१५. बॅ. ए. आर. अंतुले
संयुक्त महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री
(९-६-१९८० ते १२-१-१९८२)
बॅ. अंतुले हे महाराष्ट्राचे सातवे मुख्यमंत्री. ते एक लढाऊ व बुध्दिमान व्यक्तिमत्व. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते फार काळ मुख्यमंत्री म्हणून टिकले नाहीत. सध्या पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी जी मंत्रिमंडळाची रचना केली त्यात अंतुल्यांना अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री म्हणून सामावून घेतले.
जन्म व शिक्षण
अंतुले ह्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील आंबोली खेडेगावात ९-२-१९२९ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. ते १९४८ साली इस्माईल युसुफ महाविद्यालयातून अरेबिक हा विषय घेऊन पहिल्या वर्गात बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातील विद्यार्थीदशेतून एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांची प्रसिध्दी होती.
राजकारणात प्रवेश
विद्यार्थीदशेपासून ते कॉग्रेसचे धडाडीचे व क्रियाशील कार्यकर्ते होते. युवक चळवळीच्या सुरुवातीच्या काळात ते प्रभावी आणि क्रियाशील कार्यकर्ते होते. युवक चळवळीचा अभ्यास करण्याकरता इंग्लंडला गेलेल्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. राष्ट्रीय सभेचे एक मान्यवर नेते म्हणून कुलाबा जिल्ह्यात ते ओळखू जाऊ लागले व त्यांची क्रियाशीलता पाहून त्यांना कुलाबा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले. ते १९६३ साली महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस झाले.
विधिमंडळात प्रवेश व मंत्री
१९६२ ते १९६७ या काळात ते विधिमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले. वसंतराव नाईकांच्या (१९६९) ते विधि, न्याय, शिक्षण, मत्स्य व्यवसाय, छोटी बंदरे ह्या खात्यांचे मंत्री झाले. त्यावेळी त्यांनी छोट्या बंदरांच्या विकासाकरता खूप प्रयत्न केले. अत्यंत हुशार, कष्टाळू, अभ्यासू व कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली. १९७२ साली ते पुन्हा निवडून आले व नाईकांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. त्यावेळी ते विधी, न्याय, इमारती, दळणवळण, मत्स्यव्यवसाय ह्या खात्यांचे मंत्री होते. ह्या काळात त्यांनी सॉलिसिटरच्या पध्दतीला नवे वळण देऊन त्यांनाही न्यायालयात काम करण्याची मुभा दिली. त्याबाबत त्यांचे व बॅ. सिरवाई ह्यांचे मतभेद झाले.
राज्यसभेचे सदस्य व कॉंग्रेसचे सरचिटणीस
१९७६ साली बॅ. अंतुले राज्यसभेचे सदस्य म्हणून दिल्लीस गेले. त्यांचे संघटना कौशल्य व धाडसी कार्य लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या पडत्या काळात इंदिरा गांधी यांनी त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस केले. त्यावेळी संजय गांधी युग सुरू झाले होते.