'गैरसमज वेळीच दूर करावा !
दिल्लीतील मराठी पत्रकारांना यशवंतरावांचा मोठा आधार वाटायचा. अनेक पत्रकारांचे साहेबांशी जिव्हाळ्याचे नाते होते. अनंतराव पाटील अशांपैकीच एक पत्रकार होते. एकदा त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधीसंबंधी दोन लेख लिहिले. त्या लेखासंबंधी महाराष्ट्रातील एका खासदाराने इंदिराजींकडे चुकीचा अहवाल दिला, आणि यामागे यशवंतरावांची प्रेरणा असावी असेही त्यांना सांगितले. सेंट्रल हॉलमध्ये यावर बरीच चर्चा झाली. काही लोकांनी अनंतरावांना विचारले, ' मॅडमबद्दल तू काय लिहिलेस ?'
ते म्हणाले , ' काही विशेष किंवा गैर लिहिलेले नाही.' त्यांनी या चर्चेकडे एकप्रकारे दुर्लक्षच केले. एके दिवशी यशवंतरावांनी त्यांना आपल्या ऑफिसात बोलावून घेतले आणि विचारले, ' पंतप्रधानांची भेट घेऊन तुम्ही त्यांचा गैरसमज दूर का करीत नाही ?'
मग अनंतराव इंदिराजींना भेटले. त्या हसून म्हणाल्या, ' तुमच्या मराठी लेखाचे इंग्रजी भाषांतर करून माझ्याकडे कुणीतरी मराठी खासदाराने पाठविले आहे. पण मी दोन्हीही भाषेतील लेख वाचलेले नाहीत. त्यामुळे गैरसमजाचा प्रश्नच उदभवत नाही. तुम्ही संपादक आहात आणि कुणाचे चारित्र्यहनन होईल असे लिहू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. '
पंतप्रधानांचे आभार मानून अनंतराव थेट यशवंतरावांच्या कचेरीत गेले. त्यांना वृत्तांत सांगितला. यशवंतरावांना बरे वाटले. ते म्हणाले, ' हितशत्रू अफवा उठवतात आणि गैरसमज पसरवितात. आपण दुर्लक्ष केले की लोकांना त्या अफवा ख-या वाटू लागतात, म्हणून आपली सत्य बाजू वेळीच समजावून सांगितली पाहिजे.'