• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

लोकनेते यशवंतराव चव्हाण - २७

९. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व

लोकनेते यशवंतराव चव्हाण जर राजकारणात आले नसते तर थोर साहित्यिक म्हणून नावारूपास आले असते, असे त्यांच्याबद्दल अनेक नामवंत साहित्यिकांनी नमूद करून ठेवले आहे. चव्हाणसाहेबांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू त्यांच्या वाटचालीतून स्पष्ट होतात. जीवनाचे नम्र उपासक असलेल्या चव्हाणसाहेबांच्या प्रत्येक कृतीत व बोलण्यात सहजता असायची. कोणतेही काम सहजपणे हाताळण्याची कुशलता हा अन्य कोणामध्ये सहजासहजी न आढळणारा पैलू यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. साहित्य, वृत्तपत्र संपादक, उद्योजक, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, राजकारण अशा समाजातील विविध स्तरात यशवंतरावांचा खूप मोठा मित्रपरिवार होता. कोणत्याही क्षेत्रातील माणसांत ते सहजपणे मिसळत. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेल्या व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशभर नावलौकिक मिळविलेल्या यशवंतरावांचा सामान्यातील सामान्य माणसाशी थेट संबंध होता. शेतकरी हा विकासाच केंद्रबिंदू मानून त्यांनी राजकारण केले. भाषावाद, प्रांतवाद जोपासला पाहिजे हा विचार त्यांनी ठामपणे मांडला. राजकारणातील तत्त्वनिष्ठता त्यांनी आयुष्यभर जोपासली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वयंतेजाने तळपणारे हे व्यक्तिमत्त्व प्रत्येक भारतीयास हवेहवेस वाटत राहिले. यशवंतरावांची व्यापक दृष्टी, चौफेर वाटचाल, विविध क्षेत्राशी असणारा संबंध म्हणूनच एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील अनुभव हाच यशवंतराव चव्हाणसाहेबांचा ख-या अर्थाने गुरू मानावा लागेल. यशवंतरावांचा राजकारणातील प्रवेशही काहीसा वेगळ्या पद्धतीने झाला. तो काळ पारतंत्र्याचा होता. नव्यानेच निर्माण झालेल्या मुंबई राज्यासाठी १९४६ साली निवडणूक झाली. सत्तास्थानी आलेल्या काँग्रेसने मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर यांची निवड केली. नवीन मंत्रिमंडळ बाळासाहेब खेर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दक्षिण सातारा मतदारसंघातून सदस्यांबरोबर मुंबईस पोहचले. मुंबई राज्याच्या गृहमंत्रीपदावर निवड झालेल्या मोरारजीभाई देसाईंनी यशवंतरावांची मागणी गृहखात्याच्या पार्लमेंटरी सेक्रेटरीपदासाठी केली. यशवंतरावांची मात्र राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची इच्छा होती. पण वरिष्ठांकडूनच पार्लमेंटरी सेक्रेटरी पदासाठी आपल्या नावाची मागणी झाल्याने यशवंतरावांनी ती जबाबदारी आनंदाने स्विकारली. प्रथम मिळालेली संधी म्हणजे पुढील वाटचालीचा पाया आहे हे जाणून घेऊन यशवंतरावांनी कामाला प्रारंभ केला. आपले ज्ञान, कल्पकता, नवी दृष्टी व कामात झोकून घेण्याची वृत्ती यातून त्यांनी आपल्या कामाचा वेगळाच ठसा त्याकाळात मुंबई राज्यात उमटविला. त्यांच्या कामावर खुश झालेल्या मुख्यमंत्री बाळासाहेब खेर व मोरारजी देसाईंनी यशवंतरावांना लवकरच मंत्रिमंडळात घेतले. मंत्रिमंडळात सहभागी झाल्यावर त्यांची राजकारणातील चौफेर वाटचाल सुरू झाली. राज्याच्या मंत्रिमंडळात पुढील काळात त्यांनी वेगवेगळ्या खात्याचा कारभार पारदर्शकपणे व कार्यक्षमपणे हाताळला. कामाची गती, निर्णयक्षमता व चौफेर दृष्टी यातून यशवंतरावांची राजकीय वाटचाल बहरत गेली. नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यंना १ मे १९६० रोजी मिळाला. पुढीलकाळात महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतरावांनी फार मोठे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणूनच यशवंतरावांकडे ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून पाहिले गेले.

चव्हाणसाहेबांचे वाचन प्रचंड होते. दिवसातील १२ ते १५ तास काम केल्यानंतर रात्रीचे वाचन केल्याशिवाय ते झोपत नसत रात्री जेवणानंतर सुमारे तास – दीडतास ते वाचन करत. एकावेळी चार-पाच पुस्तके वाचण्यास घेत. वेगवेगळ्या पुस्तकातील संदर्भ वेगवेगळ्या कारणासाठी वापरत. दिवसभराच्या व्यापातूनही चाळीस ते पन्नास पाने न चुकता वाचन करत. प्रवास करताना वाचनाचे साहित्य वेगळे असे. त्यामध्ये प्रामुख्याने मासिके व वृत्तपत्रांचा सहभाग अधिक असायचा. चौफेर वाचनामुळे त्यांचे ज्ञान सर्वस्पर्शी बनले. या वाचनातूनच त्यांच्यात विविध कांदब-यांचे समिक्षण करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले. रिकाम्या वेळेत वाचनाचा छंद त्यांनी चांगल्यापद्धतीने जोपासला. कोल्हापूरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शिवाजी पेठेतील भुसारी वाड्यात यशवंतराव रहाण्यास होते. त्याकाळात त्यांचा एक मित्र यशवंतरावांकडे ख्यातनाम साहित्यिक वि. स. खांडेकर यांची ‘दोन ध्रुव’ ही कादंबरी घेऊन आला. ते दिवस पावसाळ्याचे होते. दुपारच्या वेळी यशवंतरावांनी ती कादंबरी हातात घेतली. या नव्या को-या पुस्तकाच्या पानांचा येणारा सुरेखसा वास हुंगत यशवंतरावांनी ‘दोन ध्रुव’ ही कादंबरी बसल्या बैठकीलाच वाचून पूर्ण केली. या कादंबरीतून खांडेकरांनी समाजमनाचा घेतलेला मागोवा यशवंतरावांच्या मनाला भावला. यशवंतरावांच्या मनातील भावूकता य कादंबरीने जागृत केली. साहित्यावर प्रेम करण्याची ओढ त्यांना या कादंबरीमुळेच लागली. पुढील काळात चव्हाणसाहेबांनी अनेक साहित्यिकांच्या साहित्यकृतीचे वाचन केले. भालचंद्र नेमाडे, अऱूण साधू, ना. धो. महानोर, अनिल अवचट, ग. दी. माडगूळकर व नव्या दमाचे उपेक्षित समाजाचे साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या साहित्यावरही यशवंतरावांनी भरभरून प्रेम केले. विविध साहित्यिकांच्या साहित्यसंपदेवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. अनेक साहित्यिकांनी दिलेल्या निमंत्रणाचा यशवंतरावांनी आनंदाने स्वीकार केला. विविध साहित्यसंमेलनांना आवर्जून उपस्थिती लावली. कधी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर कधी अध्यक्ष म्हणून ते उपस्थित रहात. साहित्य, कला, संस्कृतीवरील आपले प्रेम त्यांनी आपल्या भाषणातून या संमेलनांत व्यक्त केले.