• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (107)

व्यापार, अर्थकारण आणि तंत्रविज्ञान या क्षेत्रांमध्ये विकसनशील देशांना परस्परांशी कसे सहकार्य करता येईल, याचा समग्र विचार करण्याचे लिमा येथे भरलेल्या अलिप्त देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत ठरले आहे. आंतरराष्ट्रिय व्यासपीठावरून जागतिक प्रश्नांच्या सोडवणुकीचा विचार होत असला, तरी देखील विकसनशील देशांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी एकमेकांना साहाय्य करण्याचा मार्ग अवलंबिलाच पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विद्यमान आणि संभाव्य साठा, उपलब्ध तंत्रविज्ञान आणि मानवी कसब यांच्या कक्षेत राहूनही विकसनशील देशांना अनेक परस्परपूरक क्षेत्रे शोधता येतील, हे कार्य करण्यासाठी आम्ही विकसित देश आणि आंतरराष्ट्रिय संघटना यांचे सहकार्य अपेक्षीत आहोत. कारण त्यायोगे विकसनशील देश आणि विकसित देश यांच्यात नवे दुवे निर्माण होऊ शकतील.

विकसनशील देशांमधील सहकार्य सुकर आणि वृद्धिंगत करण्यासाठी नव्या संघटना, यंत्रणा आणि साधने निर्माण केली पाहिजेत, असे आम्ही मानतो. हे सहकार्य दोन तऱ्हांनी करता येईल. देवाणघेवाणीमध्ये समानता आणण्यासाठी समन्वित कृती करणे, ही एक रीत होय आणि प्राधान्य स्वरूपाचे व्यापारी करार करून व्यापारवृद्धी करणे, हा दुसरा मार्ग आहे. विकसनशील देशाच्या एकूण निर्यात-व्यापारातील अवघा २० टक्के व्यापारच विकसनशील देशांमध्ये होत असतो. याउलट, विकसित देशांचे परस्परांतील व्यापाराचे प्रमाण ७५ टक्के आहे. म्हणून विकसनशील देशांनी आपापसांतील व्यापार वाढविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तसाच त्यांनी आपापल्या वैशिष्ट्यांचा परस्परांना लाभ करून द्यावयास हवा. ही पद्धत परिणामकारक होण्यासाठी या व्यापारामध्ये कच्च्या मालाप्रमाणे उत्पादित मालांचाही समावेश होणे आवश्यक आहे.

जे विकसनशील देश जागतिक बाजारपेठेला कच्चा माल पुरवितात, त्यांनी आपले निर्णय एकजुटीने घेतले, तर विकसित देशांशी किंवा बहुराष्ट्रिय महामंडळाशी व्यापारविषयक अटी निश्चित करताना त्यांना निश्चितच आत्मबळ येईल. अशा काही कल्पना, नव्या यंत्रणा स्थापन करून त्यांची व्यवहार्यता अजमावून पाहता येईल.

श्रीमंत देश आणि गरीब देश यांनी एकमेकांविरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेण्याऐवजी सहकार्याची भूमिका स्वीकारावी, असे आम्ही सतत म्हणत आलेलो आहोत. श्रीमंत आणि गरीब देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण केल्याने केवळ विकसनशील देशांचेच नव्हे, तर सा-या जगापुढील जटिल प्रश्न सुटू शकणार नाहीत. जागतिक साधनसंपत्तीचा सुजाण आणि सुयोग्य वापर करावयाचा असेल, तर सहकार्य आणि परस्परसामंजस्य यांचाच आधार घ्यावयाला हवा, अशी आमची दृढ निष्ठा आहे.

पूर्वी कधीही नव्हता, एवढा गंभीर आर्थिक पेचप्रसंग सध्या जगापुढे उभा आहे. हा पेचप्रसंग इतका व्यापक आहे, की तो सोडविण्यासाठी प्रारंभ कोठून करावयाचा, हेही नीटसे उमजत नाही. हे सर्व प्रश्न चटकन् सुटतील, असेही आम्ही मानत नाही. परंतु म्हणून आपण उशीर करूनही चालणार नाही. यांपैकी कोणत्याही एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी एकाच वेळी अनेक बाजूंनी निर्धारपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.