आपण थांबू नये... ताबडतोब जावे !
राज्याच्या प्रगतीसाठी शेतीबरोबरच उद्योगांचीही वाढ होणे गरजेचे आहे हे यशवंतरावांना माहित होते. म्हणूनच ते उद्योगपतींना प्रोत्साहन देत असत. पण याचा अर्थ ते उद्योगपतींचे लांगुलचालन करीत होते असा मुळीच नाही. मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा कमी होईल असे ते कधीही वागले नाहीत. त्यांचा मराठी बाणा दाखवणारी ही घटना.
द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री झाल्यावर यशवंतराव मलबार हिल वरील ' सह्याद्री ' बंगल्यात रहायला गेले, त्याच्या दुस-या दिवशी भल्या सकाळीच शिपायाने त्यांना उठवले आणि सांगितले की, प्रसिद्ध उद्योगपती आर. डी. बिर्ला आपणास भेटावयास आले आहेत. आर. डी. बाबूंचे महत्त्व आणि वय लक्षात घेऊन यशवंतराव घाईघाईने तयार झाले आणि दिवाणखान्यात येऊन त्यांना भेटले. आर. डी. बिर्ला म्हणाले, ' काही विशेष काम नव्हतं. सकाळी सहज फिरायला निघालो होतो. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटावं.' अर्धा तास गप्पा मारून आर. डी. बाबू निघून गेले. पण दुस-या दिवशी सकाळी सात वाजता पुन्हा हजर झाले. यशवंतरावांनी परत झोपमोड करून त्यांची भेट घेतली. निरोप घेताना बिर्ला म्हणाले, मी रोज सकाळी मलबार हिलवरील बागेत फिरायला येतो व जाता जाता मी मोरारजींना भेटत असे. आपली हरकत नसेल तर आपण तोच नित्यक्रम पाळत जाऊ.'
यशवंतराव पटकन म्हणाले, ' मोरारजी हे सूर्यवंशी प्रकृतीचे गृहस्थ. ते सकाळी पाचला उठतात.मी रात्री दोन वाजण्यापूर्वी झोपत नाही आणि नऊ अगोदर कोणाला भेटणे मला कठीण असते. आपण भल्या सकाळी येऊन माझी झोपमोड करू नका.'
यशवंतरावांच्या स्पष्टवक्तेपणाचा परिणाम झाला. त्यानंतर बरेच दिवस आर. डी. बाबू आले नाहीत. पण एक दिवस सकाळी ते परत हजर झाले. यशवंतराव झोपले होते. शिपायाने त्यांना उठवले. तो सांगू लागला, ' खाली आर. डी. बाबू आपली.....' त्याला मध्येच थांबवत यशवंतराव रागाने म्हणाले, ' त्यांना सांगा, मुख्यमंत्री साहेब झोपले आहेत. आपण थांबू नये, ताबडतोब जावे ! '