सभा संपल्यावर घरी येईन !
अॅड. एकनाथ साळवे हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार होते. त्यांनी सांगितलेली ही आठवण.
यशवंतराव तेव्हा संरक्षणमंत्री होते. एकदा चंद्रपुरात त्यांची मोठी सभा झाली. तेव्हा आमदार म्हणून साळवेंना सभा- मंचावर एका बाजूला पाठीमागच्या रांगेत स्थान मिळाले होते. यशवंतरावांनी आपल्या घरी यावे ही साळवेंची तीव्र इच्छा , पण त्यांना विचारायचे कसे ? मग साळवेंनी सभा सुरू असतानाच यशवंतरावांना एक चिठ्ठी पाठवली. चिठ्ठीत लिहिले होते, ' आदरणीय साहेब, आपण माझ्या घरी चहाला येऊ शकलात तर आम्ही धन्य होऊ.' त्याच चिठ्ठीवर यशवंतरावांनी उत्तर पाठवले, ' तू पुढे चल. सभा संपल्यावर मी घरी येईन. ' आपल्या झोपडीवजा घरात यशवंतराव येणार म्हणून साळवे सुखावले. पण त्यांचे घर इतके लहान होते, की एवढी माणसे कशी बसणार ? घरात खुर्च्याही नव्हत्या. पूर्वसूचना नसल्याने घरच्या मंडळींची तारांबळ उडाली. इकडे अत्यंत व्यस्त दौरा असूनही यशवंतरावांनी सभा संपल्यावर ड्रायव्हरला गाडी साळवेंच्या घराकडे घ्यायला सांगितली. जिल्ह्यातले इतर नेते संतापले. पोलीस अधिकारीही वैतागले. ' आमदार असले म्हणून काय झाले ? पूर्वसूचना द्यायला हवी होती ' असे म्हणाले. पण यशवंतराव आले. मग अधिकारी, नेतेही आले. आमदारांच्या झोपडीवजा घरापुढे गर्दी झाली. एकदोन मोठ्या नेत्यांसह यशवंतराव घरात शिरले. एका मोडक्या खुर्चीवर बसले. इतर नेते बाकड्यावर बसले. चहा बिस्किटांची व्यवस्था करण्यात गुंतलेल्या सौभाग्यवतींना खूप लाजल्यासारखे झाले. पण यशवंतराव सर्वांशी आपुलकीने बोलले . अगदी अनौपचारिकपणे वागले. जणू आपल्या आजोळी देवराष्ट्रेतच आले आहेत ! ते पंधरा - वीस मिनिटे थांबले, प्रेमाचा पाहुणचार घेतला व निघून गेले. अॅड. साळवे धन्य झाले. एवढा मोठा नेता, देशाचा संरक्षणमंत्री, पण या गरीबाच्या निमंत्रणाला मान देऊन आपल्या घरी आला. आणखी काय हवे ? यशवंतराव नेहमी गर्दीत राहिले, पण या गर्दीच्या पलिकडे उभ्या असलेल्या सामान्य माणसाकडे त्यांचे नेहमीच लक्ष असे.