बाबासाहेबांच्या भेटीला यशवंतराव
१९५२ च्या विधानसभा निवडणुकीत कराड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेल्यावर यशवंतराव राज्याचे पुरवठामंत्री झाले. घरवाटपाच्या ( अॅकोमोडेशन ) खात्याचा कार्यभारही त्यांच्याकडेच होता. त्यावेळी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईत जागेची गरज होती. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे फार मोठे योगदान होते आणि यशवंतरावांना त्यांच्याविषयी नितांत आदर होता.
एकेदिवशी राजभोज नावाचे एक कार्यकर्ते यशवंतरावांकडे गेले व म्हणाले, ' साहेब, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तुमची अपॉईंटमेंट हवी आहे. जागेच्या संदर्भात त्यांना तुमच्याशी चर्चा.....'
त्यांना मध्येच थांबवत यशवंतराव म्हणाले, ' तुमचं डोकं ठिकाणावर आहे का ? अपॉईंटमेंट कोणी कोणाची मागायची ? बाबासाहेबांनी माझी, की मी बाबासाहेबांची ? जा आणि डॉक्टरांना सांगा की, यशवंतराव चव्हाण तुमची अपॉईंटमेंट मागताहेत. ते सांगतील तो दिवस व ते देतील ती वेळ मला कळवा. काम जरी त्यांचं असलं तरी मी ते त्यांच्या घरी जाऊन करून देईन.'
त्याप्रमाणे तो कार्यकर्ता बाबासाहेबांना भेटला. बाबासाहेबांनी सोयीचा दिवस कळवला व त्याप्रमाणे यशवंतरावांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं काम मार्गी लावलं.
यशवंतराव आय़ुष्यभर सत्तेत राहूनही सत्ता त्यांच्या डोक्यात कधी गेली नाही, हेच त्यांचे वेगळेपण होते.