ही आमची संस्कृती नाही !
सन १९७७ साली आणीबाणी उठली. देशात लोकसभेच्या निवडणुका लागल्या. यशवंतरावांचे प्रचार दौरे सुरू झाले. एका शहरात त्यांची सभा होती. त्याच शहरात आदल्या दिवशी विरोधी पक्षाच्या उमेदवाराची प्रचारसभा झाली होती. त्या सभेत एका नेत्याने यशवंतरावांवर बेताल टीका केली. वाट्टेल ते आरोप करून त्यांची मानखंडना केली. दुस-या दिवशी यशवंतरावांची सभा सुरू होण्यापूर्वी एक कार्यकर्ता साहेबांना म्हणाला, ' साहेब, आजच्या सभेत याचे उत्तर द्या. चांगला टोल्यास टोला हाणा.'
पण यशवंतराव हसले व म्हणाले, ' गांधी - नेहरूंच्या काँग्रेसने मला शिव्या द्यायला शिकवले नाही. शिव्या देणे ही आमची संस्कृती नाही.'
त्या प्रचारसभेत यशवंतरावांनी कालच्या प्रचार सभेतील टीकेचा उल्लेखही न करता भारतापुढील समस्यांचे विवेचन केले. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा आदरपूर्वकच उल्लेख केला. अशा छोट्या छोट्या प्रसंगांतूनच यशवंतरावांनी कार्यकर्त्यांवर संस्कार केले.