मी त्यांच्या तर्कशास्त्राच्या या अध्यापन-कौशल्याबद्दल एवढ्यासाठी लिहिले, की मी जेव्हा इंटरच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला बसलो, तेव्हा त्या विषयाच्या प्रश्नासंबंधाने मला फार तपशीलवार माहिती झाली होती. मी जेव्हा पेपर लिहायला बसलो, तेव्हा त्यामध्ये मी इतका रममाण होऊन गेलो, की तीन तास केव्हा संपून गेले, हे मला समजले नाही. आणि तासांच्या शेवटी जेव्हा मी तपासून पाहिले, तेव्हा माझ्या लक्षात आले, की शंभर मार्काच्या प्रश्नांपैकी मी फक्त पासष्ट मार्कांच्याच प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. प्रश्नांची उत्तरे लिहिताना मी जो अव्यवहारीपणा केला होता, त्याची किंमत मला द्यावी लागेल, अशी काळजी मला सांगून राहिली. पण सुदैवाने तसे घडले नाही. ६५ मार्काच्या उत्तरांतूनही मला परीक्षा पास होण्याइतके गुण निश्चित मिळाले. कांदबरीकार फडके हे सगळ्यांना माहिती आहेत; पण शिक्षक फडके हे असे होते.
याच वर्षी मी दुस-या एका संकटात आलो होतो. १९३५ च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी कोल्हापूरला अनपेक्षितपणे आजारी पडलो. सुरुवातीला किरकोळ आजार असेल, म्हणून दुर्लर्क्ष केले. नंतर माझ्या लक्षात आले, की हे साधे आजारपण दिसत नाही. मी असा आजारी पडलो, की मला घरची आठवण होते, तशी या वेळीही आली. कोल्हापूरला राहण्यापेक्षा कराडला घरी राहायला जावे, असा विचार आला. अंगात ताप फणफणत असतानासुद्धा कोल्हापूरच्या स्टँडवर जाऊन मी कराडच्या गाडीत बसलो आणि पुढे तीन तासांचा प्रवास मी कसा काय केला, तो माझा मलाच माहीत! नीट बसवत नव्हते, उठवत नव्हते, झोप लागत नव्हती, पण मनाचा हिय्या करून तो प्रवास पुरा केला व मी घरी आलो. रात्री डॉक्टर येऊन तपासून गेले. त्यांनी गणपतरावांना सांगितले, की हा आजार विषमज्वराचा आहे आणि याची फार काळजी घेतली पाहिजे. गणपतरावांनी ही गोष्ट मला सांगितली,
''तुला तुझी काळजी घेतली पाहिजे. कारण हा ताप विषमज्वराचा आहे.''
त्यावेळी या तापासाठी शुश्रूषा हेच औषध असे. दुस-या कसल्याही औषधाची उपाययोजना तेव्हा नसे. निवांत झोपून राहणे, हलका फळांचा रस असे काही तरी दिवसातून एखाद-दुस-या वेळी घेणे, विशेष हालचाल न करणे एवढीच औषधे यावर होती. मला सांगण्यात आले, की साधारणतः दोन आठवडे हा आजार टिकेल. पण माझा हा आजार दोन आठवड्यांनी संपला नाही. तो ताप उतरायला चार आठवडे लागले. चार आठवड्यांत एक-दोन वेळा मी अतिशय गंभीर परिस्थितीतून गेलो, असे मला नंतर माझ्या घरातील माणसांनी सांगितले. ताप उतरला, पण अशक्तपणा राहिला. लवकर उठता-बसता येणे शक्य होत नव्हते; परंतु आता मी पडून राहायला तर सरावलो होतो. हळू हळू शक्ती यायला सुरुवात झाली आणि संपूर्ण बरा व्हायला मला आणखी तीन आठवडे लागले. मी बरा झालो खरा, पण आता मला खरी काळजी लागली होती कॉलेजची. कॉलेजची टर्म भरण्याकरता जितके दिवस कॉलेजमध्ये उपस्थित असणे आवश्यक होते, तेवढे दिवस मी आजारपणामुळे हजर राहू शकलो नव्हतो. तेव्हा माझे हे वर्ष फुकट जाणार, अशी शंका मला वाटली. काहीशा प्रतिकूल परिस्थितीत मी शिक्षण घेत असताना या आजाराने माझ्यापुढे एवढी आपत्ती का उभी करावी, या विचाराने मी हैराण होऊन गेलो. माझ्या मनाशी विचार आला, की प्रिन्सिपॉल डॉक्टर बाळकृष्णांशी याबाबतीत बोलून पाहिले पाहिजे. त्यासाठी ताबडतोब कोल्हापूरला जाण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली. डॉक्टरांनी सांगितले,
''तुम्हांला आणखी पंधरा दिवस जाता येणार नाही.''
त्यामुळे आणखी चिंतेत पडलो. आणि शेवटी मनाचा हिय्या करून गणपतरावांशी बोललो. माझी चिंता त्यांना सांगितली आणि त्यांना विचारले,
''माझ्यासाठी तुम्ही जाऊन डॉक्टर बाळकृष्णांना भेटून माझा प्रश्न त्यांच्या समोर मांडून याल का ?''.
ते म्हणाले,
''ठीक. मी जरूर जाऊन येईन. पण तू जर का कॉलेजला हजरच राहिलेला नाहीस, तर डॉक्टर बाळकृष्ण तरी काय करणार आहेत ?''
मी म्हटले,