'मी लक्षात ठेवून येईन !
कराडच्या मातीविषयी आणि माणसांबद्दल यशवंतरावांना विशेष आपुलकी वाटत असे. आपल्या भागातला माणूस कुठेही भेटला, तरी ते आपुलकीने त्याची चौकशी करीत असत. केंद्रात मंत्री असताना एकदा विलेपार्ले येथे एका कार्यक्रमाला ते येणार होते. त्यावेळी कराडचे श्री. वामन जंगी, बाबू आपटे व के. वा. नेने हे तिघे पार्ल्यातील पार्लेश्वर सोसायटीत रहात होते. यशवंतरावांबद्दल त्यांनाही आदर व अभिमान वाटत होता. अनायासे यशवंतराव विलेपार्ल्यात येत आहेत, तर त्यांनी आपल्या घरी यावे अशी या तिघांची फार इच्छा होती. त्यांनी यशवंतरावांचे सचिव डोंगरे यांच्याशी संपर्क साधला. डोंगरेंनी परस्पर कळवले की साहेबांना वेळ नाही. ते सगळेच नाराज झाले, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. ते यशवंतरावांना समक्ष भेटले व घरी येण्याची विनंती केली. यशवंतराव म्हणाले, ' अरे , कराडच्या माणसांनी बोलावल्यावर मी त्यांच्याकडे जाणार नाही, हे शक्य आहे का ?'
त्या तीघांनी डोंगरेंनी दिलेल्या नकाराविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ' अरे त्यांना काय माहीत कराडच्या माणासांबद्दलची माझी आपुलकी ? मी लक्षात ठेवून येईन .'
त्यानुसार विलेपार्ल्याचा कार्यक्रम आटोपल्यावर यशवंतराव श्री. वामन जंगी यांच्या दोन खोल्यांच्या घरी गेले. १५- २० मिनिटे थांबले. घरातील सर्वांची आत्मीयतेने चौकशी केली. दिलखुलास गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला व पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. आपल्या मतदारसंघातील माणासांना यशवंतराव कधीही नाराज करीत नसत. याच कारणामुळे ते आयुष्यात एकही निवडणूक हरले नाहीत.