इंग्रज सरकारचे स्थानिक प्रतिनिधी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर सरळ हल्ला होत असल्यामुळे हा लढा कोणामध्ये आहे, हे त्यांना आत्ता नक्की समजू लागले होते. फक्त, अदृश्य अशा ब्रिटिश सत्तेशी हा लढा नव्हता, तर आपल्याच समाजातले तिचे पाठीराखे लोक जेव्हा ही चळवळ मोडण्याच्या प्रयत्नासाठी उभे राहतात, तेव्हा त्यांना पोटतिडकीने विरोध केला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना जागृत झाली होती.
ज्या दिवशी मानपत्रासाठी गव्हर्नरांचे आगमन होणार होते, त्या दिवशी, शहरात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अनेक लोकांना पकडले जाणार, अशाही बातम्या कानी येत होत्या. तरीसुद्धा कराडच्या पुलापासून म्युनिसिपालिटीच्या ऑफिसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हातांत काळे झेंडे धरून हजारो लोक निदर्शने करीत उभे होते. जनता तेथील नगरपालिकेच्या पाठीमागे नव्हती किंवा ब्रिटिश गव्हर्नरांच्या स्वागतासाठी तयार नव्हती, तर त्यांच्या निषेधासाठी तेथे जमली होती, याची ही साक्ष होती. माझ्या समजुतीने त्या निदर्शनामध्ये जवळ जवळ पंचवीस हजार माणसांनी भाग घेतला असेल. मी आणि माझे कार्यकर्ते मित्र अर्थातच यात पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेत होतो.
चळवळीचे नेतृत्व कराडचे प्रसिद्ध वकील श्री. गणपतराव आळतेकर, श्री. बाबूराव गोखले आणि इतर प्रमुख मंडळी यांच्याकडे होते. मी आणि माझे मित्र त्यांचे सहायक होतो. निषेधाच्या निदर्शनामुळे कराडचे व सातारा जिल्ह्याचे वातावरण संपूर्ण बदलून गेले होते. जनमताचे आणि जनजागृतीचे दर्शन गव्हर्नरला झाले, हे एक प्रकारे उत्तमच होते. माझ्या कल्पनेने ते जेव्हा त्यांचे मानपत्र घेऊन परत गेले असतील, तेव्हा महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या जनमानसाचे स्वरूप त्यांना ख-या अर्थाने समजले असेल.
या निदर्शनांनंतर नोकरशाही अधिक चिडल्यासारखी झाली. आपला अपमान झाला आणि तो सामान्य दिसणा-या माणसांनी केला, याचा त्यांना विषाद वाटत असावा. एक-दोन आठवड्यांतच कराडातील महत्त्वाचे वीस-पंचवीस कार्यकर्ते पकडून त्यांना सातारला नेले गेले आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला.
कच्छी हे नगराध्यक्ष या नात्याने समारंभाचे प्रमुख पाहुणे असल्यामुळे मुसलमान समाजाचे कार्यकर्ते या निदर्शनांत नव्हते, हे खरे आहे; परंतु त्या समाजातही, जे होत आहे, ते पसंत नसणारी अनेक गरीब मुसलमान माणसे होती, हे मला माहीत आहे.
सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळचे माझे मित्र श्री. गुलाब बागवान पहिलवान या निदर्शन-चळवळीचे महत्त्वाचे पुढारी होते. मानपत्राला विरोध करणा-या तयारीच्या ज्या सभा झाल्या, त्यामध्ये त्यांनी फार सुरेख भाषणे केली. श्री. गुलाब बागवान पहिलवान हे तीस सालच्या चळवळीत चांगलेच रंगून गेले होते. मी या गोष्टीचा उल्लेख एवढ्यासाठीच केला, की या चळवळीमध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी भाग घेत होते, हे लक्षात यावे.
या निदर्शनाचे विराट स्वरूप पाहून जे त्याच्या बाहेर होते, त्यांच्याही मनात चळवळीसंबंधी आपुलकी निर्माण झाली.
या चळवळीचे पडसाद साहजिकच आमच्याही घरी उठले. माझे बंधू गणपतराव हे या निदर्शनाच्या चळवळीला सहानुभूती दाखवीत होते. ते निदर्शनात प्रत्यक्ष सामील झाले नव्हते. पण त्यानंतर तालुक्यातील ज्या मातबर मडंळींचा मी वर उल्लेख केला, त्यांच्याशी घनिष्ट संबंध असलेल्या काही लोकांची त्यांनी माझी भेट घालून दिली.