१९५६ ते १९६० हा काळ जरी महाराष्ट्रात भाषिक चळवळीमुळे अशांततेचा होता तरी सुदैवाने यशवंतरावांच्या रुपाने महाराष्ट्राला एक द्रष्टे व प्रभावी नेतृत्व मिळाले. यशवंतरावांना लोकांच्या प्रश्नांची जाण होती. विकासाविषयी त्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. शेती, उद्योग, लघुउद्योग, शिक्षण, कला ह्या राज्याच्या विविध अंगांचा कशा रीतीने विकास व्हायला पाहिजे ह्याचा नकाशा आरेखन त्यांच्या मनात होते. ह्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा नकाशा आखून ठेवला.
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही चव्हाणांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी प्रथमच जाहीर करून टाकले की हे राज्य फक्त मराठ्यांचे नसेल तर हे राज्य मराठी असेल व अशा त-हेने महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला सुरुंग लावला. शेतीकरता पाणी, नव्या तंत्राचा उपयोग, कृषिप्रधान उद्योगांना उत्तेजन, फलोद्योग हे शेतीच्या क्षेत्रात कार्यक्रम होते. छोटेमोठे कालवे, धरणे ह्यांना गती देणे हा त्यांच्या धोरणाचा भाग होता. त्याचबरोबर शेतीमालाला योग्य भाव मिळावेत हा त्यांचा अट्टाहास होता.
सत्तेच्या विकेंद्रीकरणाकरता जिल्हापरिषदा, तालुका परिषदा, ह्यांचा विस्तार करणे हे त्यांचे ध्येय होते. त्याचबरोबर उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याकरता त्यांनी औद्योगिक वसाहतींची बांधणी केली व लघुउद्योजकांना योग्य व्याजदराने कर्ज मिळावे ह्या दृष्टीने भरीव पावले टाकली. मोठ्या धंद्यांच्या विस्तारालाही त्यांनी योग्य उत्तेजन दिले. त्यांचे उद्योजकांशी स्नेहपूर्ण संबंध होते. यशवंतराव चव्हाण हे राष्ट्रीय दर्जाचे पुढारी होते व त्यांचे वारस मुख्यमंत्री कन्नमवार हे लोकांचे पाठबळ मिळावे म्हणून स्वतःला यशवंतरावांची दिंडी पुढे घेऊन जाणारा वारकरी म्हणवून घेत यातच यशवंतरावांचे मोठेपण सिध्द होते. यशवंतरावांच्या कार्याला जनतेची मान्यता होती. राजकारणात तर त्यांचा दबदबा होता. तसेच राज्याच्या इतर पैलूंवरही त्यांची छाप होती. उदा., साहित्य, कला, संस्कृती, नाट्य, विश्वकोश इत्यादी.
परंतु यशवंतरावांची परंपरा त्यांच्यानंतर ढासळू लागली. ह्याची दोन प्रमुख कारणे अशी की एक तर यशवंतरावांसारखी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा अभाव व विकासाचे स्त्रोत सामान्य जनतेपर्यंत पोहोचावण्याच्या बाबतीतली उदासीनता. ह्या सर्वांचे लक्ष स्वतःच्या फायद्याकडेच आणि स्वतःचे स्थान टिकविण्याकडेच अधिक होतो. कारण मुख्यमंत्रिपदावर यशवंतरावांचे वारस काही अपवाद वगळता सामान्य दर्जाचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या काळात बदललेले राजकीय रंग. कॉंग्रेसमध्ये झालेली फूट व त्यामुळे पक्षात निर्माण झालेले संशयाचे वातावरण. ह्या पार्श्वभूमीवर यशवंतराव त्या संशयाचे बळी ठरले आणि ह्याच काळात कॉंग्रेसमध्ये झालेले मराठे, बिगर मराठे, शहाण्णवकुळी व इतर अशी झालेली फूट. सत्ता त्यामुळे दोलायमान झाली व तिला रस्सीखेचीचे स्वरूप आले. महाराष्ट्राच्या भव्यदिव्य नकाशाचे अवमूल्यन सुरू झाले.