• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ५९

त्या दिवसांत लाऊड स्पीकरची व्यवस्था नसे, परंतु माधवरावांचा आवाज लाऊड स्पीकरसारखाच होता. त्यांनी, मी शेतकऱ्यांचा आवाज या परिषदेत उठविणार आहे, असे सांगून आपल्या भाषणाला सुरुवात केली. तेव्हा सर्व माणसे आपले प्राण कानांत आणून त्यांचे भाषण ऐकू लागली. त्यांच्या अनेक वाक्यांना टाळ्या पडत होत्या.

अध्यक्षांनी त्यांना अधिकृतरीत्या बोलण्याची परवानगी दिली होती, की नाही, मला माहीत नाही. आणि उपसूचनाही अधिकृतरीत्या ठरावाचा भाग म्हणून मांडण्याची परवानगी दिली होती, की नाही, याची मला आज कल्पना नाही. पण माधवरावांनी आपली उपसूचना लोकांच्या मान्यतेसाठी पुढे मांडली व लोकांनी टाळ्यांच्या गजरात तिला आपली मान्यता दिली. कागदोपत्री त्या ठरावाचे काय झाले, याचे मला किंवा कोणालाच महत्त्व नव्हते. परंतु पिळल्या जाणा-या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते, ते या राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात माधवराव व पर्यायाने आम्हीही यशस्वी झालो, याचा आम्हांला आनंद वाटला.

परिषद संपली. दुस-या दिवशी सर्व पाहुणे मंडळी निघून गेली. पण उरलेल्या आम्हां कार्यकर्त्यांत वादविवाद सुरू झाले. चर्चा सुरू झाल्या. कोणी म्हणत होते; माधवराव बागलांनी हे केले, ते योग्य नव्हते. एवढी मोठी राजकीय परिषद, यामध्ये अकारण वादविवाद उभा केला. माधवरावांनी वाद उभा केला, तेच बरे केले, असे मानणा-या कार्यकर्त्यांपैकी मी एक असल्याने मी त्यांची बाजू घेत होतो. स्वराज्याच्या चळवळीला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न यांना स्पर्श केल्याशिवाय आपली स्वातंत्र्याची चळवळ पुढेच जाऊ शकणार नाही, असे माझे मत झाले होते. आणि माझ्या राजकीय आयुष्यातला एक उत्तम धडा मी शिकलो. लहानपणी वाचलेले ज्योतिबा फुल्यांचे चरित्र आठवले आणि माझ्या बंधूंनी मला सांगितल्याचे स्मरले, की-
''तुम्ही विचारता, शेतकरी समाज चळवळीत सामील का होत नाही; पण तुम्ही शेतकरी समाजापुढील प्रश्नांचा कधी विचार केला आहे का?''

हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे, असे मला वाटू लागले आणि मी असे ठरवले, की आता यापुढे चळवळीत भाग तर जरूर घ्यायचा, पण तो डोळसपणाने घ्यायचा. देशात त्यावेळी प्रचलित असलेल्या इतर राजकीय विचारप्रणालींचा मला अजूनही स्पर्श झाला नव्हता किंवा कोण्या मोठ्या पुढा-याची गाठभेटही झाली नव्हती. माझे राजकीय शिक्षण माझ्या जीवनाच्या शाळेत होत होते. मसूरच्या राजकीय परिषदेने मला खूप शहाणे केले. गरिबांचे कैवारी कोण आणि विरोधी कोण, हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याची चळवळ चालविली पाहिजे, असा विचार माझ्या मनाशी येऊन गेला.

दुस-या दिवशी आम्ही आपापल्या घरी परतलो आणि कराडातील माझ्या मित्रमंडळींशी मसूरच्या परिषदेची चर्चा करू लागलो, तेव्हा मात्र मला एका गोष्टीचा आनंद झाला, की कराडमधील माझे सर्व सहकारी मित्र माझ्याच कलाचे होते, असे दिसून आले. या प्रश्नातले बारकावे त्यांना समजत होते, असे मला वाटले नाही. पण मी जेव्हा त्यांना खुलासा केला, की माधवराव बागल बोलल्यामुळे त्याला ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा रंग देण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांच्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याचा दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण दुर्दैवाने माधवराव बागल हे कोल्हापूरचे होते आणि सत्यशोधक चळवळीत मनापासून भाग घेत होते व हिरारीने प्रचारकार्य करीत होते.

त्यांनी वाळवे तालुक्यामध्ये राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात अनेक सभा आणि परिषदा घेतल्या होत्या. आणि त्यावेळीही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांची त्यांनी एक तात्त्विक मांडणी त्यांतून केली होती. मसूरमध्ये त्यांनी जे मत व्यक्त केले, ते काही विशेष नवीन होते, असे नाही. ते ज्या परंपरेत वाढले होते, त्या पंरपरेचा तो कार्यक्रम होता. ती ज्योतिबा फुल्यांची परंपरा होती. त्या परंपरेशी सुसंगत अशी मानसिक भूमी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतही निर्माण केली पाहिजे, हा त्याचा खरा अर्थ होता.

परंतु निव्वळ इंग्रजांना दोष देण्याची सवय लागलेल्या मडंळींना ही गोष्ट नवीन होती. त्यांना वाटत होते, की देशातून इंग्रजांचे राज्य जावे. पण सामाजिक व आर्थिक प्रश्नांना कोणी हात लावू नये.