• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ५७

या वर्षाची परीक्षा देताना संस्कृतचा पेपर मला काहीसा कठीण गेला. त्यामुळे आता मॅट्रिकच्या वर्षी संस्कृतकडे जास्त लक्ष द्यायचे, असे मी ठरविले होते. त्यासाठी माझ्या वर्गातील माझे मित्र आणि आमच्या गावच्या धनी कुलकर्ण्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व सातारच्या 'समर्थ' साप्ताहिकाचे सध्याचे संपादक श्री. अनंतराव कुलकर्णी यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला, त्यांनी आणि मी बरीच वर्षे एकाच शाळेत आणि एकाच वर्गात काढली आहेत. ते माझ्या राजकीय चळवळीचा पक्का पाठपुरवठा करणारे मित्र होते. त्यांचे संस्कृत बरे होते. मी त्यांना विचारले, त्यासाठी ते खास प्रयत्न काय करतात? त्यांनी सांगितले, की शाळेतल्या शिक्षणाखेरीज ते तेथील एका शास्त्रीबुवाकडे संस्कृतचे अध्ययन करीत होते. शास्त्रीबुवांनी त्यांना सांगितले होते, संस्कृत अध्ययनाबरोबर वाणीची उच्चार-शुद्धी जर करायची असेल, तर संस्कृत पाठांतर भरपूर केले पाहिजे. म्हणून अनंतरावांनी मला कालिदासाचे 'मेघदूत' हे पुस्तक दिले आणि सांगितले, की यातले जे श्लोक आहेत, ते मी मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे संस्कृत उच्चाराला आणि वाचनाला मदत होईल. यामुळे यावेळी माझ्याबरोबर देवराष्ट्राला आणलेल्या पुस्तकांत कादंबऱ्यांबरोबर मेघदूताची सटीप, सार्थ आवृत्तीही होती. त्यामुळे मला संस्कृतच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्याची मदत होत होती.

त्या आंबराईत बसल्यानंतर माझ्या मनात विचार आला, की मी मेघदूत मुखोद्गत का करू नये? म्हणून मी त्या महिनाभरात तसा प्रयत्न केला. अर्धेअधिक 'मेघदूत' मला आजही मुखोद्गत आहे. या आंबराईच्या सावलीत बसून मी जेव्हा मोठ्याने-

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्र्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥     

असे उच्चारून 'मेघदूता'चे पाठांतर सुरू करीत असे, तेव्हा मला एक वेगळा आनंद मिळे, ज्ञाते कालिदासाच्या काव्यामध्ये 'मेघदूता' ला प्रथम श्रेणीचे स्थान देत नाहीत, हे मला माहीत आहे. पण काव्याच्या क्षेत्रात मेघाला आपला दूत करून आपल्या प्रेयसीला निरोप पाठविण्याची कल्पना इतकी रोमॅंटिक व आकर्षक आहे, की त्या कल्पनेसाठी या काव्याला बरेच स्थान दिले पाहिजे, असे मला नेहमी वाटते.

अशा तऱ्हेने पुस्तकांच्या, आंबराईच्या व कोकिळांच्या सहवासातले देवराष्ट्रामधले ते दिवस मी मजेत काढले. जुन्या ओळखीच्या ठिकाणांना भेटी दिल्या, सोनहि-याच्या काठाने भटकलो. सागरेश्वराचे दर्शन घेतले. जुन्या परिचयाच्या माणसांशी गाठीभेटी, गोष्टी केल्या आणि पुन्हा ताजातवाना होऊन कराडला परत आलो.

शाळा सुरू व्हायला अजून काही दिवस अवकाश होता. या वर्षी मॅट्रिकचा अभ्यास असल्यामुळे अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावयाचे, असे मी ठरविले होते. पण अनपेक्षितपणे एक नवीन काम निघाले आणि माझ्या अभ्यासाच्या तयारीचा बेत तसाच राहून गेला.

साता-यात अधून मधून जिल्हा राजकीय परिषद गेली कित्येक वर्षे भरत आली होती. लोकमान्य टिळकांच्या काळापासून ती प्रथा चालत आलेली होती. ३० सालच्या चळवळीच्या यशाच्या निमित्ताने ३१ साली ही राजकीय परिषद जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरी करायची, असा जिल्हा प्रमुख पुढाऱ्यांनी निर्णय केला. कराड तालुका या चळवळीत अग्रस्थानी असल्यामुळे ही परिषद कराड तालुक्याने ठरवावी, असा निर्णय झाला. आमच्या तालुक्यातील मसूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जिल्हा परिषद मसूरला भरवावी, असे निमंत्रण दिले. राघूआण्णा लिमये, डॉक्टर फाटक, सीतारामपंत गरूड, श्री. विष्णुमास्तर यांनी त्याची जबाबदारी घेतली. मसूरने हे काम आपल्या शिरावर घेतल्यामुळे साहजिकच आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांवरही जबाबदारी आली. आणि कामाच्या वाटण्या होऊन आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने पुन्हा कामास लागलो. मुख्य जबाबदारी मसूरकरांची होती, हे जरी खरे असले, तरी आम्हां मंडळींची जबाबदारीही काही कमी नव्हती. परिषदेला अध्यक्ष म्हणून त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तात्पुरते अध्यक्ष असलेले श्री. माधवरावजी अणे यांना निमंत्रित केले होते. आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले होते. त्यामुळे या परिषदेला अनपेक्षितपणे फार महत्व आले.