• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (126)

अलिप्ततावादी आंदोलनाला लाभत चाललेल्या वाढत्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर १९६१ मध्ये बेलग्रेड येथे अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली शिखर परिषद बोलाविण्यात आली. बेलग्रेड येथील पहिल्या शिखर परिषदेला सदस्य म्हणून पंचवीस देश उपस्थित राहिले. त्यांपैकी तेरा आशियाई देश होते. या पहिल्या परिषदेनंतर या आंदोलनाची कक्षा सतत विस्तारत राहिली. नंतरच्या शिखर परिषदा कैरो (इजिप्त) येथे १९६४ मध्ये, लुसाका (झांबीया) येथे १९७० मध्ये आणि आल्डोयर्स (आंजेरिया) येथे १९७३ मध्ये भरल्या. या प्रत्येक परिषदेच्या वेळी अलिप्ततावादी देशांची संख्या वाढत होती. कोलंबो येथे १९७६ च्या ऑगस्टमध्ये भरलेल्या पाचव्या शिखर परिषदेमध्ये संपूर्ण सदस्य म्हणून ८६ देशांनी, निरीक्षक म्हणून १० देशांनी व निमंत्रित म्हणून ७ देशांनी भाग घेतला. अलिप्ततावादाचे महत्त्व आणि परिणामकारकता किती आहे, हे या आंदोलनाला द्रुत गतीने लाभलेल्या वाढत्या पाठिंब्यावरून दिसून येते. तसेच या आंदोलनामागील धोरण आणि कार्यक्रम यांची निर्विवाद उपयुक्तताही सिद्ध होते.

गेल्या वीस वर्षांमध्ये अलिप्ततावादी आंदोलनाने काय साध्य केले? तिची ध्येये आणि उद्दिष्टे कोणती आहेत? दुस-या महायुद्धाच्या विनाशकारी आघातातून स्वत:ला सावरणा-या आणि नवोदित देशांची संख्या सतत वाढत चाललेल्या जगाला, अलिप्ततावादी आंदोलनाच्या रूपाने, मानवजातीला अत्यावश्यक असलेल्या शाश्वत आणि अर्थपूर्ण शांततेचा आशादीप दिसला. नवस्वतंत्र देशांचे स्वाभाविक आणि प्रामाणिक राष्ट्रिय हितसंबंध हेच आंदोलनाला सुरक्षित ठेवू शकतात, हे सिद्ध झाले. कारण अविरत कष्टांनंतर लाभलेल्या राष्ट्रिय स्वातंत्र्याचे जतन आणि संवर्धन करण्याची क्षमता या आंदोलनात आहे.

आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आणि आर्थिक नि सामाजिक विकासाच्या मार्गाने हे स्वातंत्र्य प्रत्यक्ष आणि अर्थपूर्ण करणे हाच या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या देशांचा दृढ निश्चय असल्यामुळे अलिप्ततावादाला आज चिरस्थायी महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून लष्करी करार आणि आघाड्या यांच्या किंवा वसाहतवादी आणि साम्राज्यवादी शक्तींच्या धोक्यांपासून नवस्वतंत्र देशांना सुरक्षित ठेवण्याचे कार्यच केवळ अलिप्ततावादाने पार पाडले आहे, असे नसून, या आंदोलनाने राष्ट्रिय स्वातंत्र्याचे जतन आणि जागतिक शांततेची ग्वाही ही विधायक कामगिरीही बजावली आहे.
अलिप्ततावाद ही अकारणात्मक, स्थितिशील किंवा नकारात्मक संकल्पना नाही, हे गेल्या काही वर्षांत अलिप्ततावादाचा जो विकास झालेला आहे, त्यावरून स्पष्ट होते. उलटपक्षी, या काळात अलिप्ततावादी आंदोलनाला जे यश लाभले, ते म्हणजे बदलत्या आंतरराष्ट्रिय परिस्थितीशी हे आंदोलन किती सुसंवादी आहे, याचा पुरावाच ठरते.

वेगवेगळी रूपे घेणा-या वसाहतवादाविरुद्ध आणि साम्राज्यवादाविरुद्ध लढण्याचे एक प्रभावी साधन म्हणून अलिप्ततावादी आंदोलनाने आपले सामर्थ्य प्रकट केले आहे. त्याचप्रमाणे नववसाहतवादी परकीय वर्चस्वामुळे राष्ट्राराष्ट्रांमध्ये जे विषम संबंध निर्माण होतात, त्यांमुळे उद्भवणा-या समस्यांविरुद्धही या आंदोलनाने झुंज घेतली आहे. परदेशांकडून येणा-या दबावाचा विचार करण्याची शक्ती या आंदोलनाने नवस्वतंत्र देशांना पुरविली, ही तर आंदोलनाच्या दृष्टीने जमेची मोठीच बाजू आहे.