आम्हांलाही काही करता येण्यासारखे नव्हते. परंतु आम्ही दहा-पाच जण व्यासपीठाच्या जवळपास जाऊन बसलो. सभा मोडण्याचे पुण्याचे काही एक विशेष तंत्र आहे, असे त्या दिवशी माझ्या लक्षात आले. थोड्या वेळाने शंकरराव देव डॉक्टर अन्सारी यांना सभास्थानी घेऊन आले. सभा सुरू करण्याचे जे प्राथमिक उपचार असतात, ते झाल्यानंतर डॉक्टर अन्सारी हे बोलायला उभे राहिले. भाषणातील त्यांची पहिली एक-दोन वाक्ये बोलून झाली नाहीत, तोच त्यांच्यासमोर बसलेल्या श्रोतृवर्गातला मोठा समाज एकदम उभा राहिला आणि त्यांनी जातीय निवाड्याविरोधी आणि काँग्रेसविरोधी घोषणा देत धुमाकूळ घातला. घोषणांचा गदारोळ चालू असतानाच काहींनी व्यासपीठावर चढून डॉक्टर अन्सारी व श्री. देव यांना वेढा टाकला. स्थानिक कार्यकर्ते आता पुढे झाले व त्यांनी तो वेढा मोडून काढला. आम्ही बाहेरगावचे जे थोडे लोक होतो, ते काही हे प्रकरण सांभाळू शकत नव्हतो. आणि शेवटी ही सभा उधळली गेली. डॉक्टर अन्सारी भाषण न करताच परत फिरले. त्यांना त्यांच्या मोटारीने सुरक्षितपणे पोहोचविणे या उद्योगामध्ये आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना थोडी फार मदत केली. जातीय निवाड्यासंबंधाने पुण्यातील काँग्रेसविरोधी सुशिक्षित मंडळींची भावना व मनःस्थिती काय होती, याची काहीशी चुणूक या प्रसंगाने आम्हांला आणून दिली.
पुण्याच्या सभेत जे आम्ही पाहिले, ते त्यावेळी महाराष्ट्रात बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीचे प्रतीकात्मक चित्र होते. पुण्याने नाकारले, ते महाराष्ट्राने नाकारले, अशी तोपर्यंतची प्रथा होती. पण गेल्या चार वर्षांत काँग्रेस ग्रामीण क्षेत्रात मुळे धरू लागली होती आणि नेतृत्वाचे केन्द्र बदलत आहे, याची अजून जाणीव झाली नव्हती. एक अर्थपूर्ण घटना म्हणून या सभेचा मी येथे उल्लेख केला आहे.
हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर या राजकीय प्रश्नांची वस्तुस्थिती लोकांच्या पुढे मांडणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही जिल्ह्यात काही दौरे आखले आणि ठिकठिकाणी जाऊन या ठरावाची पार्श्वभूमी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस वेळोवेळी ज्या अनेक संकटांतून गेली आहे, त्यांतला जातीय निवाड्याचा प्रश्न हा असाच एक अवघड प्रश्न होता. शहरातील हे वातावरण सोडले, तर ग्रामीण जनतेला स्वातंत्र्य-चळवळीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न नीट समजावून सांगितला, तर लोकांना समजत होता आणि पटत होता, हा माझा अनुभव आहे.
कोल्हापूरचे माझे कॉलेजचे दिवस मागे सांगितले, त्याप्रमाणे चालले होते. कॉलेजमधला अभ्यास आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्य या दोन्हींमध्ये मी गुंतलेला होतो. मी जेव्हा इंटरच्या वर्गात गेलो, तेव्हा सहाध्यायी मला सांगू लागले,
''इंटरमीजिएटची परीक्षा तशी अवघड असते, कारण ती युनिव्हर्सिटीची परीक्षा असते आणि तिचा निकाल मोठा कठीण असतो. तेव्हा पहिल्यापासून जरा तयारीत राहा.''
मी या वर्षी परीक्षेची तयारी चांगली करायची, म्हणून कामाला लागलो. या वेळी आम्हांला अभ्यासासाठी जी पुस्तके नेमली होती, त्यांतले एक चांगले पुस्तक माझ्या मनातून अजून गेलेले नाही. इंग्रजीच्या अभ्यासासाठी इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास अतिशय सुलभ आणि वाचनीय अशा शैलीमध्ये लिहिलेला होता. ऐतिहासिक दृष्टीने भाषेचा अभ्यास हा किती उपयुक्त असतो, याची थोडी-फार कल्पना मला यामुळे आली. आणि या विषयावरची दुसरीही काही पुस्तके मिळविण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी मराठीचा असा ऐतिहासिक दृष्टीने विचार केलेला ग्रंथ निदान मला तरी माहीत नव्हता. 'महाराष्ट्र सारस्वत' म्हणून श्री. वि. ल. भावे यांचे एक पुस्तक उपलब्ध होते. चांगले पुस्तक आहे. पण मी वर उल्लेख केलेल्या पुस्तकाच्या तुलनेने मला ते दुबळे वाटले. या माझ्या अभ्यासविषयक लहान गोष्टी मी अशासाठी सांगतो आहे, की यांतल्या प्रत्येक गोष्टीतून माझे विचार, माझ्या सवयी, माझ्या आवडी-निवडी बनत होत्या, म्हणून यांचे महत्त्व आहे.
याच वर्षी प्राध्यापक फडके आम्हांला तर्कशास्त्र शिकवू लागले. गाण्याची मैफल जमावी, तसे फडक्यांचे तर्कशास्त्राचे तास रंगत असत. राजाराम कॉलेजच्या वरच्या मजल्यावर एक मोठा हॉल होता, तेथे हा त्यांचा तास ते घेत. हे या मोठ्या हॉलमध्ये असा वर्ग का घेतात, याची मी चौकशी केली, तेव्हा मला असे सांगण्यात आले, की विद्यार्थी नसलेले, पण ज्यांना या विषयाची आवड आहे, असे बाहेरचे कित्येक लोक या तासाला येऊन बसतात, त्यामुळे हा हॉल नेहमी भरगच्च भरलेला असे. प्राध्यापक फडक्यांची विषय मांडण्याची ही लकब फार थोड्या शिक्षकांमध्ये मला पाहायला सापडली. इंग्लिश उच्चार करण्याची त्यांची जी ढब होती, ती इंग्रजी घाटाची नसली, तरी खास फडके थाटाची होती. विषय खुलवून तो ते इतका स्पष्ट आणि स्वच्छ करीत असत, की मला त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर घरी जाऊन पुस्तके वाचण्याची कधीच गरज भासली नाही.