• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ९८

प्रत्यक्ष उमेदवारांच्या निवडीचा प्रश्न जेव्हा आला, तेव्हा श्री. शंकरराव साठे यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, तेच मुद्दे पुन्हा पुन्हा पुढे येऊ लागले आणि आत्माराम पाटलांची उमेदवारी मोकळ्या मनाने स्वीकारावी, अशी परिस्थिती काही साता-यात निर्माण होईना. एका अर्थाने पुढारी व कार्यकर्ते यांमधील हा एक संघर्ष उभा राहिला होता, असे म्हटले, तरी चालेल, अशी परिस्थिती होती. त्या वेळच्या वृत्तपत्रांतून याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या, आणि त्यांमुळे आत्माराम बापू पाटील हे उमेदवार होऊ इच्छितात, याची खूप प्रसिद्धी होऊन गेली.

भाऊसाहेब सोमणांनी ही सर्व परिस्थिती प्रांतिकच्या लोकांना कळवून निर्णय त्यांच्यावर सोपवावा, अशी भूमिका घेतली. हीसुद्धा आमच्या दृष्टीने काही कमी प्रगती नव्हती. महाराष्ट्र प्रांतिकची जी कर्ती माणसे होती, त्यांत त्यांच्या अधिक जवळ श्री. बुवासाहेब गोसावी होते, तेव्हा त्यांना समजावीत राहणे हा एक मार्ग आम्ही पत्करला. आत्माराम बापू पाटील स्वतः उमेदवार होऊ इच्छिणारे असल्यामुळे ते बरेच हिंडत फिरत होते. पुणे-सातारा अशा त्यांच्या गाठीभेटी चालू होत्या. भेटीत काय होत होते, ते मला कोल्हापूरला येऊन सांगत असत. ठरल्याप्रमाणे दर शनिवार-रविवारी सातारा जिल्ह्याचा प्रवास हा माझा नित्यक्रम झाला होता. निवडणूक अगदी तोंडाला जरी आली, तरी या उमेदवाराचा निर्णय होत नव्हता. काय कारण असेल, ते मला माहीत नव्हते. पण ग्रामीण भागामध्ये नवीन माणसे नव्या विचाराने आणि शक्तीने उभी राहिली आहेत, हे अजून प्रांतिकच्याही नेतृत्वाने मनाने स्वीकारले नव्हते. हे एक कारण असले पाहिजे, आणि दुसरे, ही सर्व मंडळी या तऱ्हेने एवढ्या मोठ्या निवडणुका प्रथमच लढवीत असल्यामुळे त्यांना परिस्थितीचे खरे निदान होत नव्हते. पुण्याला जेव्हा या उमेदवारीच्या निर्णयासाठी चर्चा केल्या गेल्या, तेव्हा आम्ही चार-सहा मंडळी पुण्याला गेलो होतो. आमच्या उमेदवारीचा मुद्दा हा आम्हां कार्यकर्त्यांच्या इज्जतीचा प्रश्न झाला होता. त्यामुळे ही गोष्ट करून घेतली पाहिजे व त्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असा आमचा निर्धार झाला होता.

आत्माराम बापू पाटील यांनी प्रांतिक पुढाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी काही निर्णयात्मक सांगितले नाही. पाहू काय होते, असे म्हणून त्यांनी सोडून दिले होते. या भागातील आमच्या मतदार-संघातील दुसरी एक-दोन जुन्यातील मोठी जमीनदार माणसे होती. त्यांच्या नावांची चर्चा तेथे चालू होती. आमच्यांतील काही मंडळींनी त्यांनाही जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांची मी आता नावे देत नाही. त्यांना निवडणुकीबाबत एवढीशीही उत्सुकता नव्हती. आम्ही आमच्या पुढाऱ्यांना हे सांगितले, पण आमच्यावर विश्वास ठेवणार कोण ?

शेवटी आम्ही सातारला बसून निर्णय घेतला, की या बाबतीत आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत आपले म्हणणे मांडले पाहिजेल. वर्तमानपत्रांतून येणा-या वृत्ताच्या आधाराने, सरदार वल्लभभाई पटेल मुंबईला केव्हा येतात, इकडे आम्ही लक्ष लावून होतो.

त्या सुमारास ते मुंबईला आले आहेत, असे जेव्हा आम्ही वाचले, तेव्हा आत्माराम बापूंनी सुचविले, की मी एकट्याने मुंबईला जाऊन सरदार पटेलांशी या बाबतीत बोलून यावे.
मी म्हटले,

''अहो, यापूर्वी फक्त एकदाच मी मुंबईला गेलो आहे. तशी मला मुंबईची माहितीही नाही, सरदार पटेल मला भेटतील तरी का ?''

त्यांनी सांगितले, की प्रयत्न करून पाहा, नाही भेटले, तर नाही भेटले, पण आपल्या हातात आहे, ते शेवटी आपण सर्व करून पाहिले, एवढे तरी समाधान होईल.

ह्या वेळेपर्यंत आत्माराम पाटलांच्या उमेदवारीबद्दल लोकांमध्ये अनुकूल कल निर्माण झाला होता, आणि आम्हांलाही आत्मविश्वास निर्माण झाला होता, की ते निश्चित निवडून येतील. सरदार पटेलांना भेटण्याची सूचना मी भीतभीतच स्वीकारली आणि मुंबईला गेलो.