• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- तुमचं ' बलुतं ' आवडलं !

तुमचं ' बलुतं ' आवडलं  !

दया पवार उर्फ दगडू मारुती पवार हे विख्यात दलित कवी होते. १९७८ साली त्यांचं ' बलुतं ' हे आत्मकथन प्रकाशित झालं आणि महाराष्ट्रभर गाजलं. त्यातील दग्ध जीवनानुभवांनी पांढरपेशी जगात खळबळ माजली. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले.

१९८२ साली दया पवारांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती जाहीर झाली. जवळपास दीड लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती पवारांच्या सगळ्या अडचणी दूर करणार होती. पण दया पवार रेल्वेत कर्मचारी असल्यामुळे त्यांना त्यांच्या खात्याच्या परवानगीशिवाय ही शिष्यवृत्ती घेता येत नव्हती. मग त्यांच्या दिल्लीला फे-या सुरु झाल्या. दरम्यान त्यांना न्यूयॉर्कला येण्याचे निमंत्रण मिळालं. पण जिथे अजून शिष्यवृत्ती स्वीकारण्याचीच परवानगी मिळाली नव्हती, तिथे परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट व व्हिसा मिळणे ही खूप दूरची गोष्ट होती. दया पवारांच्या विषयी वरिष्ठांच्या मनात असूया असल्यामुळे त्यांची परवानगीची फाईल पुढे सरकत नव्हती.

त्यांच्या खात्याचे दिल्लीचे मुख्य कार्यालय राष्ट्रपतींच्या कार्यकक्षेत येत होते. खूप प्रयत्न करूनही परवानगी मिळेना, तेव्हा एक दिवस निराश अवस्थेत ते दिल्लीतील एका रस्त्याच्या कडेला बसून राहिले. मनात विचार आला - चव्हाण साहेबांकडे जावे का ? ते दिल्लीतच आहेत. पण आज ते कोणी मंत्री नाहीत तर साधे खासदार आहेत. शिवाय पूर्वी आपण यशवंतरावांवर जहाल टीका केली होती. काँग्रेस व आर. पीय आय . युतीसंबंधी आपण त्यांच्यावर केलेली टीका ते विसरले असतील का ? ते काहीही असो, आज साहेबांना भेटायचेच  !

शेवटी ओशाळवाण्या चेह-याने दया पवार यशवंतरावांच्या घरी गेले. साहेबांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. म्हणाले, ' तुमचं ' बलुतं ' मला खूप आवडलं. लिहीत रहा.' दया पवारांनी दबकत दबकत त्यांचं काम सांगितलं. त्यांना वाटलं साहेब फार फार तर शिफारसपत्र देतील. पण साहेबांनी लगेच फोन उचलला. भालचंद्र देशमुख हे मराठी अधिकारी तेव्हा केंद्र सरकारमध्ये उच्चपदावर होते. साहेब त्यांच्याशी बोलले व पवारांना म्हणाले, ' उद्या तुम्ही देशमुखांना भेटा, तुमचे काम होईल.'

दुस-या दिवशी पवार ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्यांना सहज प्रवेश मिळाला. देशमुखांनी त्यांना सांगितले, ' चव्हाण साहेबांनी मला सर्वकाही सांगितले आहे. तुम्ही अजिबात काळजी करु नका. परवा सकाळी येऊन परवानगीचे पत्र आणि अॅडव्हान्स घेऊन जा.'

अशा प्रकारे पाच - सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. साहेबांविषयीची कृतज्ञता मनात वागवतच दया पवार अमेरिकेला जाणा-या विमानात चढले.