हे सांगताना माझ्यापुढे केळकर, भोपटकर या मंडळींची नावे होती.
''गांधीजींचे नेतृत्व मानणारे शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ यांचे नेतृत्व अजून निःशंकपणे प्रस्थापित व्हावयाचे आहे. त्यांचा तो प्रवास सुरू आहे. परंतु त्यांची अजूनही नेतृत्व-संघटनेच्या दृष्टीने जिल्ह्याजिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची साखळी निर्माण झालेली नाही. जिल्ह्याजिल्ह्यांतही पहिल्यापासून वृद्ध. यशस्वी वकिलाकडे किंवा डॉक्टरकडे जिल्ह्याचे नेतृत्व असण्याची जी परंपरा आहे, ती आपल्या सातारा जिल्ह्यात अजून चालू आहे.''
मी भाऊसाहेब सोमणांबद्दल अतिशय आदराने बोललो. मी त्यांना सांगितले,
''जिल्ह्यामध्ये अजूनही गेल्या सहा वर्षांत नवीन कार्यकर्त्यांची जी पिढी निर्माण झाली आहे, त्यांचे काम आणि कर्तृत्व याची त्यांना जेवढी जवळून माहिती असावयास पाहिजे, तेवढी नाही, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जवळीकही निर्माण झालेली नाही. ही जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. निवडणुकीचा जो विचार ही मंडळी करीत आहेत, तो ते अगदी जुनाट पद्धतीने करताहेत. खेड्यापुरते बोलावयाचे झाले, तर मोठ्या वाड्यातील लोक या जमीनदार; शहरापुरते बोलावयाचे झाले, तर कोणी पैसेवाला, कोणी व्यापारी, किंवा मोठी प्रॅक्टिस असलेला वकील किंवा डॉक्टर यांच्याकडे ही मंडळी पाहतात. या त्यांच्या जुन्या सवयी आहेत. त्यासंबंधाने रागावून काही उपयोग नाही. आपण नव्या पिढीतील कार्यकर्ते आहोत, म्हणून आपणांस निराश न होता प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अखेरपर्यंत जावे लागेल. बदललेल्या काळाचे महत्त्व ही मंडळी समजतील आणि मला जे कार्यकर्त्यांचे मन समजले आहे, त्यावरून आत्माराम बापू पाटलांसारखा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असलेला उमेदवार हा प्रांतिक नेतृत्वाला मान्य करावा लागेल. पण त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींना आताच आपण दुखविता कामा नये.''
मला समजले, त्याप्रमाणे ब-याच लांबलचक परिस्थितीचा वेध घेत, मी माझे मत मांडले.
इतरही ब-याच चर्चा झाल्या आणि आपला प्रयत्न चालू ठेवावयाचा आणि आत्माराम बापू हे आपले उमेदवार हे निश्चित करून, इतर कार्यकर्त्यांशी बोलावयाचे, असा निर्णय करून आम्ही त्या बैठकीतून उठलो.
दिवस भराभर जात होते. वृत्तपत्रांतून उमेदवाराच्या नावांसंबंधीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आमच्या सातारा जिल्ह्याला दोन मतदार-संघ होतेः एक, सातारा आणि आसपासचे तालुके आणि दुसरा, कराड, वाळवे आणि आसपासचे तालुके असे हे दोन मतदार-संघ होते. आमचा विशेष प्रयत्न अर्थात कराड, वाळवे या मतदार-संघांसाठीच मर्यादित होता. दुस-या मतदार-संघातील तालुक्यांमध्ये दुसरी मंडळी प्रयत्नशील होती. कार्यकर्त्यांशी व लोकांशी जेव्हा आम्ही बसून बोलू लागलो, तेव्हा आत्माराम बापूंच्या उमेदवारीला सहज, उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळू लागला. निवडणुकीच्या खर्चाचा प्रश्न जेव्हा उभा राहिला, तेव्हा कार्यकर्ते म्हणू लागले, की स्थानिक खर्च आमचा आम्ही करू. त्यामुळे त्या प्रश्नाची फारशी भीती मनात राहिली नाही.
आत्माराम बापू पाटील हे मध्यम शेतकरी कुटुंबातील होते. तीन भावांपैकी ते मधले बंधू होते. त्यांना लहान शेतकरी कुटुंबातील म्हणता येणार नाही, एवढी त्यांची शेती होती. ते मध्यम शेतकरी होते, असे म्हणणे जास्त उचित ठरेल. त्यावेळी ते अविवाहित होते आणि त्यांच्या कुटुंबातील शेतीचा सर्व भार मोठ्या आणि धाकट्या बंधूंवर टाकून सर्व वेळ काम करण्यासाठी त्यांच्या बंधूंनी आत्माराम बापूंना मुक्त केले होते. त्यांच्या कार्याला त्यांच्या दोन्ही बंधूंचा मनापासून पाठिंबा होता.
आत्माराम बापू हे उंचीने किंचितसे कमी, परंतु रेखीव चेह-यामुळे मनात भरणारी व्यक्ती होती. त्यांचे खोल डोळे आणि अणकुचीदार असलेले गरूडासारखे नाक हे त्यांच्या चेह-याचे वैशिष्ट्य होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले होते. कोल्हापूरला शिक्षण झाल्यामुळे वागणे-बोलणे सुसंस्कृत होते. भाषण उत्तम करीत आणि माणसे जोडण्याचे कर्तृत्व त्यांच्यात होते.
१९३० आणि ३२ या दोन्ही आंदोलनांत ते जेलमध्ये जाऊन आले होते. आपले सारे आयुष्य देशकार्याला कायमचे वाहून घ्यायचे, अशी त्यांची प्रतिज्ञा होती. माझ्या मताने आजच्या परिस्थितीमध्ये नेतृत्वाला आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्याजवळ होते.