• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- फसवू नका आणि फसूही नका !

फसवू नका आणि फसूही नका !

पुणे जिल्हयातील किल्ले पुरंदरगडावर शिवकाळातील शूर किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा समारंभ पुणे जिल्हा परिषदेने निश्चित केला. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतरावांना निमंत्रित केले. यशवंतराव तेव्हा केंद्रात मंत्री होते. दिल्लीहून ते येणार असल्याने गडावर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. समारंभ सुरू झाला. प्रास्ताविक आणि त्यानंतर काही वक्त्यांची भाषणे झाली. या भाषणातून मुरारबाजींची शौर्यकथा ऐकायला मिळेव अशी श्रोत्यांची अपेक्षा होती. पण वक्त्यांनी मुरारबाजींचा नाममात्र उल्लेख करून यशवंतरावांवरच स्तुतीसुमने उधळायला सुरुवात केली . ते बिचारे दुसरे काय करणार ? मुरारबाजीविषयी त्यांना काही माहितीच नसेल तर त्यांनी काय सांगावे ? ते वारंवार यशवंतरावांचा उल्लेख ' प्रतिशिवाजी ' असा करीत राहिले. यशवंतराव मात्र या स्तुतीमुळे अस्वस्थ झाले. नंतर त्यांचे भाषण सुरू झाले. आपल्या भाषणात त्यांनी मुरारबाजी देशपांडे या शूर किल्लेदाराच्या कामगिरीचा इतिहास सांगितला . तो उदबोधक तर होताच, पण प्रेरणादायीही होता. भाषणाच्या शेवटी ते स्तुतीपाठकांकडे वळले. ते म्हणाले, ' भोंगळ स्तुती करणारी भाषणे देण्याची सवय आपण सोडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा ' प्रतिशिवाजी ' कोणी असू शकत नाही. टिळकांना ' ' प्रतिटिळक ' किंवा महात्मा गांधींना ' प्रतिगांधी ' असू शकत नाही, शकणार नाही. मुघलांना पिटाळून लावण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आता प्रतिशिवाजी म्हणून कोण उदयाला येणार असेल तर अगोदर महाराष्ट्रावर पुन्हा मुघलांचे राज्य यावे लागेल. स्तुती करताना आपण इतिहास विसरतो हे योग्य नाही. स्तुतीने फसणा-यांपैकी मी नाही. तुम्ही फसवू नका आणि फसूही नका असे माझे सांगणे आहे. आपण एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत. देशाच्या संरक्षणाची प्रेरणा मुरारबाजींच्या मूर्तीपासून आपण घ्यावी आणि सर्व शक्तीनिशी आपला स्वतंत्र देश सुरक्षित राखावा, हे सांगण्यासाठी हा अवघड गड चढून मी आलो आहे. स्तुती विसरून आणि प्रेरणा घेऊन मी तुमचा आणि या गडाचा निरोप घेत आहे.'