेत्यांनी गंभीरपणाने बोलण्याचा आणि वागण्याचा हा काळ आहे.