• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-कायद्यानुसार जे योग्य आहे ते करा

कायद्यानुसार जे योग्य आहे ते करा
 
द्विभाषिकाचे मुख्यमंत्री असताना १९५८ सालच्या मार्च महिन्यात यशवंतरावांवर पित्ताशयातील खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर विश्रांतीसाठी यशवंतराव काही दिवस पन्हाळ्याला गेले. त्यांची राहण्याची व्यवस्था प्रसिद्ध उद्योगपती रामनिवासजी रूईया यांच्या बंगल्यात केली होती. त्यावेळी श्री. राम प्रधान हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करीत होते.

यशवंतराव पन्हाळ्यात पोहोचल्यावर जिल्हाधिकारी या नात्याने प्रधानांनी त्यांचे स्वागत केले व तेथील सर्व व्यवस्थेची त्यांना माहिती दिली. थोड्या वेळाने प्रधान कोल्हापूरला जायला निघाले तेव्हा यशवंतराव म्हणाले, ' प्रधान , तुम्ही इथे माझ्याबरोबर का रहात नाही ? हा बंगला कितीतरी मोठा आहे. ' प्रधानांनी नम्रपणे हे निमंत्रण नाकारले, पण त्यापाठीमागे एक कारण होते, जे यशवंतरावांना माहीत नव्हते.

त्याचे असे झाले होते की, पन्हाळा किल्ला व त्या पठारावरील काही प्लॉटस् शासनाने विकले होते. त्यावर दोन- तीन उद्योगपतींनी बंगले बांधले होते. त्यातीलच एक बंगला रूईयांचा होता. प्लॉटस् विकताना शासनाने ज्या अटी घातल्या होत्या, त्यात प्लॉटचा ताबा घेतल्यानंतर ठराविक मुदतीत बंगला बांधला पाहिजे ही अट होती. रूईयाशेटनी ती मदत संपल्यानंतर बंगला बांधला होता. परंतु बांधकाम सुरू करण्याअगोदर शासनाची परवानगी घेतली नव्हती. ज्यावर बांधकाम झाले नव्हते ते प्लॉटस् शासनाने ताब्यात घेतले होते. प्रश्न होता फक्त रूईयांच्या बंगल्याचा. जिल्हाधिकारी या नात्याने प्रधानांनी रूईयांना ' आपली जमीन व बंगला जप्त का करू नये ?' अशी नोटीसही पाठविली होती. पण आता खुद्द मुख्यमंत्रीच त्या बंगल्यात रूईयांचे पाहुणे म्हणून रहात असताना कारवाई कशी करायची हा प्रश्न होता. जप्तीच्या कारवाईचा मसुदा तयार होता, फक्त सही करणे बाकी होते.

एके दिवशी प्रधानांनी यशवंतरावांना हे सर्व सांगितले आणि म्हणाले, ' माझा नाईलाज आहे, पण आपण मुंबईला परत गेल्यानंतर मी सही करून तप्तीचा हुकुम काढीन. ' यावर यशवंतराव हसले व म्हणाले, ' यात मला काही अयोग्य वाटत नाही. जे काही कायद्याप्रमाणे करायचे आहे ते तुम्ही करा. मी रूईया शेठना समजावून सांगेन.'

आपल्या पदाचा वापर करून जिल्हाधिका-यांवर दबाव आणणे यशवंतरावांना सहज शक्य होते. रूईयांचे पाहुणे म्हणून रहात असताना सुद्धा यशवंतरावांनी शेवटी कायद्याचाच मान राखला. ते ' रूईयांना समजावतो ' असं म्हणाले ; जिल्हाधिका-यांना समजावतो ' असं म्हणाले नाहीत ! ! कर्तव्य आणि भावना यांच्यातला हा फरक ओळखणारे यशवंतराव म्हणूनच आजही आदर्श वाटतात.