कृष्णाकांठ१२६

१९३७ सालपर्यंत कूपर, ज्यांचा उल्लेख मी पूर्वी केला आहे, त्यांनी मोठ्या कौशल्याने या संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे एक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असे वर्चस्व निदान १९३७-३८ पर्यंत होते, असे म्हटले, तरी चालेल. ते १९३७ च्या कौन्सिल निवडणुकीस उभे राहिले होते आणि निवडूनही आले होते. १९३५ सालच्या कायद्याखाली पहिले मुंबई सरकार बनले, त्यात ते काही महिनेपर्यंत पहिले मुख्यमंत्री म्हणून राहिले. पुढे काँग्रेसने अधिकार ग्रहण करावयाचे ठरविल्यानंतर त्यांना बाजूला व्हावे लागले, ही गोष्ट निराळी. तसा हा लांब पल्ल्याच्या नजरेचा माणूस होता. परंतु इंग्रजधार्जिणा असल्यामुळे आम्हांला तो नकोसा होता. जिल्ह्याच्या राजकारणावरील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड सोडायची नाही, हा त्यांचा नेहमीचा डाव होता. १९३७ साली कौन्सिलच्या निवडणुका जिंकल्यानंतर लोकमतात बराच फरक पडला आणि सातारा जिल्हा बोर्डाची निवडणूक आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे लढविली. फिरलेले वारे लक्षात घेऊन कूपरच्या पाठीमागे असणारे काही लोक आमच्याही पाठीमागे लागले. त्यावेळी पहिल्या प्रथम राष्ट्रीय वृत्तीचा जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष निवडण्याची संधी लोकांना मिळाली होती. १९३७ सालच्या कौन्सिल निवडणुकीच्या वेळच्या माझ्या कामामुळे निवडणुकीच्या कामातला छोटासा तज्ज्ञ म्हणून माझाही हळूहळू लौकिक बनत चालला होता. त्यामुळे १९३७ सालच्या जिल्हा लोकल बोर्डात निवडून आलेल्यांपैकी श्री. धुळाप्पा आण्णा नवले, सखाराम बाजी रेठरेकर आणि गौरीहर सिंहासने हे माझे महत्त्वाचे मित्र झाले होते. जवळ जवळ चार-सहा महत्त्वाच्या जिल्हा बोर्डाच्या सभासदांचा मी राजकीय सल्लागार मानला जाई. त्यामुळे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष कोण असावे, या चर्चांमध्ये माझे हमखास स्थान असे.

१९३७ सालच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी आमचे काम सोपे होते. पक्षाने निवडणूक लढविली होती आणि पक्षापुढे उमेदवारही उत्तम होते. कौन्सिलच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये उत्तर सातारा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार बाबासाहेब शिंदे हे जिल्हा बोर्डातही निवडून आले होते आणि त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारावे, असे सर्वसामान्य मत होते आणि तसे ते झालेही.

बाबासाहेब शिंदे हे १९२१ सालापासून राष्ट्रीय चळवळीशी संबंध असलेले आमच्यांतले जुने कार्यकर्ते होते. त्यांना ग्रामीण जनतेमध्ये मोठा मान असे. एक खादीधारी राष्ट्रभक्त पुढारी असा त्यांचा त्यावेळी लौकिक होता. त्यांच्या या निवडणुकीच्या वेळी त्यांचा माझा पहिला संबंध आला आणि हळूहळू त्या संबंधाचे रूपांतर गाढ स्नेहात झाले.

मी १९३७ सालची आमची ही हकीकत एवढ्यासाठी सांगितली, की या पार्श्वभूमीवर १९४१ साली आमच्यापुढे जे प्रश्न उभे होते, त्याची कल्पना यावी.

१९४१ साली युद्धकालीन परिस्थितीमुळे आमचा पक्ष कोणत्याही निवडणुका लढविण्याच्या मन:स्थिती नव्हता. त्यावेळी आमच्यांतले पुष्कळसे महत्त्वाचे कार्यकर्ते कारागृहात होते. त्यामुळे पक्षातर्फे निवडणूक लढविण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण जेलच्या बाहेर क्रियाशील अशी आम्ही जी मंडळी होतो, त्यांना या प्रश्नाकडे दुर्लक्षही करता येत नव्हते. श्री. के. डी. पाटील, श्री. किसन वीर यांना निमंत्रण दिल्याचे मी जेव्हा सांगितले, ते या गोष्टीचा विचार करण्यासाठी. आम्ही एकत्र बसून जो विचार केला, तो हा, की प्रत्यक्ष पक्षातर्फे अधिकृत उमेदवार तर उभे करता येणार नाहीत. पण जनतेमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या सत्तास्थानांमध्ये कूपरची मंडळी म्हणजे एका अर्थाने सरकारपक्षीय मंडळी ही बिनधोक येऊ दिली, तर आपल्या राष्ट्रीय चळवळीचे काम अडचणीचे होईल. तेव्हा त्याची काळजी घेतली पाहिजे, हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता आणि त्यांच्या-आमच्या चर्चेतून आम्ही असे ठरविले, की वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये निवडून येतील, अशी, परंतु खंबीरपणे राष्ट्रीय धोरणाबरोबर राहतील, अशी काही मंडळी निवडणुकीसाठी उभी केली पाहिजेत आणि त्यांना निवडून येण्यासाठी मदत केली पाहिजे. या निर्णयाप्रमाणे वाळवे, तासगाव, कराड, वाई आणि सातारा, जावळी या तालुक्यांतून आमचे काही मित्र निवडणुकीला उभे राहतील, अशी आम्ही व्यवस्था केली. ते सर्व लोक चांगले कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या परिश्रमांनी आणि काँग्रेसच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून आले आणि जेव्हा सर्व जिल्ह्याच्या निवडणुकीचा हा तक्ता समोर आला, तेव्हा लोकांच्या लक्षात आले, की जिल्हा बोर्डाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी जे काही मनुष्यबळ लागते, त्यातला एक चांगलासा गट आमच्या म्हणण्याप्रमाणे काम करणारा आहे. या जिल्हा लोकल बोर्डाच्या राजकारणातल्या पटावरील सोंगट्या मोठ्या मजेदार बसल्या होत्या.