या प्रेमाला पात्र ठरण्याचे भाग्य मला लाभावे
यशवंतराव बुद्धिवादी होते. तर्कशुद्ध विचार करणे हा त्यांचा स्वभावधर्म होता पण तरीही बहुतेक बुद्धीप्रामाण्यवाद्यांमध्ये आढळणारा रुक्षपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात नव्हता. आईवडील, मित्र परिवार आणि जनताजर्नादनावर त्यांची श्रद्धा होती. अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती पण श्रद्धेने माणसांच्या जीवनाला ओलावा मिळतो अशी त्यांची भावना होती. सातारा शहरात खिंडीतील गणपती हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सवड मिळाली आणि साता-यात मुक्काम असला की कामातून वेळ काढून यशवंतराव या गणपतीच्या दर्शनाला जात असत.
साता-यात राहणारे रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले हे साहेबांचे जवळचे मित्र होते. एकदा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या निमित्ताने यशवंतराव साता-याला आले होते. अर्ज भरण्यापूर्वी खिंडीतील गणपतीचे दर्शन घ्यावे असे यशवंतरावांना वाटले. त्यांनी बन्याबापूंना निरोप पाठवला व त्यांना बरोबर घेऊन साहेब गणपतीच्या दर्शनाला निघाले. जाताना बन्याबापू गंमतीने म्हणाले, ' तुम्हाला या गजाननाच्या आशीर्वादाची गरज का भासावी ?'
यशवंतराव हसले, थोड्या वेळाने धीरगंभीर आवाजात म्हणाले , ' बन्याबापू, आयुष्यात मला खूप काही मिळालं आहे. आता मला देवाजवळ स्वत:साठी काही मागायचे नाही. जनताजनार्दनाचं असीम प्रेम मला लाभलं आहे. या प्रेमाला आणि आदराला आपण कायम पात्र ठरण्याचे भाग्य मला लाभावे एवढीच माझी इच्छा आहे. तेवढी साधनशुचिता मजजवळ रहावी एवढीच प्रार्थना मला गणपतीला करायची आहे.'
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर एका कवितेत देवाला प्रार्थना करताना म्हणाले होते, ' देवा, संकटांपासून माझा बचाव कर असे माझे मागणे नाही, संकटांशी लढण्याचे सामर्थ्य मला लाभले एवढीच माझी अपेक्षा आहे.' देवाकडे साधनशुचिता मागणा-या यशवंतरावांची प्रार्थना त्याच जातकुळीतली होती.