बघू या काय करता येईल !
साहेब केंद्रीय अर्थमंत्री असताना एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात अर्थतज्ञ डॉ. वि. म. दांडेकर हेदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर कठोर टीका केली. केंद्र सरकारमधील अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत अशी टीका करणे अनुचित आणि औचित्याला सोडून होते. कारण तो कार्यक्रमाचा विषय नव्हता. दांडेकरांच्या या अनपेक्षित टीकेमुळे वाचावरणात काहीसा तणाव निर्माण झाला. यशवंतरावांनाही वाईट वाटले, पण त्यांनी संयमपूर्वक दांडेकरांनी उपस्थित केलेल्या शक्य त्या मुद्दयांची उत्तरे दिली. कार्यक्रम संपला. यशवंतराव दिल्लीला गेले. पुढे काही महिन्यांनी दांडेकरांच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेपुढे काही प्रश्न निर्माण झाले. संस्था अडचणीत आली. अर्थमंत्री या नात्याने हे प्रश्न सोडविणे यशवंतरावांच्या हातात होते. पण नुकतीच त्यांच्यावर उघड टीका केल्यामुळे दांडेकरांना साहेबांकडे जावेसे वाटेना. शेवटी ते साहेबांचे व त्यांचेही मित्र असलेल्या पत्रकार गोविंद तळवलकरांकडे गेले. आपली अडचण सांगितली, व म्हणाले, ' पुण्याच्या सभेत माझ्याकडून जरा जास्तच टीका झाली. आता ही अडचण आमच्यासमोर आहे. यशवंतरावांकडे कसा जाऊ ?'
तळवलकर म्हणाले, ' काम तुमचे नाही तर तुमच्या संस्थेचे आहे. यशवंतराव ते निश्चितपणे करतील.'
असे म्हणून तळवलकरांनी साहेबांना फोन लावला. दांडेकरांच्या संस्थेचे काम आहे म्हणून सांगितले. यशवंतराव फोनवर म्हणाले, ' दांडेकरांना संकोच करण्याचे काही कारण नाही. त्यांना म्हणावे दिल्लीला या. आपण बघूया, काय करता येईल ते.'
याप्रमाणे दांडेकर दिल्लीला गेले. संस्थेपुढील अडचण चुटकीसरशी दूर झाली. स्वत: दांडेकर कृतज्ञतेने अनेकांना हा प्रसंग सांगत व म्हणत, ' यशवंतराव माझ्याशी सूडबुद्धीने वागले नाहीत.'