अनाकलनीय यशवंतराव.
यशवंतराव राजकारणी होते हे खरेच आहे. पण नेते मंडळी सदासर्वकाळ राजकारणच करतात हा गैरसमज तेव्हाही होता व आजही आहे. अनेकदा यशवंतरावांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन निर्णय घेतले व तशी कृती केली. असाच एक प्रसंग.
१९५७ साली प्रतापगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान पं. नेहरू महाराष्ट्रात येणार होते. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन पेटले होते व नेहरूंना अनावरण करू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी सुरुवातीला घेतली होती. पण विरोधी पक्षनेते एस, एम. जोशी यांच्याशी यशवंतरावांनी चर्चा केली व समितीच्या कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने निदर्शने करावीत असे ठरले. त्याप्रमाणे वाईपासून पसरणीच्या घाटापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे फलक घेऊन उभे होते, तर दुस-या बाजूला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेहरूंच्या स्वागतासाठी उभे होते.
प्रंचड गर्दी जमली होती. थोड्याच वेळात नेहरूंचे आगमन होणार होते. रस्त्याच्या एका बाजूला यशवंतराव उभे होते तर त्यांच्या समोरच्या बाजूस आंदोलनाचे नेते आचार्य प्र. के . अत्रे व समितीचे इतर नेते उभे होते. वातावरणात प्रचंड तणाव होता. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते परस्परविरोधी घोषणा देत होते. इतक्यात यशवंतरावांनी आपली बाजू सोडली व सहजपणे फिरत पुढे जावे तसे ते समितीच्या नेत्यांजवळ पोचले. आचार्य अत्र्यांच्या जवळ जाऊन काही न बोलता त्यांनी अत्र्यांच्या बुशकोटाचे खुले राहिलेले बटण लावून दिले, आणि जसे आले तसेच सहजपणे ते परत आपल्या जागेवर जाऊन उभे राहिले. अत्रे व समितीचे नेते अवाक् होऊन यशवंतरावांकडे पहात होते आणि यशवंतराव त्यांच्याकडे पाहून गाल्यातल्या गालात हसत होते.