• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (18)

चीनचे त्या लष्करी आक्रमणामागचे हेतू काही अंशी खरे ठरले. लढाईनंतर अंतर्गत परिस्थिती बदलली, देशात महागाई वाढली. बाहेर देशांची आर्थिक मदत कमी झाली, हे खरे; परंतु त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची आमची भावनाही दृढ झाली, हे विसरून चालणार नाही.

आमचा दुसरा शेजारी पाकिस्तान. इतर मुस्लिम राष्ट्रांशी पाकिस्तानची दोस्ती जमली, तर समजू शकते. पण चीनशी मैत्री कशासाठी, हे समजत नाही. पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राष्ट्र. कम्युनिझम हे काही त्याचे ध्येय नव्हे. चीनशी त्याचा धर्माचा किंवा कम्युनिझमचा कसलाच दुवा नाही. तरीही ते एकत्र येतात. याचा अर्थच हा, की भारताबद्दलची विरोधी भावना हा त्या दोघांना जोडणारा समान दुवा आहे. राष्ट्रांशी मैत्री मूलभूत तत्त्वावर किंवा सिद्धांतावर जडलेली असेल अथवा आधारलेली असेल, तरच ती टिकू शकते. निव्वळ द्वेषावर आधारलेली मैत्री दीर्घकाल टिकणे अशक्य आहे.

या दोन्ही राष्ट्रांना भारत हे एक मोडू शकणारे दुर्बल राष्ट्र आहे, असेच वाटते. त्यांचे हे म्हणणे खरे आहे काय, हेही आपण तपासून पाहिले पाहिजे.

गेल्या सप्टेंबरमध्ये भारत-पाक युद्धाचे वेळी देशातील परिस्थिती तशी चिंताजनक वाटत होती. बंगाल बंद, केरळ बंद, मुंबई बंद, अशी वावटळ सुरू झाली होती. पंजाबी सुभ्यासाठी संत फत्तेसिंग यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. काही शहरांतून जातीय दंगलींनी उचल खाल्ली होती. पुण्यात त्यावेळी अशी एक दंगल उडाली. देशात एक प्रकारची अंतर्गत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण पाकिस्तानचे आक्रमण झाले आणि सबंध ५० कोटींचा देश एकसंध उभा राहिला. नाग फणा काढून उभा राहावा, असे दृश्य त्यावेळी दिसले. जातिभेद, पंथभेद, राजकीय मतभेद, महागाई, आर्थिक ओढाताण असे सर्व मतभेद आणि वाद बाजूला पडले व देशाचे संरक्षण व तेही एकवटून करणे, एवढेच एक ध्येय उरले.

पण त्यानंतर लढाई थांबवली, ताश्कंद करार झाला आणि पुन्हा 'ये, रे,माझ्या मागल्या' सुरू झाले आहे. 'बंद' भाषा पुन्हा सुरू झाली आहे. नशीब बंद होण्याची वेळ आली, तरी ही बंद भाषा चालूच आहे. लोकशाही राष्ट्रात अंतर्गत भांडणे असतात, हे मान्य, पण त्या भांडणांचे स्वरूप देशाची शक्ती वाढविण्यासाठी असते. त्यांतून भावात्मक शक्ती पाहिजे तशी वाढवता येते.

आमच्या देशावर चीनने आणि पाकिस्तानने हल्ला केला, तर तुम्ही काय करणार, असे कोणी मला विचारतात. काय सांगणार मी त्यांना? या दोघांबरोबर लढूच लढू. पण त्याबरोबर देशातील एकात्मता कशी वाढेल आणि टिकेल, हेही पाहिले पाहिजे. देश समर्थ बनविणे, हे लढण्याअगोदरचे महत्त्वाचे कार्य आहे. आम्ही लढण्यासाठी आम्हांला कोणी मदत करील, म्हणून स्वस्थ राहून चालणार नाही.

संरक्षण-साहाय्य मिळविण्यासाठी मी अमेरिका, इंग्लंड व रशिया या तीन देशांचा दौरा केला. संरक्षण-मदतीबद्दल मी तेथे चर्चा केली. त्या देशांनी थोडीफार मदत दिलीही. पण ही चर्चा करीत असताना, भारताला काय द्यावयाचे नाही, याचा निर्णय त्यांनी अगोदर केलेला होता, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा ख-या अर्थाने संरक्षणाची तयारी आपली आपणच केली पाहिजे, असा आपला निर्धार हवा. चीन हा सबंध भारत जिंकण्यासाठी मोठी झेप घेईल, असे नव्हे. तो त्रास देईल. सीमेवर कटकटी निर्माण करील, पाकिस्तानशी संधान बांधून काही कुरापत काढेलही, पण सहजासहजी आता भारताशी धक्काबुक्की त्याला करता येईल, अशी परिस्थिती राहिलेली नाही. आपले सैन्य चांगले पराक्रमी आहे. कोणी हल्ला केल्यास त्यापासून देशाचे संरक्षण करण्याची त्याची मोठी हिंमत आहे. पण या सैन्याच्या सामर्थ्याबरोबरच देशातील जनमनाचे सामर्थ्य कसे पक्के करता येईल, हे पाहिले पाहिजे.