हे माझं गाणं आहे !
महाराष्ट्रात अनेक थोर कवी होऊन गेले. पण एकाचवेळी बालगीत, भावगीत आणि लावण्या सारख्याच सहजपणाने लिहिणारे ग. दि. माडगुळकर हे ख-या अर्थाने महाराष्ट्र वाल्मिकी होते. ' पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा ' हे त्रिकालबाधित सत्य गीत रामायणातून सांगणारे माडगूळकर ' बुगडी माझी सांडली गं , जाता साता-याला ' सारखी झकास लावणी सहज लिहित आणि तेच माडगूळकर ' नाच रे मोरा ' सारखे तमाम बालकांना डोलायला लावणारे गीतही लिहू शकत असत.
गदिमांच्या अलौकिक प्रतिभेमुळेच यशवंतराव त्यांचे निस्सीम चाहते बनले होते. गदिमांविषयी त्यांना अपार आदर आणि जिव्हाळा होता. एकदा यशवंतराव, विनायकदादा पाटील आणि इतर काही जण गप्पा मारीत बसले होते. गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. बालपण आणि शालेय जीवनातील आठवणींविषयी बोलताना यशवंतरावांनी ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेले ' झुक् झुक् झुक् आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी ' हे गीत गायला सुरूवात केली. सर्वांनीच ठेका धरला. हे गाणं गाता गाता ' मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजारवार ' या ओळीपाशी यशवंतराव एकदम थांबले. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, ' विनायकराव, हे गाणं ' माझं गाणं ' आहे. या गाण्याचं माझ्या व्यक्तिगत आयुष्यात खूप महत्त्व आहे. लहानपणी बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मला मामाच्या गावी रहावे लागले. मामांनी आम्हाला खूप मदत केली. हे गाणं ऐकलं की मला माझं आजोळ आठवतं, मामा आठवतो, मामाने केलेली मदत आठवते आणि पुन्हा एकदा मी माझं बालपण अनुभवतो. म्हणून हे गाणं मला ' माझं गाणं ' वाटतं .' असे होते यशवंतराव, एका साध्या बालगीताने देखील हळवे होणारे !