तो माझा रस्ता नाही !
सन १९७७ साली निलम संजीव रेड्डी यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. या निवडणुकीत यशवंतरावांनी त्यांना खूप सहकार्य केले होते. म्हणून यशवंतरावांविषयी रेड्डींना विशेष आस्था होती. आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला व जनता पक्षाचे सरकार आले. पण दोन वर्षांतच अंतर्गत वादामुळे ते गडगडले. या अस्थिरतेच्या काळात राष्ट्रपतींनी त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटीला बोलावले व म्हणाले, ' चव्हाणांना पंतप्रधान होण्याची संधी आहे. मी त्यांना पंतप्रदानपदाची शपथ देतो. त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देणारं पत्र देतो. त्यांनी मला बहुमताचं पत्र आणून द्यावं.' त्याप्रमाणे राष्ट्रपतींनी यशवंतरावांना पत्रही पाठवलं. यशवंतराव तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हते. त्यांनी बहुमत मिळवण्यासाठी तीन दिवस प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. इंदिरा काँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळाला नाही. पुढे काय करायचे याची चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते यशवंतरावांच्या घरी जमले. शरद पवार म्हणाले, ' तुम्ही राष्ट्रपतींना सरकार स्थापनेचा दावा करणारं पत्र द्या. पंतप्रधानपदाची शपथ तर घ्या. नंतर आपण बहुमत सिद्ध करू.'
पण यशवंतरावांनी ते मान्य केलं नाही. ते म्हणाले, ' माझ्याकडे बहुमत नाही. मी सरकार बनवणार नाही. ' आणि त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून तसं कळवलं. दुस-या दिवशी राष्ट्रपतींनी पुन्हा शरद पवारांना बोलावून घेतलं व म्हणाले, ' तुला काही कन्व्हिन्स ( प्रवृत्त ) करता आलं नाही का ?'
' नाही आलं. ते ऐकत नाहीत.'
' तू असतास इथे तर आता पंतप्रधान झाला असतास. सरकार बनवलं असतंस नतंर बहुमत प्राप्त केलं असतंस ', राष्ट्रपती म्हणाले.
त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रपती स्वत: यशवंतरावांशी बोलले. तेव्हा यशवंतराव म्हणाले, ' हा काही माझा रस्ता नाही. मी ते काही करणार नाही.'
अशा प्रकारे ( काही काळ का होईना पण ) पंतप्रधान होण्याची दाराशी चालून आलेली संधी यशवंतरावांनी नाकारली. त्यानंतर चौधरी चरणसिंग पंतप्रधान झाले. ते एक दिवससुद्धा बहुमत मिळवू शकले नाहीत. पण सहा महिने ते पंतप्रधान होते. या काळात ते एकदाही पार्लमेंटमध्ये गेले नाहीत. त्यांचे पंतप्रधान पद औट घटकेचे ठरले. पण भारताच्या इतिहासात पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. यशवंतरावांना हे सहज शक्य होतं. पण त्यांनी ते केले नाही . कारण खरोखरच तो त्यांचा रस्ता नव्हता.