त्याच्या आधी दीड-दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अशीच एक मोठी ईर्ष्येची निवडणूक झाली होती. ती होती मध्यवर्ती असेंब्लीची. असेंब्लीच्या या निवडणुकीचे काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे हे आमचे उमेदवार होते. ही निवडणूक काँग्रेसने मोठ्या चुरशीने लढविली आणि जिंकली होती. आमच्या जिल्ह्यात सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.
त्यामुळे नव्याने येणा-या निवडणुकीसंबंधाने आमच्या मनात फार उत्कंठा होती. राज्याच्या विधिमंडळाच्या या तऱ्हेच्या निवडणुका या पद्धतीने प्रथमच होणार होत्या. त्यामुळे उमेदवार कोण असावेत, या प्रश्नाला फार महत्त्व निर्माण झाले होते. आमच्या जिल्ह्याचे जे नेतृत्व होते, त्यात भाऊसाहेब सोमण हे प्रमुख होते. त्यांचा सल्ला हा महत्त्वाचा मानला जाई. त्यामुळे याबाबतीत त्यांच्याशी बोलले पाहिजे, असे आम्ही ठरविले. ग्रामीण भागातील आम्हां कार्यकर्त्यांचे जे मित्रमंडळ बनले होते, त्याने या निवडणुकीमध्ये आपला प्रतिनिधी उमेदवार म्हणून असला पाहिजे, असा निर्णय मनाशी केला होता. पण या वडीलधा-या मंडळींचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आमच्या निर्णयाला काही अर्थ नव्हता.
निवडणूक दोन-तीन महिने राहिल्यावर एक दिवस मी, आत्माराम बापू पाटील आणि त्यांचे वडील बंधू रामभाऊ पाटील असे भाऊसाहेब सोमण यांना भेटायला गेलो. त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि सांगितले,
''तुमच्या मनात आहे, हे ठीक आहे. पण हे घडणार कसे, हे मला समजत नाही. तुम्ही चळवळीत नव्याने शिरलेले आहात. एवढी घाई का? आणि पुन्हा या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा वडीलधारा, पोक्त, ज्याचे नाव सर्वमान्य आहे आणि जो या निवडणुकीसाठी येणारा मोठा खर्च करू शकेल, असा असावा लागेल. तुमची इच्छा मला समजली.''
आम्ही निराश होऊन परत फिरलो. भाऊसाहेब आमच्याशी स्पष्ट बोलले होते. त्यांचे उत्तर नकारात्मक होते. याबद्दल आम्ही नाराज झालो. परंतु ते स्पष्ट बोलले, याचे आम्हांला बरे वाटले. परत गेल्यानंतर आम्ही आमच्या मित्रमंडळींची एक बैठक बोरगावला घेतली आणि त्यांना सोमणांच्या घरी जे बोलणे झाले, त्याची माहिती दिली.
या कार्यकर्त्यांच्या बैठकीला निवडक दहा-बारा प्रमुख कार्यकर्ते हजर होते. त्यांतील बरीचशी मंडळी वाळवे तालुक्यातील होती. राघूआण्णा लिमये आणि मी कराडमधून गेलो होतो. पाटणमधूनही कोणी तरी कार्यकर्ते आले असावेत, असा माझा अंदाज आहे. जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, की चळवळीतल्या आम्हा नव्या कार्यकर्त्यांपैकी आत्माराम बापू पाटील हे महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची उमेदवारी स्वीकारली जावी, असा प्रयत्न करावयाचा. भाऊसाहेबांनी सांगितलेला शब्द हा काही अखेरचा नव्हता. कार्यकर्त्यांमध्ये जरूर तर भेटून आपण एक प्रकारची नवीन आघाडीच निर्माण केली पाहिजे. कार्यकर्त्यांपैकी काही जण सातारच्या पुढारी मंडळींबद्दल काहीसे कटुतेने बोलले. राघूआण्णांनी त्यांची समजूत काढली. लोकांनी मला माझे मत विचारले. सबंध प्रांताच्या नेतृत्वासंबंधाचे माझे जे विश्लेषण होते, ते मी त्यांना सांगितले.
''प्रांताचे नेतृत्व हे स्थित्यंतराच्या परिस्थितीत आहे. हा स्थित्यंतराचा काळ किती असणार, हे सांगणे अवघड आहे. प्रांताच्या पातळीवर गांधींचा विचार न स्वीकारलेले जे जुने नाममात्र पुणेकर काँग्रेस पुढारी होते, त्यांनी अजून व्यवहारतः काँग्रेस सोडलेली नाही, पण त्यांचा काँग्रेसच्या जनआंदोलनांवर विश्वास नाही. त्यामुळे प्रांतिकच्या पातळीवर काहीशी पोकळी निर्माण झालेली आहे.''