• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-आर. आर. ना आत बोलवा...!

आर. आर. ना आत बोलवा...!
 
महाराष्ट्राचे गृहमंत्री ना. आर. आर. पाटील यांनी सांगितलेली ही आठवण ! १९७९ साली सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय संपादन करून आबांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. यशवंतरावांनी लावलेल्या ' पंचायत राज ' नावाच्या रोपट्याला आता मधुर फळे येऊ लागली होती. आबांप्रमाणेच इतरही अभ्यासू आणि ग्रामीण प्रश्नांची जाण आसणारे तरुण नेते पुढे येऊ लागले होते. या सर्वांचे प्रेरणास्थान अर्थातच यशवंतराव होते. साहेबांविषयी आबांच्या मनात नितांत आदर होता. एकदा यशवंतराव कराडला येणार आहेत हे कळाल्यावर सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी ' विरंगुळा ' बंगल्यावर यशवंतरावांना भेटायचे ठरविले. साहेबांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार म्हणून आर. आर. ही त्यांच्याबरोबर कराडला गेले. अंकलखोपचे दिनकरबापू या मंडळाचे नेतृत्व करीत होते. त्यांनी यशवंतरावांशी सर्वांची ओळख करून दिली. त्यातील बहुतेकांना यशवंतराव नावानिशी ओळखत होते. आबांची ओळख करून देताना बापू म्हणाले, ' हे आर. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.'
' आर. आर. पाटील ? म्हणजे ?' यशवंतरावांना पूर्ण नाव अपेक्षित होते.

' रावसाहेब रामराव पाटील ' आबा म्हणाले.

' छान...! सध्या काय करताय ?'

' एलएल. बी. चं शिक्षण घेतोय.'

' अरे व्वा...! चांगलं आहे.' यशवंतरावांना कौतुक वाटले. ते स्वत:देखील एक वकील राजकारणी होतेच. इतक्यात विलासराव शिंदे म्हणाले, ' साहेब , हा अतिशय गरीब व सामान्य कुटुंबातला मुलगा आहे. लोकांनी एका मोठ्या नेत्याचा पराभव करून त्याला निवडून दिलं आहे.'

आबांची ही पार्श्वभूमी ऐकून यशवंतराव एकदम खूष झाले. आबांकडे पाहून त्यांनी प्रसन्न स्मित केले. आबांनीही पटकन् पुढे होऊन वाकून साहेबांना नमस्कार केला. त्यावर साहेब म्हणाले, ' असू दे, असू दे...मोठा हो ...! आज आपल्याला तरुण व अभ्यासू नेत्यांची अतिशय गरज आहे.'

त्यानंतर इतर विषयांवर चर्चा सुरू असतानाच साहेबांचा नोकर साहेबांना जेवणाची वेळ झाल्याचे सांगून जेवणासाठी आत बोलावत होता. ' साहेबांच्या औषधपाण्याची वेळ चुकता कामा नये' असा खुद्द वेणुताईंचा कटाक्ष होता. तसा त्यांचा हुकुमच असल्याने नोकर काही केल्या साहेबांना आत बोलवायचा थांबेना. पण भेटायला आलेल्या लोकांना ताटकळत ठेऊन आपण जेवण करणे हे साहेबांना योग्य वाटेना. शेवटी कोणीतरी म्हणाले, ' साहेब, आपण जेवण करून घ्या, आम्ही थांबतो.' यावर ठीक आहे ' म्हणून यशवंतराव उठले व आत जाताजाता मागे वळून त्यांनी विचारले,' तुम्ही सगळे जेवलात का ?' यावर सगळेजण म्हणाले, ' हो हो ..., आम्ही जेवण करूनच आलोय.' पण साहेबांच्या शेजारीच उभे असलेल्या आर. आर. आबांच्या तोंडून खरे उत्तर बाहेर  पडले ' नाही...!'
इतर सर्वजण अवाक् होऊन आबांकडे पाहू लागले. आपले नेमके काय चुकले हे आबांना कळेना. । कारण त्यांनी ' नाही ' हे उत्तर दिले ते त्यांना भूक लागल्यामुळे नव्हे, तर चव्हाण साहेबांशी खोटं कसं बोलायचं म्हणून ! साहेब आत गेल्यावर बाकीचे सगळे लोक आबांना म्हणाले,

' आर. आर... अशा वेळी ' जेवलो ' म्हणून वेळ मारून न्यायची असते. तुम्ही आमची मोठीच पंचाईत केलीत.'

इतक्यात साहेबांचा नोकर बाहेर आला व आबांना म्हणाला, ' तुम्हाला साहेबांनी आत जेवायला बोलावलं आहे.' जमलेल्या लोकांना आणखी एक धक्का बसला . आर. आर. हसून सर्वांना उद्देशून म्हणाले , ' खरं बोलण्याचेही काही फायदे असतात...! '

त्यादिवशी आबा यशवंतरावांसोबत जेवले. गप्पा मारत मारत जेवण चालले असताना साहेबांनी आबांच्या कुटुंबाविषयी, कॉलेजविषयी माहिती विचारली. जेवण झाल्यावर ते दोघे जेव्हा बाहेर आले तेव्हा लोक यशवंतरावांकडे आदराने आणि आबांकडे कौतुकाने पाहात राहिले...!