• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१२

आजीने इडापिडा टळो, म्हणून गालांवरून बोटे उतरली आणि कडकड मोडली. तिच्या डोळ्यांत पाणी जमले.

रात्री आजीने दृष्ट काढली आणि सागरोबाचा अंगारा लावला.

'विठाई' व 'यशवंत' या दोन नावांमागचा इतिहास प्रथमच मला समजला. आईच्या प्राणाची साक्ष म्हणून माझे नाव यशवंत आहे, हे कळल्यापासून आई हाच माझा प्राण झाली.

माझ्या थोरल्या बंधूंना नोकरी मिळाल्यानंतर ते काही दिवस कराडमध्ये होते. नंतर त्यांची बदली होऊन ते विट्याला गेले. परंतु माझ्या आईने निर्णय घेतला, की दोन्ही धाकटी मुले घेऊन तिने कराडलाच राहावे आणि त्यांचे शिक्षण पुरे करावे. माझ्या आईचा हा एक ध्यास होता. तिने स्वीकारलेला मंत्र होता, की शिक्षण ही शक्ती आहे. ती मिळवली पाहिजे. आपल्या मुलांचे शिक्षण पुरे केले पाहिजे. या दृष्टीने तिने घेतलेला हा निर्णय आमच्या आयुष्याला दिशा द्यायला मूळ कारणीभूत आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे. आणि तिच्या या निर्णयाच्या निमित्ताने आम्ही कराडकर झालो. त्यानंतर कराडशी जो संपर्क आला, तो कायमचाच. तेच आमचे गाव झाले आणि कार्यक्षेत्रही झाले.

माझी आई शाळेत शिकली नव्हती. पण शिक्षणाचे मोल ती मनोमन जाणत होती. आमच्या घरची तशी गरिबीच असली, तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ही श्रीमंती आम्हा मुलांपर्यत पोचविण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. 'देव आपल्या पाठीशी आहे ', ही तिची निष्ठा होती.  त्यामुळेच ती संकटकाळी कधी डगमगली नाही.  आम्हांला ती सतत धीर देई. पहाटे दळण दळताना-

'नका, बाळांनो, डगमगू
चंद्र-सूर्यावरील जाई ढगू....'

ही दिलासा देणारी ओवी तिच्या मांडीवर झोपून मी कितीतरी वेळा ऐकली आहे.

उत्तरेकडून येणारी कृष्णा आणि दक्षिणेकडून येणारी कोयना यांचा समोरासमोर येऊन प्रीतिसंगम होतो व मग नदीचा प्रवाह सरळ पूर्वेकडे वाहतो. या संगमामुळे होणा-या काटकोनात वसलेले दोन नद्यांच्या काठचे गाव, म्हणजे कराड. हे फार प्राचीन असे गाव आहे व तसा इतिहासही आहे.  आजही तसे ते मोठे शहर नाही, ५५-६० हजारांची लोकसंख्या असावी. पण मी त्या गावात जेव्हा वाढत होतो, तेव्हा त्याची १५-१६ हजारांची लोकवस्ती होती. सर्वजण एकमेकाला ओळखू शकतील, अशी परिस्थिती होती. थोड्या फार प्रमाणात आजही तशीच आहे.