• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ४३

मला चालण्याची सवय चांगली होती. राघूआण्णा तर एकदम तगडा तरूण. आमच्या जोडीमध्ये ज्येष्ठ म्हणून तेच वरिष्ठ होते. या दोन माणसांच्या सेनेचे ते सेनापती होते, मी सैनिक होतो. ते सांगतील, त्याचप्रमाणे मी वागायचे, असे आमचे ठरले होते. आम्ही पेठहून दुपारी अकरा वाजता निघालो; पण संध्याकाळी वाटेत एका ठिकाणी मुक्काम करायचा ठरले. दिलेल्या माहितीप्रमाणे ओळखीच्या माणसाची गाठ घेतली व आमची निवासाची व्यवस्था झाली. खाण्यासाठी आमच्याजवळ आमचे साहित्य ठेवले होते. त्यामुळे आम्हांला कुणाजवळ काही मागावे लागले नाही.

दुस-या दिवशी पहाटेच उठून लवकर प्रवासाला सुरुवात केली आणि दिवसभर डोंगराचा चढउतार करत करत संध्याकाळच्या सुमारास बिळाशीचे जवळ, डोंगरच्या अलिकडच्या बाजूला असलेले मंगरूळ म्हणून गाव आहे, त्या गावाच्या सीमेपाशी आलो. अजून दिवस मावळायचा होता. म्हणून काही काळ रस्त्याच्या पायवाटेच्या बाजूला असलेल्या एका शेतात बसून वेळ काढला. अंधार पडल्यानंतर मंगरूळ गावात प्रवेश केला.

आम्हांला दिलेल्या सूचनेप्रमाणे तेथील श्री. देशपांडे नावाच्या जमीनदाराच्या घरी आम्हांला जायचे होते. दिवेलागणी झाल्यानंतर आम्ही चौकशी करत देशपांड्यांच्या घराकडे निघालो. परंतु जास्त चौकशी करणे धोक्याचे होते. गाव तर लहानसे. देशपांड्यांचा वाडा तसा ओळखण्यासारखा मोठा होता. आम्ही त्यांच्या दाराशी पोहोचलो. राघूआण्णांनी त्या दारावर टकटक करून आवाज दिला. बराच वेळ काही उत्तर येईना. त्यामुळे आम्हांला थांबावे लागले. पुन्हा आवाज केला. तेव्हा दरवाज्यापाशी येऊन कोणी तरी आतून विचारले,

''कोण आहे ? ''

राघूआण्णांनी त्यांना दिला होता, तो खुणेचा शब्द उच्चारला आणि ''आम्ही सातारहून आलो आहोत.'' असे सांगितले.

तो खुणेचा शब्द ओळखून सावकाशीने दरवाजा उघडला गेला आणि मंद जळणारा कंदील हातात धरून उभे राहिलेले देशपांडे यांचे दर्शन आम्हांला झाले.

आम्ही दोघेही त्यांना नवखेच होतो. त्यांनी कंदील वर करून आमचे चेहरे न्याहाळले आणि त्यांची खात्री पटली, की आम्ही कोणी पोलिसांचे लोक नाही. त्यांच्या चेह-यावर हसू जमून आले. त्यांनी मोठ्या प्रेमाने 'आत या' म्हणून सांगितले. आम्ही दिवसभर असे थकून गेलो होतो, की त्यामुळे हे स्वागत मोठे उत्तेजनकारक वाटले. वाड्याच्या ओसरीवर जाऊन आम्ही बसलो, देशपांडे यांनी आमची व्यवस्था फार उत्तम ठेवली. त्यांच्या चालीरीतीप्रमाणे त्यांनी आम्हांला हातपाय धुवायला गरम पाणी आणून दिले आणि सांगितले, ''तुम्ही थोडे पडा. थोड्या वेळाने बोलत बसू.''

आम्ही अर्धा एक तास विश्रांती घेतली आणि नंतर देशपांडे यांना आम्ही कोण, कशासाठी व का आलो, याची हकीकत सांगितली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि आम्हांला सांगितले,
''तुम्ही एक रात्र थांबा, काय करायचे, ते मी तुम्हांला उद्या सकाळी सांगेन.''