''हो, जरूर हो मामलेदार. मामलेदार झाल्यानंतर विट्याला बदली करून घे. आणि आपल्या देवराष्ट्राला भेट द्यायला ये. मग पाटील आणि सगळी मंडळी जमली असतांना तू मला नावाने हाक मारून आपल्याजवळ बोलावून घे. माझी गावात केवढी मोठी इज्जत वाढेल !''
ही एक नमुनेदार आठवण आहे. यात शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन काय होता आणि शासनाशी संबंध असल्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा वाढते, ही भावना समाजात कशी रूजली होती, त्याचे हे बोलके चित्र आहे किंवा एक नमुना आहे.
पुढे पुढे मी त्यांना सांगत असे,
''मी काही मामलेदार वगैरे कधी होणार नाही.''
कारण तोपर्यंत माझे विचार वेगळ्या दिशेने वाहू लागले होते. ते मी त्यांना समजावून सांगितलेही नाही व सांगून काही उपयोगही नव्हता. परंतु त्या माणसाची भोळी आशा आणि त्यातील आपलेपणाचा भाग यांमुळे ही गोष्ट आणि हे संभाषण मला नित्य आठवते.
पुढे मी मंत्री झाल्यानंतर त्यांची-माझी भेट झाली. त्यांना आनंदही झालेला दिसला. परंतु मी मामलेदार न होता मंत्री झालो, यात त्यांना खरे समाधान झाले, की नाही, हे माहीत नाही. मामलेदारकीचे त्यांचे स्वप्न मी काही पुरे करू शकलो नव्हतो, ही गोष्ट मात्र खरी आहे !
शेतीशी संबंध असलेला माणूस नजीकच्या राजकीय सत्तेला फार वरिष्ठ मानतो, हा माझा अनुभव यापुढेही मला येत गेला. देवराष्ट्राच्या या अनुभवाची शिदोरी माझ्या मनाला एक प्रकारचे शिक्षण देत होती. कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास लागणारी जी मनाची तयारी असावी लागते आणि सामाजिक जाणिवांची माहिती असणे आवश्यक असते, ती यातून मिळत गेली.
आजोळी माझ्या आईला सर्वजण 'आक्का ' म्हणत असत. ती घरात सर्वांत मोठी, म्हणून आला-गेला माणूसही आक्काच म्हणत असे. आजोळी घरी असताना एकदा आजीला विचारले, तेव्हा ती म्हणाली,
''आक्काचं नाव देवाचं आहे. विठाई आपला देव आहे.''
आजी काय म्हणते, ते मला कळत नव्हते. पण ती काही तरी चांगले म्हणाली, असे वाटले.
याच वेळी बोलण्याच्या ओघात माझ्या नावामागची कथाही तिने सांगितली. ती म्हणाली, ''तुझ्या जन्माच्या वेळी आईला फार त्रास झाला. ती बेशुद्ध झाली. आपलं गाव खेडेगाव. दवापाण्याची सोय नाही. घरगुती औषधपाणी केलं, पण गुण येईना. माझ्या जिवाला घोर लागला. अखेर सागरोबाला साकडं घातलं आणि देवाला काकुळतीनं विनवलं, आक्काला जगवण्यात माझ्या हाताला यश दे, तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव यशवंत ठेवू.'' सागरोबानं ऐकलं. म्हणून तुझं नाव यशवंत ठेवलं.''