• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१५८

थोरल्या बंधूंची आणि माझी ही दुर्दैवाने शेवटचीच भेट ठरणार होती, हे त्यावेळी मला समजले नाही. थोडा वेळ मी त्यांच्याशी बोललो. माझ्या प्रकृतीची ते चौकशी करीत होते. मी फारच छान आहे, म्हणून सांगितले आणि जेवण करून, घर सोडून निघून गेलो. पुन्हा या घरी जवळ जवळ वर्षभर मला यायचे नव्हते, असा योगायोग होता.

१९४२ सालच्या डिसेंबरमधले दिवस होते. कार्यकर्त्यांचे कामाच्या दिशा ठरल्याप्रमाणे काम चालू होते. विध्वंसाची काही कृत्ये अधून-मधून होत होती. महत्त्वाचे भूमिगत कार्यकर्ते सापडत नव्हते. त्यामुळे पोलीस चिडल्यासारखे झाले होते आणि त्यांनी आता माझ्या कुटुंबियांविरुद्ध आपला मोर्चा वळविला. एके दिवशी त्यांनी माझे मधले बंधू श्री. गणपतराव यांना अटक करून विजापूरच्या तुरुंगात पाठवून दिले. मी ओळखले, की हा माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न आहे. श्री. गणपतराव माझ्यावरील प्रेमामुळे हळूहळू राष्ट्रीय चळवळीत सामील झाले होते; परंतु विध्वंसाच्या वगैरे असल्या कुठल्या कामात ते भाग घेत नव्हते. आता मी त्यांचा भाऊच होतो, म्हणून माझ्याबद्दल आणि माझ्या मित्रांबद्दल त्यांना सहानुभूती होती, यात त्यांचा काय दोष? त्यांना पकडून नेल्यामुळे माझ्या घरच्या लोकांची मोठी असहाय परिस्थिती झाली. एकत्र कुटुंब मोठे होते आणि मिळवते एकटे गणपतरावच होते. थोरल्या बंधूंची सरकारी नोकरी होती. ती त्यांनी मध्येच सोडून दिली होती. त्यामुळे आमच्या कुटुंबावर हा मोठा आघात होता. मी मनाशी म्हटले,
'जे काही व्हायचे असेल, ते होईल, आपले काम आपण करीत राहिले पाहिजे.'

माझ्या एक-दोन मित्रांनी घरची काळजी करू नका, असे आश्वासनात्मक निरोप पाठविले. पण यामुळे माझे थोडेच समाधान होणार होते? कर्तव्यबुद्धीने आपल्या नित्याच्या भूमिगत यंत्रणेच्या कामात गुंतून राहिलो.

डिसेंबर महिन्यात जिल्ह्यामध्ये सर्वत्र पोलीस दडपण फार मोठ्या प्रमाणावर आले. आम्ही डिसेंबरच्या शेवटी शेवटी एका रात्री कार्वे येथे काही प्रमुख मंडळी बसलो असताना असा निर्णय घेतला, की काही आठवड्यांसाठी काही प्रमुख मंडळींनी जिल्हा सोडून बाहेर जावे. पोलिसांचा बंदोबस्त जेव्हा अधिक कडक होतो, तेव्हा प्रवासही त्यामुळे जास्त अवघड होत असे. कुठे जायचे, असा माझ्यापुढे प्रश्न होता. मी पुणे-मुंबईचा पर्याय मान्य केला आणि पुण्याला जायची योजना करू लागलो. मोटारीचा किंवा मोटार-सायकलचा प्रवास अगदी अशक्य होता. निदान माझ्याबरोबर महिना, दोन महिने पुरतील, इतके कपडे घ्यावयाचे होते. त्यामुळे शेवटी रेल्वेने प्रवास करावयाचे निश्चित झाले. माझे मित्र आत्माराम बापू जाधव कार्वेकर यांनी जास्त धाडसाचा सल्ला दिला. ते म्हणाले,
''रेल्वेमध्ये इकडे तिकडे कुठे तरी जाऊन बसण्यापेक्षा सरळ कराड स्टेशनवर जाऊन रात्रीची मेल पकडावयाची.''

मीही तो सल्ला स्वीकारला आणि एक-दोन दिवसांतच एका अंधा-या रात्री श्री. आत्माराम बापू व मी माझी मध्यमशी बॅग घेऊन कराड रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभ्या पिकांमध्ये जाऊन बसलो. आमच्या बरोबरच्या एका माणसाला पुण्याचे दुस-या वर्गाचे तिकीट काढायला सांगितले. मेल गाडीला दुस-या वर्गाचा एखाद-दुसरा डबा मोकळा जातो, असा आमचा अनुभव होता. वेळेप्रमाणे मेल आली. आम्ही काही वेळ जाऊ दिला. माझ्या अंगावर मी जोधपुरी कोट आणि डोक्याला फरची टोपी असा वेष घेतला होता. हातात बॅग घेऊन मी सरळ स्टेशनमध्ये शिरलो, तो दुस-या वर्गाचा डबा कोठे दिसतो का ते पाहत जरा पाठीमागच्या दिशेने चालू लागलो. तो दुस-या वर्गाचा एक डबा मला रिकामा असल्याचे दिसले. मी तो उघडून आत शिरलो आणि वरच्या बर्थवर बॅग टाकून खाली बसून राहिलो. मी तिकिटाची वाट पाहत होतो. तिकीट काढणारा मनुष्य स्टेशन मास्तरशी भांडण्यात गुंतला होता. कारण स्टेशन मास्तरनी ऐन वेळी दुस-या वर्गाचे तिकीट देण्याचे नाकारले होते. स्टेशन मास्तरचे आणि त्याचे झालेले हे बोलणे सांगण्याकरता श्री. आत्माराम बापू आणि तो मी जेथे बसलो होतो, तेथे दाराशी टक टक करू लागले.

म्हणून मी दार उघडून त्यांच्यापाशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. मी म्हटले,

''काय होईल, ते होईल; आता चिंता करून नका. पाहू या, काय होते, ते. आता तुम्ही जा.''