• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१२१

या काळात महात्मा गांधीजींची मन:स्थिती अशी होती, की यावेळी चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू करण्यामध्ये त्यांना अहित दिसत होते. त्यामुळे अशी चळवळ सुरू करावयास ते उत्सुक नव्हते. त्यांना दिलेल्या अधिकाराप्रमाणे मार्ग काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या तंत्राप्रमाणे स्वातंत्र्याची हमी वगैरे मोठे प्रश्न बाजूला ठेवले आणि प्रतीकात्मक अशी एक महत्त्वाची गोष्ट स्वीकारली आणि ती म्हणजे 'भाषण-स्वातंत्र्याचा हक्क'. त्यासंबंधाने निश्चित काही करण्यापूर्वी त्यांनी लिनलिथगोंची भेट मागितली आणि त्याप्रमाणे १९४० सालच्या सप्टेंबरमध्ये महात्मा गांधी लिनलिथगोंना भेटले व त्यांनी ही भाषण-स्वातंत्र्याची मागणी तत्त्व म्हणून स्वीकारण्याचा त्यांना आग्रह केला.

अर्थात या भाषण-स्वातंत्र्याचा उपयोग स्वातंत्र्य मिळेतोपर्यंत युद्धाला विरोध हीच खरी भूमिका असल्यामुळे लिनलिथगोंनी ती स्वीकारली नाही. महात्मा गांधींच्याही पुढेही एका अर्थाने पेच होता. जनसंग्राम न करण्याचा त्यांचा विचार पक्का होता. म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी सत्याग्रहाची एक नवी कल्पना अमलात आणावयाचे ठरवले. त्यांच्या परंपरेतल्या एका अत्यंत उत्कृष्ट माणसाची निवड करून त्याने सर्व देशातर्फे सत्याग्रह करावा, असे त्यांनी ठरविले आणि या दृष्टीने हा प्रतीकात्मक सत्याग्रह करण्याचे काम श्री. विनोबा भावे यांच्यावर सोपविले.

श्री. विनोबा भावे तोपर्यंत त्यांच्या आश्रमात त्यांचे अंतेवासी म्हणून काम करत होते. आदर्श गांधीवादी आणि अद्वितीय व्यासंगी व ज्ञानी असा त्यांचा आश्रमात लौकिक होता. त्यांच्या वैयक्तिक श्रेष्ठतेबद्दल सर्वांनाच मान होता. काँग्रेसच्या इतर सर्व स्वराज्याच्या चळवळींत गांधीजींप्रमाणे त्यांनीही भाग घेतला होता. परंतु यावेळी सबंध देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अपूर्व सन्मान त्यांच्याकडे चालून आला. ते इतके थोर कार्य जरी करीत होते, तरी त्या मानाने ते कमी प्रसिद्ध होते.

विनोबांच्या निवडीने सबंध जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सत्याग्रही युद्धाच्या तंत्राप्रमाणे गांधीजींनी टाकलेला हा अतिशय महत्त्वाचा पवित्रा होता. नैतिक दृष्ट्या ब्रिटिश सत्तेची भूमिका किती कमजोर आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला.

विनोबांच्या सत्याग्रहानंतर काही दिवसांनी प्रातिनिधिक स्वरूपाने सत्याग्रह करण्याची इतर कार्यकर्त्यांनाही गांधीजींनी मुभा दिली. व्यक्तिश: त्यांना जेलमध्ये जाण्याची घाई नव्हती. त्यामुळे वैयक्तिक सत्याग्रह करणाऱ्यांची यादी निवडीचे काम त्यांनी स्वत:कडे घेतले आणि सर्व देशभर वेगवेगळ्या प्रांतांतील व जिल्ह्यांतील अनेक माणसे सत्याग्रह करून तुरुंगात जाऊ लागली.

जनतेमध्ये यासंबंधाने फारसा उत्साह दिसत नव्हता. परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कृतिशून्यता संपली, याचे समाधान होते. आमच्या सातारा जिल्ह्यातून अनेक प्रमुख लोक या वैयक्तिक सत्याग्रहात गेले. श्री. विट्ठलराव पागे, स्वामी रामानंद भारती, भाऊसाहेब सोमण, श्री. वसंतदादा पाटील, सिंहासने व व्यंकटराव पवार अशी अनेक मंडळी या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये सामील झाली.

श्री. व्यंकटराव पवार हे आमच्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते जेलमध्ये गेल्यानंतर सर्व प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारावी, असा मला आदेश दिला.

या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये कोणी सत्याग्रह करावा, याची निवड खुद्द गांधीजी करीत असत. आमच्या प्रांतातर्फे प्रमुख म्हणून श्री. बुवासाहेब गोसावी हे काम पाहत असत. बुवासाहेब गोसावी हे वर्ध्यास जाऊन गांधीजींकडून नावे स्वीकृत करून घेत असत आणि अशी मंडळी नंतर जाहीर सभेमध्ये घोषणा करून जेलमध्ये जात असत. सर्व महाराष्ट्रभर असे शेकडो कार्यकर्ते निवडून सत्याग्रही बनले. बुवासाहेब गोसावींनी मला एकदा विचारले, ''या वैयक्तिक सत्याग्रहात जाण्याची तुमची इच्छा आहे काय?'' मी सांगितले, ''मी जरूर जाईन. तुम्ही कोणी तसा आदेश देत असाल, तर माझी सर्व तयारी आहे. पण निव्वळ प्रतीकात्मक अशा चळवळीमध्ये माझे काही मन नाही.''