आमच्या जिल्ह्यातले मुंबईत काम करत असलेले एक प्रसिद्ध कार्यकर्ते श्री. बाबूराव गोडसे यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्या घरी उतरलो. सरदार पटेलांना मला भेटायचे आहे, याची कल्पना मी त्यांना दिली. त्यावर ते म्हणाले,
''मला त्यांची तितकीशी माहिती नाही, पण त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत तुम्हांला नेऊन पोहोचविण्याचे काम माझे. पुढे भेट मिळविण्याचे वगैरे कौशल्य तुमचे तुम्ही दाखविले पाहिजे.'' सरदार पटेल त्यावेळी मुंबईमध्ये त्यांच्या चिरंजीवांकडे एका आलीशान इमारतीमध्ये उतरत असत. श्री. गोडसे यांनी मला श्री. डाह्याभाई पटेल यांच्या राहण्याच्या जागेपर्यंत नेऊन पोहोचविले. तेथे कार्यकर्त्यांची तर रीघ लागलेली होती. सहजासहजी भेट मिळेल, असे चिन्ह दिसेना.
सर्व मंडळी भेटून जाईपर्यंत मी तेथे तास, दीड तास बसून राहिलो. आणि मी तेथे एकटा राहिलेलो पाहून मला श्री. डाह्याभाईंनी येऊन विचारले,
''तुमचे काय काम आहे?''
त्यांना मी माझी माहिती दिली आणि 'सरदारांशी मला फक्त दोन मिनिटे बोलावयाचे आहे. वेळ मिळेल का,' असे मी विचारले.
डाह्याभाई स्वभावाने तुसडे होते, पण का, कोण जाणे, त्या दिवशी त्यांना माझी दया आली असावी. ते थोडा वेळ आत गेले आणि नंतर त्यांनी मला आत बोलावून घेतले.
एका सोईस्कर अशा खुर्चीवर सरदार पटेल यांची गंभीर मूर्ती बसली होती. मी त्यांना इतक्या जवळून प्रथमच पाहिले. त्यांच्याशी बोलायला मला माझा आवाजच सापडेना, पण शेवटी धैर्य करून मी त्यांना सांगितले,
''मी महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता आहे. आमच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीत नव्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी जो शेतकरी उमेदवार आहे, त्याला मान्यता मिळावी, याकरता आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्या सर्व कार्यकर्त्यांनी मला तुमच्याकडे पाठविले आहे. आमच्या जिल्ह्यातील आणि प्रांतातील नेते काय करतील, यासंबंधी आमच्या मनात शंका आहे आणि म्हणून तुमच्या कानांवर ही गोष्ट घालावी, म्हणून आलो.''
तेवढ्या वेळातच त्यांनी मला दोन-तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले. माझी माहिती विचारली आणि हसत हसत त्यांनी शेवटी विचारले,
''हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी पडला, तर त्याची जोखीम कोण घेणार?''
मी सांगितले,
''आम्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्यांची जबाबदारी घेऊ.''
दहा-पंधरा मिनिटांत आमची मुलाखत संपली आणि मी त्याच रात्रीच्या गाडीने पुण्याला परत गेलो. सातारमध्ये कार्यकर्ते माझी वाट पाहत होते, म्हणून सकाळच्या मोटारने मी तडक सातारला पोहोचलो. माझी सरदारांशी झालेली मुलाखत मी सविस्तरपणे आत्माराम बापूंना आणि इतर मित्र-मंडळींना सांगितली. सर्वांना समाधान वाटले. आपल्या हाती जे शक्य होते, ते सर्व केले आहे, आता व्यर्थ चिंता कशाला करायची, असा सर्वांचा रोख दिसला आणि मीही माझ्या कॉलेजसाठी कोल्हापूरला निघून गेलो.
थंडीचे दिवस चालू होत होते. फैजपूरची काँग्रेस नुकतीच झाली होती, त्यामुळे श्रेष्ठी मंडळी काहीशी थकून गेल्यासारखी झाली होती.