• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१३६

'माधवाश्रमा'तले ते पाच-सात दिवस सहज निघून गेले. मुंबई पाहून झाली होती. तेव्हा आता आपापल्या गावी जाऊन, आता सनद घेतलीच आहे, तर वकिलीचा उद्योग सुरू केला पाहिजे, या जाणिवेने परत फिरलो.

माझ्या पुढे माझ्या मित्रांच्या चर्चेवरून प्रश्न निर्माण झाला होता, की मी प्रॅक्टिस कोठे सुरू करावी. मी आता तसा सबंध जिल्ह्यात माहीत झालो होते. तेव्हा काही मित्रांचा सल्ला होता, की सातारला जिल्हा न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरू करावा. पण माझे मन मला सांगत होते, की इतक्या गंभीरपणाने वकिली करण्याकरिता जर मला सातारला जायचे असेल, तर नीट बस्तान बसेपर्यंत पाच-दहा वर्षे वाट पाहण्याची माझी तयारी असली पाहिजे आणि या पाच-दहा वर्षांत वकिलीच्या व्यवसायाशिवाय दुसरे कुठलेही काम मी करता कामा नये. असे केले, तरच माझे वकिलीचे काम साता-यामध्ये ठीक चालेल. हा सर्व विचार करून माझा मी निर्णय घेतला, की वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी माझे आयुष्य आहे, असे मला वाटत नाही. झालोच आहे वकील, तर कराडला वकिली करावयाचा प्रयत्न करू. त्याला जोडून राष्ट्रीय चळवळीचे आपले नेहमीचे कार्य करीत राहावयाला कराड सोईस्कर आहे. सातारा न्यायालयाचा नाद मी सोडून दिला आणि कराडला प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. कराडमध्ये गुरुवार पेठेत कोळेवाडीकर देशपांडे यांचे घर आहे. ते घर मी भाड्याने घेतले आणि तेथे 'वकील' म्हणून माझ्या नावाची पाटी लावून, त्या घरात मी राहावयास आलो.

१९४१ सालचा जुलै महिना असेल. या वेळी मी एक वर्षभर वकिलीचा व्यवसाय केला. कारण १९४२ सालच्या ऑगस्ट महिन्यात आमचे दुसरे रामायण सुरू होणार होते. त्यामुळे एक वर्षाचा माझा जो वकिलीचा अनुभव आहे, तो काही फारसा नोंदण्यासारखा आहे, असे मला वाटत नाही. माझ्या घरी गर्दी असायची, परंतु ती तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची. त्या कार्यकर्त्यांना मोठा अभिमान वाटत असे, की मी त्यांच्यांत राहून वकिलीच्या पेशामध्ये प्रवेश केला. एवढ्याच एका गोष्टीचा त्यांना आनंद होता. त्यामुळे मी कोर्टात जाईतोपर्यंत हे लोक माझ्याभोवती गर्दी करून बसलेले असायचे.

हळूहळू फौजदारी खटले माझ्याकडे येऊ लागले आणि वकिलीच्या पेशात चार पैसे मिळतात, याचा मला अनुभव येऊ लागला. त्या वेळी मी या वकिलीच्या क्षेत्रात असे पाहिले, की या धंद्यामध्ये विलक्षण स्पर्धा आहे. जुनी माणसे नव्या माणसांना संधी देत नव्हती. नवी माणसे एकमेकांच्या केसेस् काढून घेण्याच्या खटपटीत असत. फौजदारी न्यायदानाचे कामही मोठे विलक्षण व चमत्कारिक स्वरूपाचे होते. या सगळ्या अनुभवांतून मी जायचा प्रयत्न करीत असताना आपण फार खालच्या स्तरावर या पेशाचे काम सुरू केले, याची थोडीशी बोचणी माझ्या मनात सुरू झाली. कारण ज्या तऱ्हेची स्पर्धा तेथे चालू होती, त्या स्पर्धेत मी भाग घेऊ शकत नव्हतो. लॉ कॉलेजच्या लायब्ररीत बसून कायद्याच्या तत्त्वांचा अभ्यास आणि हायकोर्टाच्या निर्णयांचा केलेला व्यासंग यांचा या दैनंदिन कामाशी कुठे संबंध येतो आहे, असे मला दिसेना.

माझ्या एका फौजदारी खटल्याचा अनुभव सांगतो. म्हणजे चित्र कसे होते, याची कल्पना स्पष्ट येईल. एका सरकारी खटल्यात सरकारी पोलिस जमादार प्रॉसिक्यूटर म्हणून काम करीत होते. ज्याचा मूळ खटला होता, त्याला त्यांच्याबद्दल विश्वास वाटेना. म्हणून विश्वासाचा वकील म्हणून त्याने मला निवडले. मी त्या माणसाला सुरुवातीलाच सांगितले,
''तुझा खटला चालविण्याचे काम पोलिस जमादार प्रॉसिक्यूटर करीत आहेत. त्यांचे सहकार्य जर मला मिळाले नाही, तर मी तुला कशी मदत करणार?'' त्याचा आग्रह पडला, म्हणून मी त्याचे वकीलपत्र घेतले. अर्थात पोलीस जमादार प्रॉसिक्यूटर हेही तेथे होते. त्यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले, की प्रॉसिक्यूटर सरकारी साक्षीदारांच्या ज्या साक्षी घेत होते, त्यांवरूनच त्यांचा आणि आरोपीचा आतून काही करार झाला आहे. एका गरीब शेतक-याची बैलगाडी त्याच्या शेजारचा एक दांडगेश्वर उचलून घेऊन गेला होता. हा या खटल्याचा विषय होता. सरकारचे साक्षीदार जे आले, तेच सांगू लागले, की गाडी फिर्यादीची नव्हतीच मुळी. मी समजून चुकलो, की या खटल्याचा निकाल काय लागणार आहे. मी माझे वकीलपत्र त्यातून काढून घेतले. मी त्या माणसाला सांगितले, की 'तुझा यात निभाव लागणार नाही.' माझा तेव्हा असा पक्का समज झाला, की पोलिस प्रॉसिक्यूटर, आरोपीचे वकील आणि मॅजिस्ट्रेट यांनी या केसचा निकाल काय द्यावयाचा, हे आधीच ठरविलेले आहे. मी हा एक नमुना सांगितला. सर्वच काही असे असेल, असे माझे म्हणणे नाही; पण बरेचसे असे काही होते, हे मात्र खरे. मी त्यावेळच्या धंद्याचीही परिस्थिती सांगितली आहे.