• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ४४

रात्री जेवणानंतर दिवसभराच्या थकव्यामुळे आम्हांला गाढ झोप आली. सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर देशपांड्यांनी आम्हांला सांगितले,

''आज दिवसभर अधूनमधून या भागातील प्रमुख कार्यकर्ते एकटे दुकटे येऊन तुम्हांला भेटून जातील. तुम्ही त्यांना धीर द्या. चळवळीतील सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे, असे त्यांना आश्वासन द्या. निदान दहा-वीस गावची माणसे तुम्हांला भेटून जातील. सायंकाळी मात्र येथून मुक्काम हलवा, मंगरूळचा डोंगर ओलांडून पलीकडे गेले म्हणजे ताबडतोब बिळाशी लागते. तेथे जाऊन, जाहीर घोषणा देऊन, छोटीशी सभा भरवता येते का, पाहायचे. मात्र हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तेथे तुमची सभा व्हावी, अशी थोडीफार मदत मी करेन. पण तेथे प्रत्यक्ष सभा कशी करायची, हे तुमच्या हुशारीवर अवलंबून आहे. त्या गावात पोलिसांचा कडक पहारा आहे. चळवळ्यांच्यावरती त्यांची नजर राखून असते. तेव्हा सभा होणे काहीसे कठीण आहे. शक्यता जास्त ही आहे, की तुम्ही कदाचित बिळाशीमध्ये पकडले जाल.''

आमची सर्व गोष्टींची तयारी होती. त्यामुळे आम्ही याला होकार दिला.

ठरल्याप्रमाणे तास, अर्धा तासांच्या अंतराने निरनिराळ्या गावची शेतकरी मंडळी, दोन तीन-दोन तीनच्या तुकडीने येऊन आम्हांला भेटू लागली. लोकांवर झालेल्या अत्याचारामुळे ती माणसे चिडलेली होती; पण घाबरलेली नव्हती, हे पाहून आम्हांला फार हुरूप आला. जनतेची चळवळ उभी करायची, म्हणजे तिला निर्भय करावे लागते आणि ही चिवट माणसे पाहून आम्हांला इतिहास-काळातील मावळ्यांची आठवण झाली. शिवाजी महाराजांच्या काळातील या डोंगराळ भागातील लोक असेच लढले असतील, असे चित्र माझ्या डोळ्यांपुढे येऊन गेले आणि त्या लोकांच्याबद्दल आदर वाटला. निदान दहा गावची माणसे आम्हांला भेटून गेली. आम्ही त्यांना आश्वासन देत होतो, ''तुमच्या संकटाची जिल्ह्याला व राज्याला कल्पना आहे. तुमच्या बिळाशीचे नाव सर्व राज्यभर प्रख्यात झाले आहे. सर्व जनतेला तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही एकाकी आहात, असे वाटून घेऊ नका. तुमची निर्भयता कायम ठेवा. आणि या वातावरणात कोठे ढिलाई होईल, अशी गोष्ट होऊ देऊ नका.''

पोलिसांच्या अत्याचाराबद्दल या लोकांना चीड होती.

आम्ही त्यांना समजावीत होतो,

''गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सांगितला आहे. याला निर्भयतेने आणि धीराने तोंड द्यायला पाहिजे.''

बरीच काही प्रश्नोत्तरे, चर्चा होत होती. परिणामी एक विश्वासाचे आणि धीराचे वातावरण आम्ही या मंडळींमध्ये निर्माण करू शकलो. किंबहुना त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून आम्ही त्या दिवशीच संध्याकाळी बिळाशीला धीटपणाने जावे, असे आम्हांला तीव्रतेने वाटू लागले. हे लोक येथे इतक्या संकटात राहत असताना निदान आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे आम्ही जाहीर रीतीने प्रगट केले पाहिजे, असे आम्हांला वाटत होते.

संध्याकाळ झाली. दिवेलागणी झाली आणि देशपांडे यांचा निरोप घेऊन आम्ही त्यांचा वाडा सोडला. डोंगर ओलांडून बिळाशीच्या हद्दीत शिरायला पाऊण तासाचा वेळ होता. आमच्या हातात आमची एकेक पिशवी होती. बिळाशीपर्यंत रस्ता दाखविण्यासाठी आमच्याबरोबर एक मार्गदर्शक तरुण मुलगा देशपांडे यांनी दिला होता. त्याच्याबरोबर आम्ही आमचा प्रवास सुरू केला. गावात प्रवेश केला, तेव्हा सगळीकडे अंधार व नीरव शांतता होती. रातकिड्यांची किरकिर मात्र ऐकू येत होती. आम्ही गावाच्या जवळपास जातो, न जातो, तोच एक मोठी शीळ ऐकू आली. आम्हांला वाटले, पोलिसांना आमच्या येण्याची बातमी लागली असावी. पण आमच्या बरोबरच्या त्या तरुणाने सांगितले,

''काळजी करू नका. ही पोलिसांची शीळ नाही. ही आपल्या माणसांनी लोकांना दिलेली सूचना आहे.''