• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (15)

रणांगणावर लढताना, संकटाच्या छायेखाली वावरताना, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाताना भारतीय सैन्याच्या या आदर्श राष्ट्रीय ऐक्याचा अनुभव गेल्या वीस वर्षांत भारताने घेतला आहे. त्या पराक्रमाचा, सेवाबुद्धीचा भारतीय नागरिकाला अभिमान वाटतो, हेही १९६५ साली भारतीय जनतेने जे सैनिकांचे कौतुक केले, त्यावरून दिसले. भारतीय सैन्याची ही कामगिरी जितकी महत्त्वाची, तितकीच त्यात जोपासली जाणारी राष्ट्रीय प्रवृत्तीही महत्त्वाची आहे.

आधुनिक शस्त्रास्त्रे, किंवा रणनीती ही देशाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत. पण मजबूत, विशाल भारतीय मन हीही भारतीय सैन्याची अभेद्य अशी शक्ती आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे. ते मन अभंग असल्यामुळेच जगातील कोणतीही दुष्ट शक्ती आपल्याला पराभूत करू शकणार नाही.

भारतीय सैनिकांनी या देशातील नागरिकांविषयी जशी राष्ट्रीय भावनेने आस्था बाळगली पाहिजे, तसेच नागरिकांनीही सैन्याकडे कौटुंबिक भावनेने पाहिले पाहिजे. रक्त गोठविणा-या हिमालयाच्या थंडीत, उष्णतेने भाजून काढणा-या राजस्थानच्या सीमेवर किंवा आसामच्या किर्र झाडीत आपल्या सीमेचे रक्षण करीत उभा असलेला भारतीय सैनिक आपल्या विशाल कुटुंबाचा घटक आहे, या भावनेने आपण वागले पाहिजे. त्याच्याशी आपले नाते कृत्रिम नाही, कौटुंबिक जिव्हाळ्याचे आहे, असे मानले, तर भारतीय सैनिकाच्या खडतर जीवनात त्याला मोठा आधार वाटेल.

प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात सैन्याचे संचलन पाहताना ही भावना उचंबळून आली, तर त्याचे सार्थक होईल. त्यात कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. कारण आपण शांतपणे झोपावे, म्हणून तो जागत असतो. आपण सुरक्षित असावे, म्हणून तो धोक्याचे जीवन पत्करीत असतो. भारतीय नागरिक आणि भारतीय सैन्य यांच्यांतील हे जिव्हाळ्याचे संबंध हीसुद्धा भारतीय प्रजासत्ताकाची मोठी शक्ती ठरेल. भारतीय प्रजासत्ताक राज्याचा उत्सव करताना या सर्व विचारांची आठवण ठेवली पाहिजे. हा केवळ रोशनाईचा उत्सव नव्हे. आपल्या देशाची जबाबदारी आपल्यावर आहे. ती कोणती आहे, हे समजावून घेण्याचा प्रयत्न करून त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. कारण प्रत्येक नागरिकाचे वर्तन कसे आहे, यावरच आपल्या राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.