• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (118)

नेहरू, टीटो, नासर यांनी मांडलेली पंचशील तत्त्वे बांडुंग परिषदेच्या वेळी जेवढी महत्त्वाची होती, तेवढी ती आजही तितकीच महत्त्वाची आहेत. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार सुरुवातीस अगदी थोड्या राष्ट्रांनी केला. पण आज शेकडो राष्ट्रांनी तो स्वीकारलेला आहे, ही गोष्ट त्या विचारांच्या तत्त्वांची आणि उद्देशांची आजच्या काळात किती गरज आहे, हेच दाखवून देते. अलिप्ततावादाच्या भूमिकेवरून स्वतंत्र व पुरोगामी परराष्ट्र-नीती आखण्याचे मूलभूत तत्त्व भारताने स्वीकारले आहे व त्याचे निर्धारपूर्वक पालनही केले आहे.

बांगला देशाच्या नव्या राजवटीने भारताशी झालेले व इतर आंतरराष्ट्रिय करार सन्मानपूर्वक पाळण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या धोरणाचे आम्ही स्वागतच केले आहे. या उपखंडात समानतेच्या भूमिकेवर परस्पर हितसंबंध ध्यानात घेऊन कोणाही राष्ट्राच्या सार्वभौम हक्कांमध्ये किंवा त्यांच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचे धोरण ठेवले पाहिजे. बाहेरील राष्ट्रांचा हस्तक्षेप बिलकूल होऊ न देता तडजोडीने व चर्चेने आपसांतील प्रश्न सोडविले पाहिजेत, हीच नीती यशस्वी होऊ शकेल. सिमला कराराचा हाच अर्थ मला तरी अभिप्रेत आहे.

धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हे भारताच्या दृष्टीने एक अत्यंत मूलभूत असे तत्त्व आहे व भारत त्याचे पालन अत्यंत प्रामाणिकपणाने व निश्चयाने करीत आहे, कारण त्या मूलभूत तत्त्वांवर भारताची श्रद्धा आहे. धर्मभावना राजकीय विचारांच्या आड येऊ देणे चुकीचे आहे. यामुळे जनतेच्या मूलभूत मैत्रीच्या भावनेमध्ये संकटे निर्माण होतात. इस्राएलविरुद्ध अरब देशांच्या मागण्यांना केवळ सोयीस्कर राजकीय धोरण म्हणून आम्ही मान्यता देत नसून, न्यायाच्या तात्त्वि भूमिकेवर आम्ही त्यांना पाठिंबा देत आलो आहोत. हिंदुस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी-महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य-लढा आपण लढत होतो, तेव्हापासून पॅलेस्टाईन अरबांच्यावर अन्याय झालेला आहे, अशी आमची भूमिका होती आणि आजही तीच आहे. कुठल्याही एखाद्या राष्ट्राने सक्तीने दुस-या राष्ट्राची भूमी बळकवावी, याला आमचा विरोध आहे. अरब राष्ट्रांनीही आमच्या मैत्रीला मित्रत्वाची साथ दिली आहे. त्यांनी तसा प्रतिसाद दिला नाही, असे जर कोणी मानत असेल, तर ते अत्यंत चूक आहे. सौदी अरेबियाने प्रथमत: तेल पुरवठ्याच्या बाबतीत भारताची 'खास मित्रांत' गणना केली नव्हती, परंतु ही चूक त्यांनी तातडीने दुरुस्त केली आहे. काही प्रमुख अरब पुढारी हिंदुस्थानला भेट देऊन गेले आहेत आणि या दोन राष्ट्रांत सहकार्याची भूमिका तयार होत आहे. तेलांच्या वाढत्या किमतीमुळे प्राप्त झालेल्या संपन्नतेमुळे अरब राष्ट्रांशी विविध क्षेत्रांत तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य करण्याची संधी भारताला प्राप्त झाली आहे. अलीकडे त्या राष्ट्रांशी आपला निर्यात-व्यापारही वाढला आहे.

इस्लामी धर्म परिषद ही आमच्या सहकार्याच्या आड येऊ देता कामा नये. बांगला देशामध्ये झालेल्या बदलामुळे अरब राष्ट्रांमध्ये व हिंदुस्थानमध्ये मतभेद होण्याचे कोणतेच कारण नाही. याचे कारण अरब राष्ट्रे व हिंदुस्थान यांचे संबंध परस्परांच्या आदरावर, मैत्रीवर व हितसंबंधावर अवलंबून आहेत.