४. राष्ट्राचे सामर्थ्य
कऱ्हाड येथे ८ एप्रिल १९६६ रोजी झालेल्या भाषणाच्या आधारे.
स्वराज्य मिळाले, त्याला आता १८ वर्षे झाली. त्यांतला १५-१६ वर्षांचा काळ हा जणू काही मधुचंद्रासारखा गेला. एक बलाढ्य भूभाग असलेला देश स्वतंत्र झाला, याबद्दल सर्वत्र वाहवा सुरू झाली होती. दुसरे महायुद्ध संपले होते आणि जगाला शांततेची आवश्यकता वाटू लागली होती. सर्वत्र शांततेची हवा होती. आम्हीही जागतिक शांततेचाच पुकारा सुरू ठेवला होता. आम्ही जगाला शांतीचे संदेश देत होतो. ते ऐकले जात आहेत, असे वाटत होते. मोठी प्रगती झाली, असे आम्हांला वाटत होते; पण ते खरे नव्हते. शांततेचा अर्थ आम्हांला कळलाच नव्हता, कारण खरी लढाई आम्ही पाहिली नव्हती.
आजच्या दुनियेत दोन प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. जगात शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असे आज बडी बडी राष्ट्रे म्हणत आहेत. संहार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, त्यांनाच शांततेची गरज अधिक भासत आहे, असे दिसते. रशिया, अमेरिका यांसारखी बलाढ्य राष्ट्रे आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण आहेत; परंतु शत्रूचा नाश करावयास जाणारी शस्त्रे व अस्त्रे आपला स्वत:चाच नाश करतील, असे त्यांना वाटते. त्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्रांचे शांततेच्या संदर्भात हितसंबंध एकच आहेत, असे दिसते.
१९६२ साली चीनचा भारतावर हल्ला झाला, त्यावेळी व नंतरही जागतिक शांततेला धोका निर्माण झाला होता. भारताप्रमाणेच क्यूबामधील परिस्थितीने सा-या जगाचे लक्ष त्यावेळी वेधून घेतले होते. 'वॉटरशेड ऑफ हिस्ट्री' ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे शिखरावरून कोसळणारे पाणी, आता या बाजूला जाते, की त्या बाजूला जाते, अशी ती परिस्थिती होती. महाबळेश्वरला, आर्थर पॉइंटजवळ पाच नद्या एकत्र येतात. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या त्या डोंगराच्या टोकावरून एकत्र आल्याने तेथे 'वॉटरशेड' अवस्था तयार झाली आहे. तशीच काहीशी ही अवस्था होती.
युद्ध, की शांतता, असा त्यावेळचा निर्वाणीचा सवाल होता. चीन हे त्यावेळी युद्धखोर राष्ट्र होते आणि आजही आहेच. युद्ध नको, अशी भूमिका चीनने स्वीकारली, तर त्याला आपली महत्त्वाकांक्षा पुरी करता येणार नाही.
२० नोव्हेंबर १९६२ रोजी मी दिल्लीला गेलो, त्यावेळी मोठे भयानक चित्र निर्माण झाले होते. तेथे जाऊन काय करणार, असे मला वाटत होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही नाही आणि संरक्षण-मंत्रिपदही अधिकृतपणे स्वीकारले नाही, असा एक दिवस मुंबईत होतो. काही परिचित मित्र मला त्या दिवशी भेटले. दिल्लीस जाऊन या परिस्थितीत काय करणार, असे सचिंत होऊन गंभीर होऊन त्यांनी विचारले. मी दिल्लीला पोहोचलो, त्यादिवशीही परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.
'येथे या परिस्थितीत कशाला आलात', असे मला दिल्लीतल्याही माझ्या काही मित्रांनी विचारले. पण योग असा, की मी दिल्लीत आलो, त्याच्या दुस-या दिवशीच चीनने आपले सैन्य मागे घेतले व लढाई थांबली.