• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१३५

शिक्षित, पण एकत्र कुटुंबात रमून जाईल, अशी वधू मला पाहिजे होती. साता-यात यादो गोपाळ पेठेतील त्यांच्या नातेवाइकांच्या घरी मी सौ. वेणुबाईला प्रथम पाहिले. काही प्रश्नोत्तरे झाली. मी वकील असलो, तरी राजकीय कार्यकर्ता आहे, हे मी स्पष्ट केले. तिच्या चेह-यावर मला विलक्षण सौम्य प्रसन्नता दिसली. दिव्यासारखे लखलखणारे तिचे मोठे डोळे पाहून माझ्या मनाने होकार दिला.

कराडला परत जाऊन माझा होकार मी माझ्या आईला कळविला. मेच्या सुरुवातीस हे सर्व घडले आणि २ जून रोजी माझा व सौ. वेणूबाईचा विवाह कराड येथे झाला.

आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा एका बाजूने जनआंदोलनाच्या बाजूने आपले मन तयार करणारा मी, हे जनआंदोलन असे उंबरठ्यावर आले असताना लग्नाला कसा उभा राहिलो, हा विचार केव्हा केव्हा माझ्या मनाशी येऊन जातो. परंतु निर्णय घडला, हे खरे, आणि त्यातून माझे पुढचे जीवन घडत गेले, हेही खरे. तर्क आणि जीवन नेहमीच हातात हात घालून चालते, हे खरे नाही, हाच त्याचा अर्थ.

- आणि एका दृष्टीने जनआंदोलनाचा जो वादळी संसार मला पुढे पाहायचा होता, त्यासाठी आवश्यक ती जोडीदारीण मला मिळणार होती. त्याचा हा योगायोग होता किंवा अर्थ होता, असे म्हटले, तरी चालेल.
माझ्या विवाहासाठी जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जमले होते आणि माझ्या विवाहास मला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेले स्वामी रामानंद भारती यांनी विवाह-समारंभाच्या शेवटी भाषण केले, त्यामध्ये होणा-या जनआंदोलनाचा अतिशय सूचक असा उल्लेख केला.

पूर्वी के. डी. पाटील आणि माझ्यात ठरल्याप्रमाणे १९४१ सालच्या मे महिन्यात हायकोर्टातून आमच्या वकिलीच्या सनदा आणाव्यात, म्हणून मुंबईला गेलो. मुंबईलाच जायचे, म्हणून आपले काही दोस्त बरोबर घ्यावयाचे, असे ठरले. त्यांनी आम्हां दोघांचे स्नेही कोरे बंधू यांच्यापेकी एक आणि मी माझ्याबरोबर माझे नवे झालेले मित्र श्री. यशवंतराव पार्लेकर असे आम्ही मुंबईला गेलो. ही माझी मुंबईला तिसरी किंवा चौथी भेट असेल.

यापूर्वी जेव्हा मी मुंबईला गेलो होतो, तेव्हा कुणाच्या तरी ओळखीने कुठे तरी थांबत असे. या खेपेला मात्र आठवडाभर मुंबईत काढावयाचा, असे ठरवून आल्यामुळे कुठेतरी राहणे जरूर होते. आमच्या खिशाला परवडणारे ठिकाण म्हणजे 'माधवाश्रम' होते. म्हणून प्रार्थना समाजजवळच्या 'माधवाश्रमा'त आम्ही आश्रयाला गेलो. तो सबंध आठवडा आम्ही 'माधवाश्रमा'त काढला. त्या काळच्या परिस्थितीमध्ये आमच्या कल्पनेने पुरेशी व्यवस्था तेथे होती.

यावेळी आम्ही सर्व मुंबई पाहावयाची असे ठरविले होते आणि जितके फिरता येईल, तितके फिरावयाचे, अशी आमची कल्पना होती. पहिल्या एक-दोन दिवसांत हायकोर्टात जाऊन आम्ही आमच्या वकिलीच्या सनदा घेतल्या. हातात सनद आल्यानंतर एक वेगळी भावना मनात येऊन गेली, की कुठल्याही कोर्टात हक्काने हजर राहण्याची परवानगी आम्हाला या निमित्ताने मिळते आहे. एक प्रकारचा नवा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. दुसरे जे महत्त्वाचे काम आम्ही केले, ते म्हणजे आम्हांला आवश्यक असणारी कायद्याची पुस्तके खरेदी करण्याचे. वकिलीचा उद्योग सुरू करावयाचा, म्हणजे महत्त्वाची कायद्याची पुस्तके जी असतील, त्यांची मूळ गरज होती आणि ती लायब्ररीत जाऊन पाहण्यापेक्षा आपल्या घरी असलेली बरी, म्हणून अशी प्रत्येकी दहा पंधरा पुस्तके  के. डीं. नी आणि मी आमच्यासाठी खरेदी केली. त्या सबंध आठवडाभरात आम्ही मुंबई शहरातील सर्व महत्त्वाच्या भागांत फिरून आलो. एवढे मोठे शहर. त्याचा उद्योगधंद्याचा व व्यापाराचा पसारा मी प्रथमच पाहिला. मुंबईच्या कहाण्या आम्हांला ऐकून माहीत होत्या. परंतु हे शहर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, त्याचा जो काही परिणाम माझ्या मनावर झाला, तो म्हणजे या शहरामध्ये जबरदस्त श्रीमंती आहे; तितकीच विलक्षण गरिबी पण आहे.

आमच्या ओळखीचे सातारा जिल्ह्यातील कामगार होते. त्यांतील एक-दोघांकडे त्यांच्या आमंत्रणावरून जेवायला गेलो. तेव्हा तेथे ही मंडळी कशी राहतात आणि जेवणखाण कसे करतात, याची थोडी-फार कल्पना आली. फार थोडे लोक आपल्या कुटुंबासह तेथे राहत असत. एखादी खोली आणि त्यामध्ये पाचपंचवीस माणसे आणि कुठल्यातरी खानावळ चालविणा-या बाईच्या घरी सकाळ-संध्याकाळचे भाजी-भाकरीचे जेवण ही त्यांची जिवाची मुंबई होती. दिवसभर कष्ट करावेत आणि जेथे जागा सापडेल, तेथे रात्र काढावी, असा आयुष्यक्रम ही कामगार मंडळी जगत असताना आम्ही पाहिली. अशांचाही आम्ही मोठ्या आपुलकीने पाहुणचार घेतला. कारण त्यांना आमच्याबद्दल जिव्हाळा होता. जसे गिरगाव पाहिले, तसेच मुंबई बंदर व तेथे चाललेले काम पाहिले. बंदरात कष्ट करणा-या लोखंडी जथ्थ्यातील गाववाल्यांनाही भेटलो. मरीन ड्राईव्ह व मलबार हिलकडेही एक चक्कर मारून झाली. या अफाट व अजब शहराबद्दलच्या संमिश्र भावना मनामध्ये गर्दी करून आल्या.